सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे दोन्ही ग्रहांच्या सकारात्मक गुणांची सांगड जुळेल. नोकरी-व्यवसायात हिरिरीने, नव्या उत्साहाने कामाला लागाल. सहकारी वर्गाला प्रोत्साहन द्याल. त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना कराल. जोडीदाराचा कल खरेदी करण्याकडे अधिक असेल. वेळीस रोक लावा. कुटुंबातील सदस्यांना धीर द्याल. त्यांचा आत्मविश्वास वाढवाल. योग्य काळजी न घेतल्यास श्वसनाचे विकार बळावतील. औषधोपचार आवश्यक!

वृषभ गुरू-चंद्राच्या समसप्तम योगामुळे रखडलेली कामे हळूहळू मार्गी लागतील. योग्य दिशा मिळेल. नोकरी-व्यवसायात गुरुजनांचा सल्ला उपयोगी ठरेल. सहकारी वर्गाकडून अपेक्षित काम पूर्ण करून घ्याल. नव्या समस्या सोडवताना डोकं शांत ठेवा. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात त्याच्या जबाबदाऱ्या वाढतील. कौटुंबिक वातावरण धावपळीचे जाईल. नवी आíथक गुंतवणूक करू नका. खांदेदुखी, फुप्फुसांचे विकार दुर्लक्षित करू नका.

मिथुन रवी-चंद्राच्या लाभ योगामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढेल. सरकारी कामे, कोर्ट कचेऱ्यांची कामे धिम्या गतीने पुढे जातील. नोकरी-व्यवसायात सहकारी वर्गातील चांगल्या गुणांचा कामामध्ये योग्य उपयोग कराल. जोडीदाराच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी त्याला आपला सल्ला उपयोगी पडेल. कुटुंब सदस्यांचे लहानमोठे प्रवास लांबणीवर पडतील. उष्णतेमुळे उत्सर्जन संस्थेचे विकार बळावतील. रक्तस्राव झाल्यास विशेष काळजी घ्यावी.

कर्क उच्चीच्या चंद्राचा स्वगृहीच्या शनीशी होणाऱ्या नवपंचम योगामुळे काटकसर, सातत्य आणि चिकाटी यांचा संयोग होईल. नोकरी-व्यवसायात अधिकाराने काही सकारात्मक योजना राबवाल. सहकारी वर्गाची साथ चांगली मिळेल. त्यांच्या प्रगतीचा, उत्कर्षांचाही विचार कराल. जोडीदाराच्या कामाचा व्याप वाढेल. जबाबदाऱ्या आणि तणावही वाढेल. त्याला आपल्या भावनिक आधाराची गरज भासेल. फायब्रोइड, रक्तपेशीत गुठळ्या होण्याची शक्यता!

सिंह चंद्र-नेपच्यूनच्या लाभ योगामुळे एखाद्याचे टोचून बोलणे मनाला लागेल. नोकरी-व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. सहकारी वर्ग सरकारी कामे पुढील टप्प्यावर नेतील. अनेक अडचणींतून मार्ग काढावा लागेल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रातील अडथळ्यांमुळे त्याचा धीर खचेल. आपण त्याचा आत्मविश्वास वाढवाल. कुटुंबातील आजारी व्यक्तींची सेवाशुश्रूषा कराल. अस्वस्थता वाढेल. रक्ताभिसरणाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घ्यावा.

कन्या चंद्र आणि मंगळाच्या नवपंचम योगामुळे अधिकाराचा योग्य उपयोग कराल. उच्चीच्या मंगळाचा चांगला प्रभाव पडेल. नोकरी-व्यवसायात नव्या जोमाने कामाला लागाल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकारी वर्ग मदतीचा हात पुढे करेल. लहानमोठय़ा प्रवासास अनुकूल वातावरण निर्माण होईल. जोडीदाराच्या विचारांना समाजात पुष्टी मिळेल. ज्येष्ठ मंडळी आणि लहान मुले यांच्या हिताचे कार्य हातून घडेल.

