29 February 2020

News Flash

बजरंगीचे सतरंगी स्वप्न!

सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ने तिकीटबारीवर कोटीच्या कोटी उड्डाणे केली. सिनेमागृहं टाळ्या आणि शिट्टय़ांनी दणाणून गेली, मात्र मनोरंजनाच्या या गोळीच्या आत एक स्वप्न दडलं आहे.

| August 7, 2015 01:12 am

सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ने तिकीटबारीवर कोटीच्या कोटी उड्डाणे केली. सिनेमागृहं टाळ्या आणि शिट्टय़ांनी दणाणून गेली, मात्र मनोरंजनाच्या या गोळीच्या आत एक स्वप्न दडलं आहे. काय आहे हे स्वप्न..?

हनुमान हा केवळ हिंदूंचा देव कसा असू शकतो, तो सर्वाचा आहे, मीही शाळेत असताना हनुमानाची भूमिका केली आहे..
मुसलमानांनी जय श्रीराम म्हटल्याने त्यांचं मुस्लीमत्व कमी होणार नाही..
ही विधानं आहेत, बजरंगी भाईजानचा दिग्दर्शक कबीर खानची. आपल्या कलाकार मंडळींची सोयीस्कर धर्मनिरपेक्षता पाहता कबीरची ही विधानं बेगडी वाटू शकतील, मात्र हा दिग्दर्शक त्याच्या नावाला जागतोय, असं वाटायला बरीच जागा आहे. बजरंगी भाईजानला डोक्यावर घेणाऱ्या किती प्रेक्षकांनी कबीरचा ‘न्यूयॉर्क’ हा सिनेमा पाहिलाय, हे ठाऊक नाही, मात्र त्यातही त्याने दहशतवादाच्या मार्गाने निघालेल्या सुशिक्षित मुस्लिमांसाठी संयत शैलीत योग्य तो संदेश दिला होता. या सिनेमात त्याने एक पाऊल पुढे टाकलंय. पवनकुमार चतुर्वेदी ऊर्फ बजरंगी हा तरुण सहा वर्षांच्या एका मुक्या (अपघातामुळे वाचा गेलेल्या) मुलीला अनेक अडथळे पार करीत तिच्या घरी, मायदेशी सुखरूप पोहोचवतो. एवढंच हे कथाबीज. मात्र, ही मुलगी पाकिस्तानी आहे आणि इथेच सगळं चित्र बदलतं. (के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांची ही कथा आहे, ‘बाहुबली’चे लेखकही तेच!) हा विषयच कमालीचा संवेदनशील व स्फोटक. यापूर्वी ‘हीना’, ‘गदर’ आणि ‘वीर झारा’ या सिनेमात काही प्रमाणात अशाच कथा रंगविण्यात आल्या होत्या. परंतु हीना ही एक प्रेमकहाणी होती आणि त्यात ‘सीमापार’ करण्याचा हा उद्योग अखेरच्या काही रिळांत होता. वीर झारा हा यश चोप्रांच्या अन्य प्रेमपटांप्रमाणेच एक. प्रेम, त्याग, विरह, गैरसमज वगैरे वगैरे, त्याला भारत-पाकिस्तानातील तणावाची फोडणी दिली इतकाच काय तो फरक. गदरची गोष्टच वेगळी होती. त्याला पाश्र्वभूमी होती ती भारताच्या फाळणीची आणि साहजिकच त्यात संघर्षांचा भाग अधिक होता.
फाळणीच्या या जखमेवर अजून खपली धरलेली नाहीच. तरीही ती जखम विसरून आपण पुढे निघालोय, पाकिस्तानात मात्र तशी परिस्थिती नाही. विकासाचा अभाव, धार्मिक अतिरेक आणि दहशतवादामुळे त्यांचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे. भारताचा द्वेष करताना भारताविषयी न संपणारं आकर्षण बाळगत जगायचं, अशा कात्रीत तेथील जनता आहे. धर्माच्या आधारावर स्वतंत्र देश मिळूनही आपलं फार काही भलं झालं नाही, याची जाणीव त्यांना आहे. नेमक्या याच घुसमटीच्या पाश्र्वभूमीवर ‘बजरंगी भाईजान’ तेथेही प्रदर्शित झालाय आणि धो धो चालतोही आहे. सिनेमा हे एक अतिशय प्रभावी माध्यम आहे. आपले चित्रपट, तारे-तारका, गायक, गाणी यांचा मागोवा ते सुरुवातीपासून आवडीने घेत आहेत. भारतातल्या या कलाकृती आपल्यापेक्षा हजारो पटीने दर्जेदार आहेत, हेही त्यांना ठाऊक आहे. अशातच या सिनेमाच्या कथेचा एक मोठा भाग (तोही चांगल्या रीतीने) पाकिस्तानशी संबंधित असल्याने या सिनेमाचा तेथील जनमानसावर काही प्रमाणात का होईना परिणाम झाला असेल, यात शंका नाही. एरवी, एक