03 August 2020

News Flash

इतिहासाचा अभ्यास? कशासाठी?

इतिहास. शाळेतील अनेक विषयांपैकी एक विषय. ५०-१०० मार्काचा. त्यातही पुढच्या आयुष्यात, उच्च शिक्षणासाठी बहुतेकदा मदतीला न येणारा. तारखा, सन, इ.स.पूर्व आणि विविध कॅलेंडर्सच्या जंजाळात...

| March 6, 2015 01:18 am

इतिहास. शाळेतील अनेक विषयांपैकी एक विषय. ५०-१०० मार्काचा. त्यातही पुढच्या आयुष्यात, उच्च शिक्षणासाठी बहुतेकदा मदतीला न येणारा. तारखा, सन, इ.स.पूर्व आणि विविध कॅलेंडर्सच्या जंजाळात अडकलेला. या इतिहासाविषयी शाळा-शाळांतून मुलांची, पालकांची नाराजीच जास्त. कित्येकांचं ठाम मत तर असं की, ‘हे इतिहास-भूगोल असे विषय शाळेतून शिकवायचेच कशाला? आणि शिकवायचेच असतील तर त्याचे मार्क्‍स कशाला देता? उगाच आमच्या मुलांची टक्केवारी कमी होते ना?’

एकदा एका शाळेत मी शिव-चरित्राविषयी चार दिवसांची व्याख्यानमाला करत होतो. त्यातला एक दिवस. सिद्दी जौहरचा वेढा, शिवरायांचं पलायन, बाजीप्रभू देशपांडे यांचं बलिदान आणि ती पावन खिंड हा विषय होता त्या दिवशी. काय मुलं रंगली होती सांगू त्या इतिहासात. काही हळव्या मुलांना तर बाजीप्रभूंचे ते बलिदान ऐकून रडूच आलं. चक्क ते शिक्षकच म्हणाले, ‘‘अहो, तुमच्या कथेत मुलं किती रंगून गेली होती. हेच आम्ही वर्गात शिकवायला गेलो तर एका प्रश्नाचं उत्तर त्यांना येत नाही.’’
मग मी विचारलं, ‘‘सर, तुमचे प्रश्न कोणते? आणि तुम्ही त्यांना तो धडा नीट समजावून सांगितला का?’’
ते म्हणाले, ‘‘प्रश्न तर सोपे आहेत नं, सिद्दी जौहरने कोणत्या साली वेढा घातला? कोणत्या किल्ल्याला वेढा घातला? पन्हाळा या किल्ल्याची थोडक्यात माहिती कशी सांगाल? बाजीप्रभू देशपांडे शिवरायांना काय व का म्हणाले? पन्हाळगड व विशाळगड या दोन किल्ल्यांतील अंतर किती आहे? एकदा वर्गात मी धडा वाचून दाखवला नं त्यांना. त्यात समजवायचे काय?’’
मी डोक्याला हात लावला. आपण इतिहासात खरोखर घडलेला एक अद्भुत प्रसंग जर मुलांना नीट सांगितला नाही, तिथे घडलेल्या घटनेची, युद्धाची नकाशा बनवून जराही माहिती दिली नाही, ते ठिकाण मुलांना सहलीच्या निमित्ताने दाखवले नाही तर कशी मुलं त्या इतिहासाशी समरस होणार?
असं काहीच होत नाही त्यामुळे या देशातील भव्य आणि महान इतिहासाशी मुलांची नाळ तुटू लागलीय. आपल्या देशातील अतिभव्य मंदिरे, अत्यंत पुरातन बंदरे, स्थापत्यकला, शिल्प-चित्र संगीत आणि नृत्य कला, प्राचीन महाविद्यालये, एकेकाळी प्रगत असणारी विविध शास्त्रे हे अनेक पालकांना, शिक्षकांनाही माहीत नाही. आमच्या देशात गणित, खगोलशास्त्र, विज्ञान, शरीरशास्त्र, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, यंत्रशास्त्र यांत अनेक अचूक सिद्धांत मांडले गेले जे आजही परकीय अभ्यासक अभ्यासत आहेत आणि ‘हे सगळं त्या काळी या माणसांना कसं कळलं?’ या विचाराने अचंबित होताहेत. मात्र हे आपल्या देशातील आजच्या अनेक पालकांनाच, शिक्षकांना जिथे माहीत नाही तिथे ते मुलांना कसं ठाऊक होणार?
भारताच्या इतिहासातील अनेक अमूल्य गोष्टी ज्या इंग्रजांनी जगासमोर आणल्या त्यांनीच ते सर्व ज्ञान भारतीयांपासून दूर ठेवलं, कारण ती त्यांच्या सत्तेची गरज होती. पण मग आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तरी आपण काय केलं? आपल्याला सोईस्कर असा इतिहास विविध सरकारांकडून मात्र लिहिला गेला तो फक्त राजकीय फायदे-तोटे पाहूनच. तरीही जेव्हा जेव्हा शाळा-कॉलेजच्या सहली विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी देतात, तेव्हा त्या मुलांचं मन मोहरून येतं. कारण शेवटी आपल्या देशाशी, आपल्या मातीशी, इथल्या प्राचीन घटनांशी, पूर्वजांशी कुठे तरी आपलं नातं असतंच. मात्र ते नातं जोडून देण्याचं काम पालकांनी आणि शिक्षकांनी करायला हवं. इथे इतिहासाचा अभ्यास कामाला येतो.
