बालदमा

जगभरात दम्याचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. रुग्णांमध्ये लहान मुलांचीही संख्या मोठी आहे.

 

डॉ. अविनाश गावंडे

मानवाच्या बदलत्या जीवनशैलीसह वाढत्या प्रदूषणामुळे भारतातच नव्हे तर जगभरात दम्याचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. रुग्णांमध्ये लहान मुलांचीही संख्या मोठी आहे. मात्र त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे.

बाल दमा म्हणजे काय?

लहान मुलाची श्वासनलिका लहान असते. कोणतेही काम करताना मुलाला अधून-मधून धाप लागणे, श्वास घेताना छातीतून सुई सुई अशा प्रकारचा आवाज येणे किंवा खोकला येणे म्हणजे बाल दमा होय.

बाल दमा होण्याची कारणे

लहान मुलांमध्ये श्वसनाशी संबंधित असलेल्या विविध प्रकारच्या संसर्गामुळे, गुणसूत्रातील दोष म्हणजेच आनुवंशिक कारणामुळे तसेच वातावरणातील घटक म्हणजे विषाणू, व्यवसायाशी संबंधित सततच्या प्रादुर्भावामुळे हा आजार होण्याची दाट शक्यता असते.

निदान कसे कराल?

मुलाकडून श्वास बाहेर टाकताना छातीतून सततचा शिट्टीसारखा येणारा आवाज येत असल्यास त्याला बाल दमा असण्याची शक्यता सर्वाधिक असते. दमा असल्याचे निदान करण्याकरिता तपासण्या करण्याची तशी गरज नसते; परंतु काही वेळा गरज पडल्यास पल्मनरी फंक्शन टेस्ट, एक्स- रे, अ‍ॅलर्जीकरिता तपासणी, रक्ताची तपासणी केली जाते.

उपचार

बाळाला संसर्ग होईल अशा घटकांचा संपर्क टाळणे.

बाळाच्या झोपण्याच्या ठिकाणी स्वच्छता ठेवणे.

फरशा ओल्या कपडय़ाने पुसून घेणे.

पाळीव प्राणी (उदा. कुत्रा मांजर) घरात न ठेवणे.

कारपेट, कॅलेंडर, पुस्तके, लटकणारे कपडे वारंवार स्वच्छ करणे.

बाल दम्याबाबतचे गैरसमज

औषध घेतल्याने रुग्णाला त्याचे व्यसन लागते.

मुलांनी जास्त काळ औषध घेतल्यास त्याचा प्रभावीपणा (अ‍ॅक्टिव्हनेस) जातो

दुधाचे सेवन टाळल्याने अस्थमा जातो.

‘इन्हेलर’ घेणे धोकादायक आहे

बाल अस्थमाबाबतच्या नोंदी

एका आंतराष्ट्रीय संस्थेने जगाच्या विविध भागांसह महाराष्ट्रातील पुणे व अकोला या शहरांतील लहान मुलांचा अभ्यास केला होता. त्यामध्ये संस्थेला महाराष्ट्रातील या दोन्ही संस्थांत फार कमी वयोगटातील २.५ टक्के लहान मुलांमध्ये हा अस्थमा आढळला. भारतात खासगी व शासकीय संस्थेत उपचार घेणाऱ्या अस्थमाग्रस्त मुलांची संख्या संग्रहित नाही. त्यामुळे या आकडय़ाहून जास्त मुलांमध्ये दमा आढळतो. जागतिक अस्थम्याच्या अहवालानुसार जगात १४ टक्के  लहान मुलांमध्ये दमा असल्याचे दिसते. त्यामध्ये १० ते १४ वयोगटातील मुलांची संख्या जास्त आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात १० ते १५ टक्के मुलांमध्ये अस्थमाग्रस्त रुग्ण आढळतात. ५ ते ११ वयोगटातील मुलांची संख्या त्यात जास्त आहे.

लक्षणे

सर्दी व खोकला (बहुतांश रात्रीच्या वेळी), सुरुवातीला कोरडा खोकला येतो, धाप लागते, दीर्घ श्वास चालतो, छातीतून आवाज येतो.

गंभीर प्रकारामध्ये बालक हात समोर टेकून बसते, श्वासाचा वेग बऱ्यापैकी वाढतो.

पूर्वी छातीतून ऐकू येत असलेला सुई सुई अशा प्रकारचा आवाज अचानक बंद होणे हे दमा तीव्र झाल्याचे लक्षण आहे.

ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊन बाळ निळे पडू शकते, नाडीचे ठोके बदलतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Information on children suffering from asthma