उन्हाचा पारा जसजसा वाढत जातो तेव्हा त्याच्या दुष्परिणामापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे मार्ग निवडावे लागतात. पण काही वेळा हेच उन आपल्यासाठी उपयोगाचे ठरते, उदा. सौरऊर्जेच्या स्वरूपात. सर्वसामान्य लोक सौरऊर्जेचा वापर सहजरीत्या रोजच्या जीवनात करत नसले तरी अशा तळपत्या उन्हाचा वापर खास करून एप्रिल-मेमध्ये वाळवण करण्यासाठी होतो.

बारा महिने लागणारे कडधान्य, मसाले आणि काही पदार्थ या उन्हात वाळवून जास्तीत जास्त काळाकरिता टिकवण्यात येतात. शहरी भागातून फार प्रमाणात वाळवण दिसत नसले तरी गावाकडे आणि निमशहरी भागाकडे वाळवण करताना दिसतात. वाळवण करण्यासाठी लागणारी जागा पुरेशी उपलब्ध असणे गरजेचे आहे. पण सध्या ही जागा सगळ्यांना सहजासहजी उपलब्ध होत नाही. कारण पूर्वीच्या काळी वाळवण करण्यासाठी असलेली हक्काची जागा म्हणजेच अंगण अगदी दुर्मीळ झालेली आहे. खरे तर आजच्या पिढीतील मुलांना अंगण म्हणजे काय, हा प्रश्न पडतो.

loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!
house burglars
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात
beauty tips in marathi get rid of dark neck
Beauty tips : मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी काय करावे, काय नको? पाहा ‘या’ टिप्स
contractor arrest in warehouse wall collapse accident
वसई : गोदामाची भिंत कोसळून दुर्घटना: ठेकेदाराला अटक, अनधिकृत बांधकामे रोखण्यास पालिका अपयशी

घरापुढे असलेल्या मोकळ्या जमिनीला अंगण म्हणतात. जे पूर्वी अगदी सहजरीत्या बहुतेक घरापुढे दिसत असे. खास करून गावाकडील घराकडे आणि क्वचित करून निमशहरी घरापुढे दिसत असे. या अंगणाची व्याख्या प्रत्येक घरानुसार, आकारानुसार बदलत जाते. पूर्वीच्या काळी घर बांधताना अंगणासाठी खास करून जागा ठेवण्यात येत असे आणि तीच जागा घरातील अविभाज्य भाग बनून जात असे. या अंगणाचेही स्वत:चे असे विश्व असते असे म्हटले तरी चालेल.

या अंगणाचा अविभाज्य घटक म्हणजे तुळस आणि विहीर. तुळस आणि विहिरीचे वास्तव्य घराच्या बाहेर असले तरी त्याच्या वास्तव्यामुळे अंगणाची आणि घराची शोभा वाढे. या दोघांच्या बरोबरीने एखादे पारिजातकाचे झाड असे. सकाळच्या प्रहरी पारिजातकाच्या फुलांच्या सडय़ामुळे वातावरण प्रसन्न वाटे. काही ठिकाणी सकाळच्या प्रहरात तुळशीची पूजा केली जात असे, त्याचप्रमाणे विहिरीची नित्यनियमाने पूजा केली जात असे.

दैनंदिन जीवनात प्रत्येक कामामध्ये अंगणाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वापर केला जात असे. अगदी सकाळी लागणाऱ्या कोवळ्या उन्हापासून ते रात्री लागणाऱ्या शेकोटीपर्यंत. मुलांना खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी क्वचित एखादा पाळीव प्राणी बांधण्यासाठी, वेळप्रसंगी रात्री झोपण्यासाठी, दिवाळीत अभ्यंगस्नानासाठी किल्ला बांधण्यासाठी, फटाके लावण्यासाठी. तसेच कडधान्ये वाळवण्यासाठी इत्यादी. उन्हात ठेवलेल्या वस्तूवर किंवा पदार्थावर लक्ष ठेवण्याचे काम लहान मुले हातात काठी घेऊन उत्साहात करत असत.

