वर्ष २०१४ सरले आणि २०१५ ची सुरुवात झाली. गेल्या वर्षभरात टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात अनेक बदल घडले, खरं तर टेक्नॉलॉजी बदलायला वर्ष लागत नाहीत, ती दिवसागणिक बदलतच असते, पण तरीही गेल्या वर्षभरात अनेक नवनवीन गॅजेट्स बाजारात उपलब्ध झाले. खऱ्या अर्थाने स्मार्ट इयर ठरलेल्या वर्षांत सर्वाधिक आणि मोलाची क्रांती घडली ती स्मार्टफोनच्या क्षेत्रात. प्रत्येकाच्या हाती आज स्मार्टफोन्स आहेत, यातच सारी कथा आली. पण सरत्या वर्षांतल्या बाबींबद्दल चर्चा करण्यापेक्षा आपण येत्या २०१५ मध्ये टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात काय काय बदल अपेक्षित आहेत, याचा एक छोटासा आढावा घेऊ या.

स्मार्टफोन्स :
स्मार्टफोन्स या क्षेत्रात वर सांगितल्याप्रमाणे गेले वर्ष हे क्रांतिकारी ठरले. सॅमसंग, मायक्रोमॅक्स, अॅपलसारख्या कंपन्यांनी आपला दबदबा कायम ठेवला होता, पण मोटोरोलासारख्या भारतीय बाजारपेठेतून बाहेर जाण्याच्या उंबरठय़ावर असणाऱ्या आणि जिओमीसारख्या चायनिज कंपन्यांनी ऑनलाइन-शॉपिंगचा सुधारस पिऊन भारतीय बाजारात आपले स्थान गडद केले आहे. त्यामुळे या वर्षभरातही ऑनलाइन-शॉपिंगचा फंडा स्मार्टफोन बाजारात महत्त्वाचा ठरणार आहे. या झाल्या बिझनेस गोष्टी. अगदी टेक्नॉलॉजीबाबत बोलायचे झाले तर कॅमेरा आणि युजर इंटरफेस या गोष्टीत काही मोलाचे बदल घडून येतील. आयफोनने मोबाइल कॅमेऱ्यामध्ये ऑप्टिकल झूमिंग उपलब्ध करून दिल्याने आता ही टेक्नॉलॉजी लवकरच इतरही देतील यात शंका नाही आणि मोबाइल कॅमेऱ्याची संकल्पना डिजिटल कॅमेऱ्यासारखी येत्या सहा महिन्यांत झालेली पाहायला मिळेल. युजर इंटरफेसमध्येही व्हॉइस रेकगनायझेशन साऱ्यांना उपलब्ध झाली खरी; परंतु त्यातील त्रुटींमुळे फारशी वापरली जाऊ शकत नाही आहे. या वर्षभरात या त्रुटींवर योग्य काम होऊन त्या सुस्वरूपात वापरात येतील अशी आशा आहे. या तंत्रज्ञानाद्वारे आता मराठी, हिंदी आणि सर्व प्रादेशिक भाषा जोडण्याचेदेखील काम चालू आहे आणि तेही वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कनेक्टिव्हिटी :
साऱ्या स्मार्ट अप्लायन्सना सोबत सहजरीत्या जोडून साऱ्यांना पूर्ण क्षमतेने वापरता येणे या तंत्रज्ञानावरही बरेच काम झाले असून वर्षांच्या पूर्वार्धातच हे तंत्रज्ञान आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. शिवाय साऱ्या स्मार्ट डिव्हाइसेसच्या बॅटरीची क्षमता हा सध्याचा मोठा प्रश्न आहे. सर्वच कंपन्यांनी हा ऐरणीवरचा प्रश्न म्हणून यावर काम करण्यास सुरुवात केली असून हा एनर्जी क्रायसिस संपलेला आपणास येत्या वर्षांत नक्कीच पाहावयास मिळेल. विंडोज १० आल्यानंतर विंडोज फोन्सही मोठय़ा प्रमाणात बाजारात येतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. याशिवायही थ्रीडी कॅमेरा, वायरलेस चार्जिग, स्क्रीन रिझोल्युशन, फोल्डिंग स्क्रीन, वॉटरप्रूफ फोन्स, या साऱ्यातही महत्त्वपूर्ण बदल येत्या वर्षांत पाहावयास मिळतील.