बाकीच्या जगाचं राहू दे, आपण किमान आपल्या देशाचा विचार करू. कारण जगातील इतरांच्या तुलनेत सर्वात जुनी नागरी व्यवस्था (civilisation) आपल्या भारतात होती. गेली ४-५ हजार र्वष या देशातील लोक कसे राहत होती? त्यांच्या वेशभूषा, अन्न-संस्कृती, राहणीमान, घर व नगरबांधणीचं ज्ञान, संरक्षण व्यवस्था, उपजीविकेची साधनं, त्यांचे गुण-दोष काय होते, हे सगळं अभ्यासणं विस्मयकारक आहे.
कोणत्या काळात कोणती चांगली घटना घडली? कोणती वाईट घटना घडली, त्या-त्या वेळी आपले पूर्वज कसे वागले, त्यांनी जर योग्य निर्णय घेतले तर त्याचा त्यांना कसा फायदा झाला? त्यांच्या चुकीमुळे कशा आपत्ती आल्या? जनजीवन कसं विस्कळीत झालं? नैसर्गिक आपत्तीच्या वेळी त्या काळी कशी दक्षता घेतली गेली? किंवा दक्षता नाही घेतली गेली? कोणत्या आक्रमकांनी आपल्या देशावर आक्रमण केले? त्याला आपण कसे तोंड दिले? इथली पाणी-संस्कृती कशी होती? इथली वन-संस्कृती कशी होती? धातूंचा वापर कसा होत होता? त्याची शुद्धता कशी तपासली जात होती? या सगळ्याचा माणूस जेव्हा अभ्यास करतो तेव्हा ते सगळं फक्त मार्क्‍स मिळवण्यासाठी असतं का? यातून आपल्याला काहीच प्रेरणा मिळत नाही का? आपल्या पूर्वजांच्या चुका पाहताना नवीन काही शिकता येतं हे आपल्याला कळत नाही का?
अशा इतिहासातून प्रेरणा मिळत असते. फक्त तो इतिहास कुणी तरी सोप्या भाषेत, सुसंगत पद्धतीने मांडायला हवा. कोणाच्या राग-लोभाची पर्वा न करता अत्यंत स्पष्टपणे सांगायला हवा. पुराव्यानिशी मांडायला हवा. तेव्हा कुठे तो इतिहास केवळ एक सनावळी न उरता आपल्या मनात झिरपतो आणि मगच माणसांना प्रेरणा मिळू शकते.
इतिहास हा केवळ महापुरुषांचा, समाजात प्रतिष्ठा मिळवलेल्यांचाच नसतो. तर इतिहास सर्वसामान्य जनतेच्या कष्टांचा, सुख-दु:खांचा, पराक्रमाचा, त्यागाचा, कलंकांचा, वाईट वर्तनाचा, निसर्गापुढील हतबलतेचा, संकटातून नवीन रस्ता शोधणाऱ्यांचासुद्धा असतोच. तोसुद्धा अभ्यासला गेला पाहिजे. दुसरी एक सर्वमान्य समजूत अशी की इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते. ज्या वेळी एखाद्या घटनेला आपल्याला सामोरं जावं लागतं, त्या वेळी आपण इतिहास अभ्यासला असेल, तशीच घटना आपल्याला माहिती असेल, त्या लोकांनी काय चूक किंवा बरोबर केलं हे माहीत असेल तर आपल्यालाही त्या प्रकारे चट्कन निर्णय घेता येतो. इथे इतिहास तुम्हाला अक्षरश: ‘रेडीमेड उत्तरं’ समोर आणून देत असतो. मात्र एक तर आपल्याला त्याची जाणीव नसते किंवा आपण बेपर्वा असतो.
लहानगी, चिमुरडी मुलंसुद्धा ऐतिहासिक ठिकाणी किती रमून जातात. फक्त आपण त्यांना तिथं न्यायला हवं. सुदैवानं महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या देशात अशी लाखो ठिकाणं आहेत ज्यांचाशी कुठला ना कुठला ऐतिहासिक संदर्भ जोडला गेलाय. त्या ठिकाणाचं जतन करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. आजूबाजूचा इतिहास समजावून घेण्यापेक्षा, तिथे मुलांना घेऊन जाण्यापेक्षा आपली मुलं चकचकीत मॉलमध्ये कृत्रिम खेळण्यांशी खेळायला पाठवण्यात आपली इतिकर्तव्यता दिसून येत आहे.
दुर्दैवाने ‘आमच्या या देशाने कुणावर कधी आक्रमणं केली नाहीत’ असं छाती फुगवून सांगणारे, ‘आमच्या इतिहासाचं विस्मरण झाल्याने, आणि आपण त्याच त्याच चुका पुन्हा केल्याने गेल्या हजारो वर्षांत परकीयांची हजारो आक्रमणं भोगली’ हे कधीच आम्हाला सांगत नाहीत.
जो देश आपला इतिहास विसरतो, त्यातल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सावध व सज्ज राहत नाही, स्वत:ला काळाप्रमाणे बदलून बलशाली बनवत नाही त्या देशाला स्वतंत्र राहण्याचा अधिकार टिकवता येत नाही हे एक जागतिक सत्य आहे.
आज जेव्हा देश काही नव्या बदलांना सामोरा जात आहे, तेव्हा आपण आपला इतिहास अभ्यासणं व त्यातील उत्तम ते स्वत: अंगीकारणं आणि पुढच्या पिढीकडे सोपवणं ही काळाची गरज बनली आहे. अन्यथा इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही.!
सुधांशु नाईक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2015 1:18 am

Web Title: studying history
टॅग Study,Vachak Lekhak
Next Stories
1 कॅमलची पावले
2 कथा : तिचे मन… त्याचे मन
3 दि. ६ ते १२ मार्च २०१५
Just Now!
X