आनंदाचे मर्म!

अ‍ॅनिमेशन कलेचा वापर चांगल्या पद्धतीनेही केला जाऊ शकतो.

वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होणारी व्यंगचित्रे नकळत आपल्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटवून जातात तर कधी आपल्यालाच एक बोचरा चिमटाही काढतात. पूर्वीची पिढी वाढली ती या व्यंगचित्रांसोबत; पण ८०-९० च्या दशकातील आणि त्यानंतरची पिढी वाढली ती अ‍ॅनिमेटेड पात्रांसोबत. मग ते कधी पक्षी होते, कधी प्राणी तर कधी अमानवी शक्ती असलेली माणसंच. कोणत्या ना कोणत्या अ‍ॅनिमेटेड पात्राच्या प्रेमात नाही, असे मूल आता शोधूनही सापडणार नाही. मुलांचे भावविश्व व्यापून उरणाऱ्या या पात्रांचीच एक भव्य बाजारपेठ जगात उभी राहिली; त्याच वेळेस दुसरीकडे पालकवर्गाला आपल्या मुलांना एका जागी शांत बसविण्यासाठीचा उपायही सापडला होता, तो या कार्टून्सच्या रूपात. हलते, बोलते आणि प्रसंगी विनोदी असे काही आहे, त्यात मुले रमतात हे पालकांच्या लक्षात आले. मुलांना कार्टून लावून दिले की, आपल्यामागे फार कटकट नाही, असे म्हणून पालकवर्गाने त्याचा आसरा घेतला. परिणामी नंतर त्या निखळ आनंदाचे रूपांतर व्यसनाच्या दिशेने कसे होऊ लागले ते पालकांना कळलेही नाही. मग एवढा वेळ काय ते कार्टून पाहायचे? काय आहे त्यात एवढे? अभ्यास कोण करणार? इत्यादी प्रश्न मुलांनाच ऐकावे लागले. आक्रमक कार्टून पाहून मुलेही आक्रमक होत असल्याच्या, उर्मटपणा वाढल्याच्या तक्रारी सुरू झाल्या. पण त्याला जबाबदार पालकवर्गच होता. खरे तर निखळ आनंदाचे निधान असलेली कार्टून्स मुलांसोबत पाहिली असती तर त्यातून त्यांनी काय पाहायचे आणि काय नाही, याचा रिमोट आपल्या हाती ठेवता आला असता. सोबत असतो तर डिस्कव्हरी किंवा नॅशनल जिओग्राफिकची आवड लावणेही आपल्याच हाती राहिले असते.

..मात्र आपण रिमोट मुलांच्या हाती दिला आणि त्यानंतर मुलांचा भरपूर वेळ त्यातच जाऊ लागला. पुढच्या पिढीत ते सारे गेमिंगपर्यंत पोहोचले आणि आता गेमिंगचे व्यसन झाले आहे. त्यात किती वेळ जातो, याचे भानच राहत नाही, मुलांना तर सोडाच थोरांनाही राहत नाही. मग वेळ मिळेल तेव्हा मोबाइल किंवा कॉम्प्युटरवर गेम्स आणि ते खेळण्याची संधी नाही मिळाली तर त्यातून येणारी अस्वस्थता, चिडचिडेपणा, झोप न येण्यासारखे विकार सारेच मागे आले. गेमिंगमध्ये वेळ गेला की, इतरत्र वेळ चांगल्या पद्धतीने घालविण्याची शक्यताच आपण संपुष्टात आणतो.

अ‍ॅनिमेशन कलेचा वापर चांगल्या पद्धतीनेही केला जाऊ शकतो. माणूस आणि प्राणी यांचा संकर शक्य नाही हा विषय अतिशय संवेदनशीलतेने ‘मोगली’मध्ये हाताळला गेला. प्रत्येक कथेत बोध असण्याची काही गरज नाही. निखळ आनंदाचे निधान हेही त्याचे मर्म असू शकतेच. अशा निखळ गोष्टी अनुभवतानाच मेंदूतील डोपामिन हे रासायनिक द्रव्य स्रवते आणि आनंदाची भावना निर्माण होते. धकाधकीच्या आयुष्यातील एक कोपरा हा असा निखळ आनंदासाठी असावा, हेच या ‘लोकप्रभा’ ‘कार्टून विशेषांका’चे प्रयोजन!
vinayak-signature
विनायक परब
vinayak.parab@expressindia.com, twitter – @vinayakparab

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Animation special issue

ताज्या बातम्या