News Flash

तंत्रज्ञान : स्मार्टफोन कॅमेरा – पर्याय आणि गरज..

कोणताही नवीन स्मार्टफोन घेताना आबालवृद्धांमध्ये महत्त्वाचा समजला जाणारा एक घटक म्हणजे स्मार्टफोन कॅमेरा!

आपल्या आयुष्यातील असंख्य आठवणी आवडीने टिपून ठेवण्यासाठी, एकेमकांच्या संपर्कात राहण्यासाठी किंवा अगदी सहज सेल्फी ट्रेण्ड फॉलो करण्यासाठी सर्वजण कॅमेरा पारखून घेतात.

स्वप्निल जोशी – response.lokprabha@expressindia.com

कोणताही नवीन स्मार्टफोन घेताना आबालवृद्धांमध्ये महत्त्वाचा समजला जाणारा एक घटक म्हणजे स्मार्टफोन कॅमेरा! आपल्या आयुष्यातील असंख्य आठवणी आवडीने टिपून ठेवण्यासाठी, एकेमकांच्या संपर्कात राहण्यासाठी किंवा अगदी सहज सेल्फी ट्रेण्ड फॉलो करण्यासाठी सर्वजण कॅमेरा पारखून घेतात. विविध ब्रॅण्ड्सची उत्पादने, ऑनलाइन खरेदीची संकेतस्थळे ते अगदी शहरातील मोबाइल दुकानदारापर्यंत कु ठेही गेलात तरी तेथील कर्मचारी या स्मार्टफोन कॅमेऱ्याची महती सांगतात, परंतु त्यांनी वापरलेले बरेच तांत्रिक शब्द काहीसे अवघड वाटून शेवटी आपण ते जे सांगतील त्यावर विश्वास ठेवून ‘चांगला कॅमेरा’ किंवा ‘एकापेक्षा अधिक कॅमेरा’ असणारा स्मार्टफोन खरेदी करतो. स्मार्टफोन कॅमेऱ्याबद्दल असणाऱ्या अशाच काही तांत्रिक बाबी आणि स्मार्टफोन कॅमेऱ्याचा प्रभावी उपयोग कसा करता येईल ते सध्या शब्दांत पाहू या.

मेगापिक्सल : एखाद्या फोनला किती मेगापिक्सलचा कॅमेरा आहे त्यावरून बरेच अंदाज आपण बांधत असतो त्यातील मुख्य बाब म्हणजे जेवढे जास्त मेगापिक्सल तितका चांगला फोटो येणार असा काहीसा समज आहे. ढोबळमानाने हे जरी योग्य विधान असलं तरी तांत्रिकदृष्टय़ा पूर्ण खरं आहे असं म्हणता येणार नाही. मुळात मेगापिक्सल म्हणजे काय यासाठी आलेख कागद (ग्राफ पेपर) हे योग्य उदाहरण ठरेल. या कागदावर असणारा सगळ्यात छोटा चौकोन म्हणजे एक पिक्सल! आता एक मेगा पिक्सल म्हणजे असे १० लाख चौकोन असतात. हे १० लाख चौकोन ज्या एका चौकोनात बसवले जातात ज्याला ‘कॅमेरा सेन्सर’ म्हणतात. जेवढे जास्त मेगापिक्सल तेवढा चांगला आणि सुस्पष्ट फोटो येण्यासाठी सेन्सरचा आकारही तेवढाच मोठा असणं आवश्यक आहे नाही तर छोटय़ा सेन्सरवर अधिक पिक्सल काहीसे छोटे करून बसवले तर फोटो फारसे स्पष्ट आणि चांगले येत नाहीत. सध्या बाजारात ५ ते १०८ मेगापिक्सलपर्यंतचा कॅमेरा असणारे स्मार्टफोन उपलब्ध आहे. संशोधनानुसार आपल्याला जन्मत: मिळालेला कॅमेरा म्हणजेच आपले डोळे हे साधारण ५७६ मेगापिक्सल क्षमतेचे आहेत!

अ‍ॅपर्चर : कॅमेरा स्पेसिफिकेशनमध्ये एफ हे इंग्रजी अक्षर आणि त्यापुढे दशमान पद्धतीत अंक लिहिलेले असतात, ज्याला अ‍ॅपर्चर म्हणतात. ज्यावेळी आपण फोटो क्लिक करतो तेव्हा कॅमेरा लेन्सची आपल्या डोळ्याप्रमाणेच क्षणार्धात उघडझाप होते. लेन्स जेवढी जास्त उघडली जाईल तेवढा जास्त प्रकाश मिळतो आणि आपल्याला चांगला फोटो मिळू शकतो. लेन्स कमी उघडली गेली तर प्रकाश कमी येऊन फोटो अंधूक होऊ शकतो. एफ या अक्षरापुढे लिहिलेला अंक जेवढा लहान तेवढी लेन्स जास्त उघडली जाऊन अधिक प्रकाश आतमध्ये येतो आणि स्पष्ट फोटो येतो. याला ऋ/१.४, ऋ/२.८ अशा पद्धतीने लिहिले जाते.