तूळ बुद्धीचा कारक ग्रह बुध आणि समूहाचा कारक ग्रह प्लुटो यांच्या केंद्र योगामुळे संघाचे नेतृत्व कराल. प्रगतीपथावर मार्गक्रमण होईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे वर्चस्व वाढेल. मानसिक ताण जाणवेल. त्याच्या हजरजबाबीपणाला सामोरे जाताना आपली शक्ती खर्ची पडेल. जोडीदाराचा त्याच्या कार्यक्षेत्रात रुबाब वाढेल. त्याच्या मताला मान मिळेल. कौटुंबिक वातावरणात शिस्तीचे पालन होईल. सर्व सदस्य एकत्रितपणे एखाद्या सामाजिक कार्यात सहभागी होतील.

वृश्चिक चंद्र आणि शुक्र या दोन स्त्री ग्रहांच्या युती योगामुळे मत्रीची नाती दृढ होतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. संघटनेच्या लाभकारक गोष्टींमध्ये आपला सिंहाचा वाटा असेल. सहकारी वर्गाची चांगली साथ लाभेल. जोडीदाराच्या सहवासात वेळ आनंदात जाईल. एकमेकांच्या अडचणी समजून घ्याल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. कुटुंब सदस्यांच्या भावनांची कदर कराल. डोक्यासंबंधित आजार दुर्लक्षित करू नका.

धनू  आरोग्याचा कारक ग्रह रवी आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा कारक ग्रह हर्षल यांच्या युतीयोगामुळे वैद्यकीय क्षेत्रात प्रगती कराल. सहकारी वर्गाला नव्या प्रणालीचे प्रशिक्षण द्याल. त्यांच्याकडून दर्जेदार काम करून घ्याल. जोडीदाराच्या  कामामध्ये हळूहळू गती येईल. त्याची मानसिक स्थिती सांभाळा. कौटुंबिक वातावरणातील तणाव कमी कराल. कुटुंब सदस्यांच्या आíथक अडचणींवर उपाय योजाल. स्त्रियांच्या आरोग्याचे प्रश्न अधिक काळजीपूर्वक सोडवा.

मकर चंद्र आणि गुरूच्या नवपंचम योगामुळे प्रगतीकारक घटना घडतील. कामाला योग्य दिशा मिळेल. नोकरी-व्यवसायात कायद्यासंबंधित काम पुढे सरकेल. वरिष्ठांची मर्जी राखाल. सहकारी वर्गाकडून कामात मोलाची भर पडेल. जोडीदाराच्या स्वभावात अपेक्षित बदल जाणवेल. एकमेकांचे सूर चांगले जुळतील. नातेवाईकांच्या आजारपणात त्यांची सेवा कराल. शेजारधर्म पाळाल. कौटुंबिक वातावरणातील ताण कमी कराल. फुप्फुसाचे आजार बळावतील.

कुंभ बुद्धीचा कारक ग्रह बुध आणि ज्ञानाचा कारक ग्रह गुरू यांच्या केंद्र योगामुळे अडचणीतून मार्ग काढून पुढे जाल. नोकरी-व्यवसायात हाती घेतलेल्या कामांना धिम्या गतीने पुढे न्याल. सहकारी वर्गाला  आपल्या मदतीची गरज भासेल. जोडीदार आपल्या कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या स्वीकारेल आणि त्या योग्य प्रकारे निभावेल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही ठेवाल. कफ आणि वातविकार बळावल्यास औषधोपचार घ्यावेत.

मीन चंद्र आणि बुधाच्या केंद्र योगामुळे व्यवहारचातुर्य वापरून अडचणीतून मार्ग काढाल. नोकरी-व्यवसायात नव्या संकल्पना अमलात आणाल. वरिष्ठांची मनधरणी करावी लागेल. सहकारी वर्गाच्या हुशारीचे कौतुक कराल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रातील अधिकार पदावर संकट येईल. त्यांना धीर द्या. कौटुंबिक समस्या शिताफीने सोडवाल. डोकं आणि डोळे यांचे त्रास उद्भवतील.