एखाद्या घरचे पापड-फेण्या करण्याचासुद्धा एक प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम असे. शेजारी असलेला स्त्री-वर्ग आपापले पोळपाट-लाटणे घेऊन मदत म्हणून हजर होत असत. काही वेळा घरातील छोटे मोठे कार्यक्रमसुद्धा या अंगणात केले जात असत. उदा. मुंज, साखरपुडा, हळद यांसारखे कार्यक्रम आणि वेळप्रसंगी लग्न अंगणात होत असत. अशा प्रसंगी अंगणामध्ये मांडव घालून त्याला सजवले जात असे. त्याच मांडवात जेवणाच्या पंगती उठत. त्याचप्रमाणे काही वेळा सार्वजनिक सभा समारंभही याच अंगणात होत असत.

याच अंगणाचा वापर कल्हईवाला, गादी करणारा, पत्र्याचे डबा तयार करणारा, धार करणारा दारावरील फेरीवाला आपल्या व्यापाराची जागा म्हणून करत असे. तर सकाळच्या प्रहरी येणारे वासुदेव, पिंगळा आपली कला याच अंगणात सादर करत. काही वेळा उन्हाळ्यात उन्हाची झळा घरामध्ये पोहोचू नये म्हणून अंगणात मांडव घालत असत.

साधारपणे दरवर्षी, खास करून पावसाळ्यात जमीन खराब झाल्यावर, दिवाळी-दसऱ्याच्या दरम्यान अंगणाची जमीन नवीन केली जात असे. जमीन करण्याची पद्धत ठरलेली असे आणि जमीन तयार करण्यासाठी लागणारे लोकही ठरवलेले असत. जमीन करण्यासाठी संपूर्ण जमीन उकरली जात असे, त्यावर नव्याने माती टाकून एकसारखी करत असत आणि पाण्याच्या साह्याने जड असणाऱ्या चोपणीने चोपत असत. (चोपणी म्हणजे जमीन करण्यासाठी वापरण्यात येणारे साधन जे लाकडापासून बनवण्यात येते. जे साधारण एक ते दीड फूट लांब आणि पाच ते सात इंच रुंद असते व त्याची जाडी दीड ते दोन इंच असते, त्याला धरण्यासाठी मूठ असते.) शेणाने सारवून सुंदर रांगोळी काढली जात असे, या सगळ्यासाठी साधारण आठवडा लागत असे. अंगण आणि घर यांच्या मधल्या भागाला पडवी म्हणतात. अशाच वेगवेगळ्या कारणांसाठी वापरला असे; उदा. दळणवळण काढणे, धान्याचे निवड टिपण करणे, झोपाळा लावण्यासाठी इत्यादीसाठी पडवीचा वापर केला जात असे.

काळानुसार जागेअभावी घराच्या रचनेमध्ये बदल झाल्यामुळे अंगण संस्कृती मागे पडली आहे. अंगणात दिसणारी तुळसही आता बाल्कनीत किंवा टेरेसमध्ये टांगलेली दिसते तिच्या आकार-प्रकारामध्ये बदल झालेले दिसून येतात. विहीर स्थापत्यकलेचा सुंदर अविष्कार जो अतिशय दुर्मीळ होत चाललेला आहे. पापड-फेण्या या तर बाजारात मिळतात. मुले अंगणात न खेळता कॉम्पुटरवर खेळतात किंवा शिबिरामध्ये जातात. लग्न-मुंज यांसारखे कार्यक्रम एखाद्या हॉलमध्ये होतात. काही प्रसंगी अंगणाची जागा आता बाल्कनी-टेरेस घेऊ  पाहत आहे. काही वेळा काळाबरोबर चालण्यासाठी, राहण्यासाठी बदल हे अपरिहार्य असतात.
दीप्ती वीरेंद्र वारंगे – response.lokprabha@expressindia.com