सकाळपासून फोन जसा हट्टाला पेटला होता. कधी एंगेज, कधी स्विच ऑफ तर कधी आऊट ऑफ रेंजचे संदेश मिळत होते. पुण्यातील मैत्रिणीला तातडीचा निरोप द्यायचा होता. तिच्याकडूनपण तात्काळ उत्तराची अपेक्षा होती. अर्थातच व्हॉट्सअ‍ॅपला पर्याय नाही, हे लक्षात आले आणि सेलफोनमध्ये मेसेज लिहायला बसले. बाजूलाच नुकताच वाचून संपविलेला ‘लोकप्रभा’चा अंक होता. या अंकात कालिदासाच्या मेघदूतविषयी लेख होता. मुख्य म्हणजे कालिदासानी हे अजरामर काव्य नागपूरच्या रामटेक येथील ‘रामगिरी’ टेकडीवर बसून लिहिले होते हे या लेखावरून प्रथमच समजले. जगातील अजरामर अशा पहिल्यावहिल्या दूतकाव्याचा जन्म नागपुरात झाला. कालिदासासारख्या श्रेष्ठ कवीचे येथे वास्तव्य होते, या विचाराने खरंच ऊर भरून आला. पण. ए. एक मिनिट. अहो, मेघदूत. आणि व्हॉट्सअ‍ॅप शेजारी मेघदूत पडलाय, हातात व्हॉट्सअ‍ॅप आहे. या दूताचा इतका प्रवास कधी, केव्हा, कसा झाला? छे, असं कसं, आपण सर्वच साक्षीदार आहोत त्याला. खरंतर आपलंच कर्तृत्व आहे ते!

संपर्काचं कुठलंही साधन उपलब्ध नसल्याच्या काळातलं मेघदूत हे काव्य! एका शापित यक्षाची कथा आणि व्यथा सांगणारं काव्य! आषाढ महिन्यातल्या मेघाची दूत म्हणून केलेली कल्पना म्हणजे या महान कवीच्या कल्पनाशक्तीचा अनोखा आविष्कार! निर्जीव, अचेतन वस्तूला दूत म्हणून संबोधणारं हे पहिलं काव्य! त्यानंतर मात्र कालिदासाची री ओढत अनेक कवींनी नदी, नाले, हवा, वारा, पाऊस कोणालाच सोडलं नाही. या सर्वच अचेतन गोष्टीकडून वेळोवेळी कवी लोकांनी दूताचं काम करवून घेतलंय. शिवाय आपला चंदामामा आहेच की! त्याची बिचाऱ्याची निरोप्याचं काम करून दमछाकच झाली असणार. कितीजणांनी प्रेमाच्या आणाभाका घेताना त्याला साक्षीदार केलंय! विरही प्रेमी तर या चंद्रालाच शरण जातात! ‘चंदा रे मोरी पतीया ले जा! सजनी को पहूँचा दे रे। वो लिख सके जावाब उन्हे तू मेरा पता बता दे रे।’ हे मुकेशचं गाणं याचं उत्तम उदाहरण!
त्यानंतर सजीव प्राणी-पक्ष्यांना दूत बनविण्याचा काळ आला त्यात कबुतरांचा नंबर वरचा. मुस्लिमांमध्ये तर कबूतर पाळण्याची प्रथाच! परगावी जाताना पिंजऱ्यात कबूतराला बरोबर घेऊन जायचं आणि मग तिथून त्याच्याबरोबर घरी चिठ्ठी पाठवायची. कबूतर बिचारं ती चिठ्ठी शेकडो मैलाचं अंतर पार करून सुखरूप घरी पोहोचवितं. एखादी प्रेमिकासुद्धा ‘कबूतर जा जा जा! पहले प्यार की पहली चिठ्ठी साजन को दे आ’ असे म्हणत प्रेमपत्र कबूतराकरवी आपल्या प्रेमीला पाठविणं सुरक्षित समजते.
पुढे माणूस स्वत:च दूत बनला. त्यासाठी हा सांडणीस्वार घोडय़ावर स्वार होऊन शेकडो मैलांचं अंतर रात्रभरात पार करून आपल्या धन्याचे/ राजाचे खलिते योग्य जागी पोहोचवू लागला. कधी हेरगिरी करून राज्याच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या, शत्रूच्या गोटात घडणाऱ्या गोष्टी, रणांगणावरचे डावपेच याची इत्थंभूत माहिती आपल्या राजाला बसल्या जागी पुरवू लागला. त्यासाठी घोडाही उमदा हवा आणि त्यावर स्वार होणारा गडीपण तितकाच निडर आणि विश्वासू हवा. महाराणा प्रतापसिंग आणि त्यांचा चेतक घोडा हे इतिहासातील उत्तम उदाहरण तर पांडवांचा दूत बनून कौरवांकडे शिष्टाईसाठी गेलेला दूत- श्रीकृष्ण हे महाभारतातील उत्तम उदाहरण!