एचडीआर (HDR) : याला  हाय डायनॅमिक रेंज म्हणतात. फोटो काढताना आपल्याला नेहमी प्रकाश एकसारखाच नसतो. म्हणजे आपण जर दिव्याचा फोटो काढत असू तर त्याच्या आजूबाजूचा किंवा खालचा भाग काहीसा अंधारा किंवा काळसर येतो तसंच जर आपण दिव्याखालील फोटो काढत असू तर दिवा फोटोमध्ये अधिक प्रकाशमान येतो. हे टाळण्यासाठी HDR ची मदत होते, ज्याद्वारे प्रकाश आणि सावलीचा समतोल सॉफ्टवेअरच्या माध्यमातून साधला जातो आणि आपल्याला स्थिर फोटो मिळतो. आजकाल बहुतांश स्मार्टफोन कॅमेऱ्यामध्ये ऌऊफ उपलब्ध आहे.

ओआयएस आणि ईआयएस : हे दोन घटक कॅमेऱ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. ओआयएस म्हणजे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन. ओआयएस हे हार्डवेअर वर आधारित असते. फोटो काढताना किंवा व्हिडीओ शूट करताना समजा आपला हात जरासा जरी हलला तर ब्लर फोटो येण्याची शक्यता असते, हीच हाताची हालचाल समजून त्याच्याविरुद्ध दिशेने कॅमेरा सेन्सर प्रत्यक्षात हलतो आणि आपल्याला स्थिर फोटो मिळतो. याउलट ईआयएस म्हणजे इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन हे सॉफ्टवेअरवर आधारित असते जे आपण फोटो काढल्यानंतर सॉफ्टवेअर प्रोग्रॅमच्या माध्यमातून त्याला स्थिर बनवते. यात कॅमेरा लेन्सची हालचाल होत नसल्यामुळे हे ओआयएसच्या तुलनेत कमी प्रभावी आहे.

ऑप्टिकल झूम, डिजिटल झूम आणि हायब्रीड झूम : नावाप्रमाणेच ऑप्टिकल झूम या प्रकारात कॅमेरा लेन्सची प्रत्यक्ष हालचाल होऊन झूमिंग कमी जास्त केल्यावर ती पुढे मागे सरकते ज्यामुळे झूम केल्यावर देखील चांगल्या दर्जाचे फोटो मिळतात. डिजिटल झूम या प्रकारात लेन्सची प्रत्यक्ष हालचाल न होता केवळ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपल्याला झूम केलेला फोटो मिळतो त्यामुळे या फोटोचा दर्जा अधिक झूम केले असेल तर तुलनेने कमी असतो. हायब्रीड झूम प्रणालीमध्ये ऑप्टिकल आणि डिजिटल झूम अशा दोन्हीचा वापर केलेला दिसतो म्हणजेच जर ५ झूम केलेले असेल तर त्यातील साधारण ३७ हे ऑप्टिकल झूम असेल तर  उरलेले २ हे डिजिटल झूम असेल.

या झाल्या काही प्राथमिक गोष्टी. आता सध्या बाजारात एकापेक्षा अधिक कॅमेरा असणारे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. यातील प्रत्येक कॅमेरा लेन्स वेगवेगळी भूमिका बजावत असते. फोटो काढताना गरजेनुसार त्याचा वापर केल्यास उत्तम परिणाम दिसतात. यातील काही प्रकार खालीलप्रमाणे-

वाईड अँगल कॅमेरा : याचा वापर शक्यतो लँडस्केप किंवा जास्त रुंदी फोटोमध्ये सामावून घेण्यासाठी केला जातो. या कॅमेराची लेन्स काहीशी अधिक गोलाकार असल्यामुळे तिच्याद्वारे अधिक रुंदीचा फोटो मिळतो.

टेलीफोटो कॅमेरा : याद्वारे आपल्याला दूर असणाऱ्या गोष्टीचा फोटो स्पष्टपणे काढता येतो, यामध्ये ओआयएस सारख्या तंत्राचा वापर करून चांगल्या दर्जाचे फोटो आपल्याला मिळतात.

मॅक्रो लेन्स : मॅक्रो लेन्स कॅमेरा हा टेलीफोटो कॅमेराच्या विरुद्ध म्हणजेच आपल्या जवळ असणाऱ्या आणि विशेषकरून आकाराने लहान गोष्टीचे मोठय़ा आकारात फोटो काढण्यासाठी वापरला जातो.