भारतीय पाकिस्तानात अवैधरीत्या घुसतो, ही कल्पनाच त्यांना सहन न होण्यासारखी. (सरबजीत सिंगचा इतिहास फार जुना नाही) मात्र, त्या निष्पाप मुलीच्या काळजीपोटी हा तरुण जिवावर उदार होऊन तिला मायदेशी पोहोचवतो, असं कथानक असलेला सिनेमा ते डोक्यावर घेतायत, हा सकारात्मक संकेत आहे अशी भ्रामक का होईना समजूत होणं साहजिक आहे. ही अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी कबीरने सिनेमॅटिक लिबर्टीही घेतली आहे. उदाहरणार्थ, पाकिस्तानी सैन्याला ठाऊक नसलेल्या(!) एका भुयाराच्या आधारे बजरंगी त्या मुलीला घेऊन तारांचं कुंपण पार करतो, त्याच्यासमोर पाकिस्तानी सैनिक उभे ठाकतात आणि बजरंगीचा प्रामाणिकपणा पाहून ते त्याला पाकिस्तानात जायची मुभा देतात. यानंतर किरकोळ अपवाद वगळता बजरंगीला पोलीस, पत्रकार, मौलवी अशी चांगुलपणाने नटलेली अनेक पात्रं भेटून त्याचं मिशन पूर्ण होतं.
हा पूर्ण प्रवास अतिशय रंजक व नाटय़मय पद्धतीने चित्रित करण्यात आला आहे. त्यामुळेच मनोरंजन करतानाच पाकिस्तानी जनतेला अंतर्मुख करण्याचा कबीरचा हेतू काही प्रमाणात साध्य झाल्यासारखा वाटतो. बजरंगीच्या चांगुलपणामुळे त्यांच्या भावविश्वात खळबळ माजली असेल, यात शंका नाही. मनोरंजनाच्या या गोळीच्या आड एकतेचं एक स्वप्न दडलं आहे. हे स्वप्न त्यांना सहजी झेपणारं नाही. उभय देश एकत्र येणं ही (अर्थातच त्यांच्यामुळे) अशक्य कोटीतील बाब आहे. तरीही काही प्रमाणात सुधारणा घडाव्यात असं कबीरसारख्यांना वाटत असेल, तर त्यांना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागेल. बजरंगी हा काल्पनिक असल्याने तसेच उभय देशांत निरंतर तणाव असल्याने या रम्य कल्पनेला एवढं महत्त्व द्यायची आवश्यकता आहे का, असा प्रश्नही उपस्थित होऊ शकतो. शिवाय, आपण वेळोवेळी त्यांच्यापुढे मदतीचा हात पुढे करूनही आजवर आलेले अनुभव फारच संतापजनक व भयंकर आहेत, हेही खरे. त्यामुळे चेंडू आता त्यांच्या कोर्टात आहे. यातले रोमहर्षक प्रसंग पाहताना तिथल्या सिनेमागृहांतही टाळ्या व शिट्टय़ांचा गजर होत असेल; प्रश्न हा आहे की असं प्रत्यक्ष करायची वेळ आली तर त्यांची भूमिका काय असेल? किंवा हेच कथानक उलटय़ा पद्धतीने घडणं शक्य आहे का? या प्रश्नांची उत्तरं नकारार्थी आहेत. पाकिस्तानमध्ये आज तरी तसं वातावरण नाही. कबीरलाही याची जाणीव आहे, म्हणूनच या सिनेमाचं चित्रीकरण तिकडे करण्याचा विचारही त्याने केला नाही. राजस्थान, एन. डी. स्टुडिओ- कर्जत, पनवेल (सलमान खानचं फार्म हाउस) आणि काश्मीर येथे हे पाकिस्तान उभं करण्यात आलं आहे.
सतत अकारण भारतद्वेष करणं हा पाकिस्तानचा नेहमीचा अजेंडा. त्यात तेथील राजकारणी तर चार पावलं पुढेच. त्यांच्या सत्तेचा पायाच मुळी भारताचा तिरस्कार करणं हा. या राजकारण्यांवर तेथील सर्वसामान्य नागरिकांचा बिलकूल अंकुश नाही. या पाश्र्वभूमीवर कबीरने हे एकतेचं स्वप्न विकलं आहे. या सिनेमाला डोक्यावर घेऊन पाकिस्तान्यांनी त्यांच्या नेत्यांच्या द्वेषमूलक धोरणांना काहीसं आव्हान दिलं आहे, असं मानणं धाडसाचं ठरणार नाही. घुसमटीच्या चौकटीतून बाहेर पडण्यासाठी त्यांना बजरंगीचं बोट धरूनच पुढे जावं लागेल, हे बोट अव्हेरल्यास कडेलोट अटळ आहे.
अनिरुद्ध भातखंडे – response.lokprabha@expressindia.com

First Published on August 7, 2015 1:12 am

Web Title: bajrangi bhaijaan
Next Stories
1 सलमानचा रिब्रॅण्डिंगचा यशस्वी प्रयोग
2 ‘माऊण्टन मॅन’चा बायोपिक
3 प्रयोग फ्यूजनचे
X
Just Now!
X