News Flash

डावपेच : बाग्रामची लूट… दागिने ते दहशतवाद

अफगाणिस्तान तेव्हाही चर्चेत होते आणि आताही आहे. तेव्हा म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकात आणि आता म्हणजे एकविसाव्या शतकात.

तेव्हा ते बाग्राम दागिन्यांसाठी प्रसिद्ध होते आणि आता चर्चेत आहे ते दहशतवादासाठी.

विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
अफगाणिस्तान तेव्हाही चर्चेत होते आणि आताही आहे. तेव्हा म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकात आणि आता म्हणजे एकविसाव्या शतकात. अर्थात तेव्हा ते बाग्राम दागिन्यांसाठी प्रसिद्ध होते आणि आता चर्चेत आहे ते दहशतवादासाठी. भौगोलिक स्थान हे तुम्हाला सुबत्तेच्या कळसावर नेते तसेच काही वेळेस ते तुमचा गळफासही ठरते. अफगाणिस्तानचे असेच काहीसे झाले आहे. गेल्या आठवडय़ापासून येथील बाग्राम हवाईतळाचा परिसर खूप चर्चेत आहे. कारण अमेरिकेच्या हवाई दलाने इतर कुणाहीकडे म्हणजेच रीतसर अफगाणिस्तानच्या सैन्याकडे न सोपवता इथून काढता पाय घेतला आणि त्यानंतर तालिबान्यांनी हा तळ काबीज केला असून सर्वानीच बाग्रामाची वेगळ्या पद्धतीने लूट केली आहे. तेथेच पडून राहिलेले लष्करी स्टीलसामान, वायर्स, विजेची उपकरणे आदी अनेक गोष्टी ताब्यात घेऊन काहींनी भंगार म्हणून ते विक्रीसही काढले आहे. त्याची छायाचित्रे, बातम्या गेल्या आठवडय़ाभरात जगभरात प्रसिद्ध झाल्या.

विद्यमान बाग्रामचा हा परिसर ऐतिहासिक कालखंडात कपिशा नगरी म्हणून प्रसिद्ध होता. प्राचीन रेशीम मार्गावरील ते तेवढेच प्राचीन शहर होते. जगभरच्या इतिहासामध्ये आपल्याला त्याचे दाखले पाहायला, वाचायला मिळतात. त्या वेळेस ते प्रसिद्ध होते ते हस्तिदंताच्या आणि नंतरच्या कालखंडात सोन्याच्या दागिन्यांसाठी. दागिन्यांच्या इतिहासातच नव्हे तर जगभरच्या पुरातत्व इतिहासामध्ये बाग्राम दागिने हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. विख्यात वैय्याकरणी पाणिनी हादेखील या कपिशा नगरीशीच संबंधित होता, असे मानले जाते.

१९३० साली फ्रेंच पुरातत्त्वज्ञांना बाग्राम येथे एक खजिना सापडला, हा बहुधा तत्कालीन राजाचा खजिना असावा, त्या वेळेस हे बाग्रामचे अनोखे दागिने जगभर चर्चेत आले. त्यावर भारतीय कलापरंपरेचा खूप मोठा प्रभाव आहे, खासकरून हस्तिदंती दागिन्यांवर. तर सोन्याच्या काही दागिन्यांवर युरोपीय प्रभावही पाहायला मिळतो. युरोप आणि भारतीय उपखंडाला जोडणारे म्हणून हे प्राचीन शहर अतिशय महत्त्वाचे होते. त्याचे भौगोलिक महत्त्व आजही कायम आहे. मात्र एकेकाळी या भौगोलिक महत्त्वामुळे संपन्न कालखंड पाहिलेल्या या शहरावर त्याच कारणामुळे यादवी आणि विपन्नावस्थेला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

सध्याचे बाग्राम पार्वान या इलाख्यात येते, अफगाणिस्तान एकूण ३४ इलाख्यांमध्ये विखुरलेले आहे. हा भाग ताब्यात असेल तर जवळपास संपूर्ण अफगाणिस्तानावर राज्य करता येते. इथूनच अवघ्या अडीच किमी. अंतरावर काबूल ते मझार-ए-शरीफ जोडमार्ग आहे. पश्चिमेला बामियान तर दक्षिणेला गझनी आणि कंदहार आहे. म्हणून काबूलपासून सुमारे ६० किमी. अंतरावरील या बाग्राम हवाई तळाला विशेष महत्त्व आहे. १९५० साली रशियाने इथे धावपट्टी बांधली. त्यानंतरच्या शीतयुद्धाच्या काळात रशिया आणि अमेरिका दोघांनाही अफगाणिस्तान आपल्या अंकित राहावे म्हणून विविध प्रयत्न केले. १९५९ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर शांतीचा संदेश घेऊन याच धावपट्टीवर उतरले आणि नंतर २००६ मध्ये राष्ट्राध्यक्ष बुश, २०१० साली बराक ओबामा, २०१४ साली डोनाल्ड ट्रम्प हेही इथेच उतरले.

दरम्यान, २४ डिसेंबर १९७९ रोजी सोविएत रशियाच्या लष्कराने अफगाणिस्तानच्या भूमीचा ताबा घेतला. त्यांनी येथील हवाई तळ तटबंदी घालून किल्ला बंद केला. १९९१ च्या अखेरच्या महिन्यात झालेल्या सोविएत रशियाच्या विघटनानंतर त्यांच्याविरोधातील उठावासाठी अमेरिकेने पोसलेल्या मुजाहिदीनांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतला. याच दहशतवाद्यांकडून झालेल्या ९/११ च्या हल्ल्यानंतर मात्र अमेरिकेने थेट अफगाणिस्तानावरच धावाबोल केला. कारण त्यांना या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून ठेचायचे होते. २० वर्षे अमेरिकन सैन्य येथे होते. या संघर्षकाळातही तालिबानी होते आणि आजही आहेत. आता तर अमेरिकन सैन्याने कोणाहीकडे ताबा न देताच इथून काढता पाय घेतला आणि आता हा हवाई तळ तालिबान्यांच्या ताब्यात आहे.

या संपूर्ण कालखंडामध्ये अफगाणिस्तानच्या जनतेला मात्र केवळ आणि केवळ यादवीसदृश परिस्थितीलाच सामोरे जावे लागले आहे. दरखेपेस अत्याचार करणारे केवळ वेगळे असायचे एवढेच. आजही अत्याचारांनाच सामोरे जावे लागण्याचे भागधेय त्यांच्या माथी आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ट्रम्प यांच्या अफगाणिस्तान धोरणात फारसा कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा अफगाणिस्तानात पूर्वीपासूनच असलेले स्थानिक टोळ्या घेऊन सत्ताकारण करणारे पुन्हा सक्रिय होतील आणि संपूर्ण देश या टोळ्या आणि तालिबानी यांच्याच ताब्यात जाईल, अशीच सद्य:स्थिती आहे. एकेकाळी बुद्धाच्या शांतीसंदेशासाठी प्रसिद्ध असलेला अफगाणिस्तान आता यादवीच्या उंबरठय़ावर आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2021 12:18 am

Web Title: bagram afghanistan war us troops terrorism davpech dd 70
Next Stories
1 तंत्रज्ञान : संगणक-लॅपटॉप समज-गैरसमज
2 राशिभविष्य : दि. ९ ते १५ जुलै २०२१
3 गनिमाशिवाय..
Just Now!
X