14 August 2020

News Flash

सोल्युशन का पता नहीं!

मोसमी पावसाआधी गेले तीन महिने करोनाकहराच्या बातम्यांचा पाऊस ई-पेपर (या आठवडय़ापासून सुरू झालेली छापील वर्तमानपत्रे) आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून सतत सुरू आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

मोसमी पावसाआधी गेले तीन महिने करोनाकहराच्या बातम्यांचा पाऊस ई-पेपर (या आठवडय़ापासून सुरू झालेली छापील वर्तमानपत्रे) आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून सतत सुरू आहे. एवढा की, आता सामान्यजनांची अवस्था ‘कन्फ्युजन ही कन्फ्युजन है’ अशी झाली आहे.. कारण एकापाठोपाठ येणाऱ्या बातम्या गोंधळ उडवणाऱ्या असतात. गेल्या दोन दिवसांत वाहिन्या आणि वर्तमानपत्रे या सर्वानीच दिलेल्या तीन बातम्या वानगीदाखल घेता येतील.

पहिली बातमी म्हणजे करोनाग्रस्तांची संख्या गेल्या पाच दिवसांमध्ये सातत्याने वाढतेच आहे. अनेक देशांना वेगात मागे टाकत आपण पुढे चाललो आहोत. यातही मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या देशभरात सर्वाधिक आहे. चीनमधील ज्या वुहान शहरातून करोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली, तेथील करोनाग्रस्तांच्या संख्येलाही (५० हजार ३३३) बुधवारी मुंबईने (५२ हजार ६६७) मागे टाकले. दुसरी एक बातमी असे सांगणारी होती की, राज्यात मृत्यू पावलेल्यांची आजवरची सर्वाधिक संख्या १४९, १० जून रोजी होती. यापूर्वी ५ जून रोजी सर्वाधिक म्हणजे १३९ मृत्यू झाले होते. मुंबईच्याही बाबतीत सर्वाधिक मृत्युसंख्या त्याच दिवशी ९७ होती. तर यापूर्वी मुंबईत २४ तासातील सर्वाधिक मृत्युसंख्या ८ जून रोजी ६४ होती. मुंबईचा करोना मृत्युदर हा पूर्वी ३.२ टक्के होता तो आता ३.६ टक्के एवढा झाला आहे. म्हणजेच तो वाढतो आहे.  या बातम्या आपला प्रवास चिंताजनक दिशेने सुरू असल्याचे सांगणाऱ्या आहेत. मात्र त्याच वेळेस तिसरी बातमी दिलासादायक वाटावी अशी. ती म्हणजे, १० जूनला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेली आकडेवारी. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येने (एक लाख ३५ हजार २०५); करोनाग्रस्तांच्या संख्येला (एक लाख ३३ हजार ६३२) आता मागे टाकले आहे. करोनामुक्त होणाऱ्यांची आकडेवारी आता ४८.९९ टक्के आहे. पलीकडच्या बाजूस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर भारत आणि चीनबाबत जाहीर विधानच केले आहे की, या दोन्ही देशांतील चाचण्या वाढवल्या तर तेथील करोनाबाधितांची संख्या जगात सर्वाधिक असेल. एरवी ट्रम्प महाशयांना ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत हा मुद्दा वगळता फारसे गांभीर्याने घेण्याचे कारण नाही. मात्र या खेपेस त्यांच्या मुद्दय़ामध्ये तथ्य अधिक असण्याची शक्यता आहे, असे लक्षात येते.

कुणी सांगतेय मृत्युदर वाढतोय. कुणी सांगतेय करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढते आहे. प्रत्यक्षात रोज करोनाग्रस्तांची संख्या अनेक पटींनी वाढताना दिसते आहे तर कुणी सांगतेय आता रुग्णसंख्या दुप्पट होण्याच्या कालवधी वाढला आहे, या साऱ्याचा अर्थ सामान्यांनी कसा लावायचा.. कारण कन्फ्युजन ही कन्फ्युजन है!

या साऱ्याचे कारण आपल्या शिक्षणामध्ये आहे. आपल्याला शाळेत आलेखवाचन केवळ २० गुणांपलीकडे कधीच नसते. अनेकदा तर ते १० गुणांसाठीच असते. मग आकडेवारी आणि त्याचा अन्वयार्थ सांगणार कोण? शाळेत गणिताच्या तासाला ‘अवयव पाडा’ ही गणिते घालणारे शिक्षकही अवयव का पाडायचे, त्याचा आपल्या आयुष्याच्या गणिताशी काय संबंध आहे हे कधीच सांगत नाहीत. मग आकडेवारी वाचायला कळणार तरी कशी? आकडे खोटे नसतात पण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्याचा वापर करतो; कुणी त्यांचे राजकारण करतो तर कुणी स्वतचीच पाठ थोपटून घेतो. मात्र या जंजाळात आकडय़ांपासून जे शिकायचे ते आपण शिकतच नाही. कारण आकडेवारी  ही आपले शिक्षण असते. पण त्यातून योग्य तो धडा न घेतल्याने मग आपली अवस्था ‘सोल्युशन का पता नहीं’ अशी होते. आकडेवारी आपलीच असते, आपल्याकडेच असते मात्र आपण जगभरात लस तयार होईल नंतर ‘सोल्युशन’ सापडेल या भ्रमात राहातो. आकडेवारी समजून घेणे आणि त्यातली मेख व त्यातच असलेले ‘सोल्युशन’ ओळखणे हा करोनाकाळातील घ्यावयाचा मुख्य धडा असेल!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2020 7:17 am

Web Title: coronavius pandemic confusing news about corona mahitartha dd70
टॅग Coronavirus
Next Stories
1 कै सी तेरी खुदगर्जी?
2 सावधपण सर्वविषयी!
3 येरे माझ्या मागल्या!
Just Now!
X