लॅपटॉप, पीसी :
या वर्षभरात पर्सनल कॉम्प्युटर आणि लॅपटॉप क्षेत्रातही चांगले बदल अपेक्षित आहेत, त्यासाठी इंटेल, असूससारख्या कंपन्यांची जोरदार तयारी चालू आहे. संगणकाचे हृदय असणारा प्रोसेसर आता काही पटींनी अधिक वेगवान आणि क्रियाशील करणे हा मुख्य उद्देश असणार आहे. याशिवाय संगणकामध्ये वायरलेस टेक्नॉलॉजीचा उगम कधीच झाला असला तरी अजिबात वायर नसलेला संगणक बनविणे हा प्रकल्प सध्या चर्चेत आहे. हा संगणक बॅटरीवर चालणार असून त्यासाठी वायरलेस चार्जिग टेबल घडविण्यात आला आहे. तसेच एक्स्टर्नल स्टोअरेज डिव्हाइस आणि मॉनिटरही वायरलेस टेक्नॉलॉजीने कनेक्ट करण्याची शक्कल इंटेल कंपनी घेऊन येत आहे. हे तंत्रज्ञान येत्या वर्षांचे वैशिष्टय़ ठरू शकते. याखेरीज गेमिंगसाठी सर्वोत्तम ग्राफिक्स उपलब्ध करून देणारे ग्राफिक कार्डस् हे आता संगणकात इनबिल्ड करण्यात येतील आणि गेमिंगची सर्वोत्तम अनुभूती होण्यासाठी त्या प्रतीचे रिझोल्युशन असणारे स्क्रीन्सही तयार करण्याकडे या मोठय़ा कंपन्यांचा कल असणार आहे. याबरोबरच थ्रीडी कॅमेरा जो डोळ्यांसारखा काम करताना समोरील वस्तू त्यांतील अंतर मोजू शकेल आणि सेन्सरी इनपुट डिव्हाइस म्हणून काम करू शकेल याचा प्रयत्न चालू आहे. आपल्याशी संवाद साधून काम करू शकणारा संगणक लॅपटॉप पर्सनल असिस्टंटला रिप्लेस करू शकतो. हे तंत्रज्ञान अॅपलने यापूर्वी सीरीच्या माध्यमातून बाजारात आणले होते. पण त्याहीपेक्षा कित्येक पटीने सरस असे तंत्रज्ञान येत्या काळात आपणांस पाहावयास मिळू शकेल.
घरगुती उपकरणे :
स्मार्टफोन, स्मार्ट कॉम्प्युटर नंतर स्मार्ट होम ही संकल्पना भारतीय बाजारात सादर होणार आहे. संगणक, टीव्ही, लॅपटॅप, सिक्युरिटी सिस्टीम, वॉशिंग मशीन या साऱ्या घरगुती उपकरणांत स्मार्टनेस पाहायला मिळणार आहे आणि या साऱ्याबरोबर महत्त्वाची बाब म्हणजे ही सारी स्मार्ट उपकरणे आतापर्यंत एकेकटी काम करताना दिसत होती, परंतु स्मार्ट होम संकल्पनेमध्ये ही सारी उपकरणे एकमेकांसोबत काम करू शकणार आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर आपण सकाळी ठरावीक वेळी उठलात की आपला टोस्टर स्वत: ब्रेड घेऊन आपल्यासाठी टोस्ट तयार ठेवेल. आपण बाहेर गेलात तरी आपलं वॉशिंग मशीन कपडे धुवून वाळवून ठेवेल. आपण घरी येण्यापूर्वी आपल्या घरातला एसी आपल्या स्मार्टफोन्सच्या मेसेजवर आपल्या घराचे तापमान नियंत्रित करून ठेवेल, याखेरीज आपल्या घरातले दिवे, टीव्ही सिक्युरिटी सिस्टीम आपल्या स्मार्टफोन्सवर ऑपरेट होऊ शकतील. हे सारे तंत्रज्ञान कल्पनेतील वाटत असेल, पण हे सारं कधीच तयार होऊन त्यावर प्रयोग सुरू आहेत. येत्या वर्षभरात हे भारतात उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत, ज्याची सुरुवात म्हणजे स्मार्ट टीव्ही, स्मार्ट फ्रीजसारख्या उपकरणांची भारतीय बाजारपेठेत झालेली एन्ट्री.
कॅमेरा :
कॉम्पॅक्ट सिस्टीम कॅमेरा हा गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी महत्त्वाचा विषय ठरणार आहे. उत्तम झूिमंग क्षमता, वॉटरप्रूफ डिव्हाइस, भरपूर सेन्सर, वायफाय कनेक्टिव्हिटी, डिजिटल व्ह्य़ू-फाइंडर, ऑटोमेटेड फोकस या गोष्टी कमीतकमी पैशांत ग्राहकाला उपलब्ध होऊ शकतील, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे. प्रिंटर क्षेत्रातही येत्या वर्षांत मोठे बदल
अपेक्षित आहेत. लेजरजेट प्रिंटिंग स्वस्त आणि कॉम्पॅक्ट स्वरूपात उपलब्ध होतील, असे प्रयत्न चालू आहेत. थ्रीडी प्रिंटर बाजारात आले असले तरी त्याबाबत फारशी उत्सुकता दिसून आलेली नाही. येत्या वर्षांत त्यासही चालना मिळेल आणि भारतीय बाजारपेठेतही प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये बदल दिसतील अशी आशा करण्यास हरकत नाही.
टेक्नॉलॉजी या क्षेत्राचा आवाका खरंतर खूप मोठा आहे. साऱ्यांबाबत एकाच वेळी बोलणे शक्य नाही, परंतु खूप मोठे आणि आपल्या रोजच्या आयुष्यावर नक्की परिणाम करू शकतील असे काही बदल या वर्षभरात घडतील आणि माणसाचं आयुष्य येत्या वर्षभराच्या शेवटी अधिक सुखासीन होईल, यात शंका नाही.
प्रशांत जोशी