टीओएफ (पोट्र्रेट कॅमेरा) : टाईम ऑफ फ्लाईट कॅमेरा हा पोट्र्रेट मोडमध्ये वापरला जातो. यामध्ये इन्फ्रारेड तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे कोणती गोष्ट ठळक (फोकस्ड) ठेवायची हे कॅमेरा ठरवू शकतो. सर्वात प्रचलित असा ‘बॅकग्राउंड ब्लर’ हा प्रकार टीओएफद्वारे साध्य करता येतो.

यानंतर आता कॅमेरामध्ये उपलब्ध असणाऱ्या काही सॉफ्टवेअर मोड्स बद्दल पाहूया. हे पूर्णत: प्रोग्रॅम्स आणि अल्गोरिदमचा वापर करून फोटोचा दर्जा सुधारतात.

एआय मोड : हा सध्या काहीसा प्रसिद्ध पर्याय आपल्याला स्मार्टफोन्समध्ये पाहायला मिळतो. यामध्ये कॅमेरा समोरील दृश्यानुसार प्रकाश आणि सावली तसेच कोणती गोष्ट ठळक ठेवायची, कोणती ब्लर करायची हे आपोआपच सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ठरवतो. आपल्याला जर चटकन एखादा फोटो घ्यायचा असेल तर एआय म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मोड प्रभावी ठरतो.

नाईट मोड : यामध्ये रात्रीच्या वेळी फोटो काढताना सॉफ्टवेअरच्या माध्यमातून फोटोमधील पिक्सल्सचा ब्राईटनेस वाढवला जातो, ज्यामुळे फोटोमध्ये अधिक प्रकाश येतो. सॉफ्टवेअरद्वारे फोटो काढल्यावर त्यावर प्रक्रिया होत असल्यामुळे या मोडमध्ये फोटो काढताना हात अधिक स्थिर ठेवावा लागतो, अन्यथा फोटो ब्लर येण्याची शक्यता असते.

प्रो अथवा मॅन्युअल मोड : याचा वापर प्रोफेशनल फोटोग्राफर किंवा ज्यांना कॅमेरा चांगल्या प्रकारे हाताळायची सवय आहे असे लोक करतात. यात कॅमेराचे सेटिंग हे प्रकाश आणि बाकी इतर बाबी विचारात घेऊन आपल्याला स्वत: करावे लागते. त्यामुळे याद्वारे खूप चांगल्या दर्जाचे फोटो मिळत असले तरी कॅमेरा सेटिंग योग्यप्रकारे माहीत नसल्यास फोटो बिघडण्याची शक्यतादेखील असते शिवाय यात वेळही बराच जाऊ शकतो.

टाइम लॅप्स : याचा वापर व्हिडीओसाठी केला जातो. सर्वसाधारणपणे व्हिडीओसाठी प्रति सेकंद ३० फ्रेम एवढा वेग असतो, टाईम लॅप्स प्रकारात एका सेकंदाला एकच फ्रेम मिळते म्हणजेच आपण ३० सेकंदाचा व्हिडीओ शूट केला असता तो एकच सेकंदात प्ले होऊन संपेल.

स्लो-मोशन : टाईम लॅप्सच्या अगदी विरुद्ध आहे. यामध्ये आपल्याला एका सेकंदात ३० फ्रेम ऐवजी सुमारे २४० फ्रेम्स मिळतात म्हणजे आपला व्हिडीओ अत्यंत संथ गतीने आपल्याला पाहायला मिळतो.

स्मार्टफोन कॅमेरा पारखून घेण्याच्या आणि वापरण्याच्या काही टिप्स :

मेगापिक्सलच्या आकडय़ाने भुलून न जाता सेन्सरचा आणि पिक्सल्सचा आकार जरूर तपासून घ्यावा.

परिस्थिती पाहून कॅमेरामधील योग्य मोड्सचा वापर करावा.

आपल्याला फोटो काढल्यावर त्यात काही सुधारणा करायच्या असल्यास (पोस्ट—प्रोसेसिंग) शक्यतो सेटिंग्जमध्ये जाऊन RAW या पर्यायामध्ये फोटो काढावेत.

एकापेक्षा अधिक कॅमेरा असणाऱ्या फोनमध्ये नेमका कोणता कॅमेरा कोणत्या मोडवर काम करतो ते समजून घ्या, जेणेकरून फोटो काढताना त्याचा प्रभावी वापर करता येऊ शकतो.

आपल्याला उत्तम दर्जाचे फोटो हवे असल्यास ओआयएस, ऑप्टिकल झूमसारखी फीचर्स असणारा स्मार्टफोन केव्हाही फायदेशीर ठरतो. केवळ सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित केले जाणारे पर्याय पुरेसे प्रभावी ठरत नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2021 1:55 pm

Web Title: smartphone camera option and need tantradnyan dd 70
Next Stories
1 राशिभविष्य : २ एप्रिल ते ८ एप्रिल २०२१
2 कोविडपेक्षाही भयानक
3 कव्हरस्टोरी : कठोर र्निबध की टाळेबंदी?
Just Now!
X