आणि मग सुरू झाली डाकसेवा! आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्वत:च्या हस्ताक्षरातल्या, आंतरिक भावनांनी ओतप्रोत अशा त्या पत्रांची सर आजच्या ई-मेलला कशी येणार. परदेशी असलेल्या व्यक्तींमध्ये घरून पत्र आल्यावर चिठ्ठी आयी है वतनसे चिठ्ठी आयी है, असे म्हणून डोळ्यात पाणी न आलेला विरळाच! देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकाचं कणखर हृदयही घरून पत्र आल्यावर संदेसे आते है, हमे तडपाते है असं म्हणून हेलावल्याशिवाय राहत नाही. हा, या डाकसेवेमध्ये कधी कधी प्रचंड घोळपण झालेले आहेत. पत्र वेळेवर न मिळणं, चुकीच्या पत्त्यावर जाणं, पत्ता न सापडल्यामुळे परत येणं हे तर नेहमीचंच, पण कधी कधी उशीर म्हणजे किती? बाळाच्या जन्माची बातमी देणारे पत्र थेट त्याच्या साखरपुडय़ाच्या वेळेला पोहोचणं यासारख्या गोष्टीपण वर्तमानपत्रातून वाचनात आल्या आहेत. वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी थोडासा खर्चीक असा तारसेवेचा पर्याय मग उपलब्ध झाला. देशभरातील तार ऑफिस कडकट्ट कडकट्ट आवाजानी दुमदुमू लागली. तारेमध्ये मजकूर थोडक्या शब्दात टाकावा लागायचा. काही विशिष्ट संदेशांसाठी विशिष्ट आकडे देण्यात आले. अर्थात या आकडय़ांनीपण अनेक घोळ केलेत. माहेरी बाळंतपणासाठी गेलेल्या पत्नीच्या रिझल्टकडे डोळे लावून बसलेल्या जावईबापूंना सासरवाडीहून विशिष्ट आकडय़ाचा संदेश येतो ‘कॉन्ग्रॅच्युलेशन्स ऑन न्यू अरायव्हल’ बिच्चारा! दुसरं सविस्तर पत्र येईपर्यंत आपण मुलाचे बाप झालोत की मुलीचे हा सस्पेन्सच राहायचा. कधी बाळाच्या जन्माची बातमी देणारी तार चुकीचा नंबर टाकल्यामुळे एखाद्याच्या मृत्यूचाच संदेश आणायची, अशा गमती अनेक घडल्यात. अलीकडे सरकारनी तारसेवा बंद केली. त्या दिवशी देशभरातील हजारो लोकांनी आपल्या आयुष्यातील शेवटची तार पाठविण्याचा आनंद लुटला.
मधल्या काळात टेलिफोनसुद्धा आले होते. सुरुवातीला फोन नसायचे. घरी फोन असणं म्हणजे श्रीमंतपणाचं लक्षण होतं. सामान्य लोकांना तार ऑफिसमध्ये जाऊन आधी फोन बुक करावा लागायचा. दिलेल्या वेळेला फोन करणाऱ्यांनी-घेणाऱ्यांनी आपापल्या तार ऑफिसमध्ये हजर राहायचं. आता घराघरांतून टेलिफोनची रिंग किणकिणत असते.
..आणि मग आला इंटरनेटचा जमाना! क्या बात हैं! ई मेल, चॅटिंग, फेसबुक वगैरे! या इंटरनेटमुळे स्काइप ही मात्र फार चांगली गोष्ट मिळाली आपल्या पिढीला! परदेशात वाढणाऱ्या नातवंडांना दिसामासी मोठं होताना बघता येतं. त्यांच्या सगळ्या प्रगतीचे साक्षीदार होता येतं. वरचेवर भेटी न होतासुद्धा आजी-आजोबा आणि नातवंडांमध्ये एक घट्ट नातं निर्माण होतं आणि व्हॉट्सअ‍ॅपचा तर जबाबच नाही. मेघदूत, चंद्र, तारे, कबूतरं, घोडे, पत्र, तारा सगळ्या सगळ्यांना मागे टाकून जगात सर्वाना किती जवळ आणलंय एकमेकांच्या! अगदी काही सेकंदांच्या अंतरावर! अर्थात यातपण एक गोम आहेच. व्हॉट्सअ‍ॅपवरून येणारे संदेश म्हणजे म्हणी, वाक्प्रचार, वाढदिवसाच्या शुभेच्छा, सरदारजीचे जोक्स अगदी फारच झालं तर कधीतरी एखादा र्अजट पर्सनल मेसेज. यात कुठेच अंतरीची ओढ, मायेचा ओलावा, आपुलकीची साद, प्रेमाचा जिव्हाळा असं काहीच नसतं; जे आपल्याला पूर्वी स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या पत्रात जाणवायचं. म्हणूनच आपले बुजुर्ग नेहमी म्हणत असतात ‘जुनं ते सोनं!’
स्वप्नाली ताम्हणे response.lokprabha@expressindia.com

Sale of pistol by prisoner
पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?
24 Year Old Women Pee Turned Black Like Cola Rush To ICU Are You Overdoing Perfect Ratio For Work and Exercise by dr Mehta
तुमचं शरीर किती थकतंय? ‘ही’ लक्षणे लगेच ओळखा; डॉ. मेहतांनी सांगितलं व्यायाम व कामाच्या वेळेचं परफेक्ट सूत्र