एकीकडे करोनामुळे सोशल डिस्टिन्सग महत्त्वाचे असताना गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मिडियावरील स्वतच्या अकाऊंटच्या सुरक्षेचा सुद्धा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सातत्याने व्हायरल होणाऱ्या पोस्ट, हॅकिंग आणि क्लोिनगबद्दलची चुकीची माहिती आणि लोकांच्या मनात असलेली भीती यामुळे अनेक गैरसमज लोकांमध्ये पसरत आहेत. आमचं अकाऊंट हॅक झालंय, माझ्या नावाने दुसरे प्रोफाइल तयार करून लोक पसे मागत आहेत अशा आशयाच्या पोस्ट गेल्या काही दिवसांमध्ये मोठय़ा प्रमाणावर व्हायरल होत आहेत. प्रत्यक्षात मात्र सोशल मिडियावर होणाऱ्या अकाउंट क्लोिनगला व्यक्ती स्वतच जबाबदार असतात. मात्र अनेकांना ही गोष्ट लक्षात येत नाही. प्रत्यक्षात सोशल मिडिया अकाऊंटचे क्लोिनग कशाप्रकारे होते त्यापासून आपले अकाऊंट सुरक्षित कसे ठेवावे या आणि अशा प्रश्नांचा घेतलेला मागोवा…

गेल्या काही दिवसांमध्ये डिजिटल गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. यामध्ये फेसबुक आणि इतर सोशल मिडियातील अकाऊंटना लक्ष्य केले जाते .  अकाऊंटमधील वैयक्तिक माहितीचा वापर करून मित्र आणि नातेवाईकांकडून पसे मागणे, वैयक्तिक माहिती चोरून धमक्या देणे, फेसबुक अकाऊंटचा अ‍ॅक्सेस मिळवून व्यवहार करणे यांसारख्या घटना मोठय़ा प्रमाणावर गेल्या काही महिन्यात वाढताना दिसत आहेत. यामुळे लोकांमध्ये भीतीसुद्धा वाढत आहे . त्यातच  फेसबुकवर सातत्याने क्लोिनग आणि हॅकिंगबद्दल पोस्ट व्हायरल होत आहेत. त्यामुळे या गुन्ह्यांपासून स्वतला सुरक्षित कसे राखावे आणि आपल्या डिजिटल अकाऊंटचे संरक्षण कसे करावे असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.

क्लोिनगची वेगवेगळी प्रकरण समोर येत असली तरीही प्रत्यक्षात मात्र सगळ्याच अकाऊंटचे क्लोिनग होत असल्याच्या पोस्टमध्ये तथ्य नाही. याबद्दल अधिकृत माहिती कुठेही उपलब्ध नसल्याने घाबरून जाऊन या पोस्ट जास्त शेअर होत असून त्याबद्दल लोकांमध्ये संभ्रम वाढताना दिसतो. प्रत्यक्षात सध्या होणाऱ्या अकाऊंट क्लोिनगच्या घटनांना वापरकर्ते स्वत जबाबदार आहेत. बऱ्याचदा मेसेंजर किंवा इनबॉक्समध्ये येणाऱ्या िलक्सवर युजर्स क्लिक करतात. या िलक्समध्ये असणाऱ्या फॉर्मसमध्ये माहिती भरतात आणि आपल्या अकाऊंटची माहिती शेअर करतात. या फॉर्मसमध्ये अकाऊंटचा आयडी पासवर्ड तसेच इतर महत्त्वाची माहिती घेतली जाते. त्यानंतर फेसबुक अकाऊंटचा पासवर्ड हॅकर्स बदलतात आणि अकाऊंटच्या माध्यमातून मेसेंजरमधील सर्वाना मेसेज करतात. अकाऊंटवरून मला आíथक मदतीची गरज आहे, काही दिवसांत पसे परत देतो, असे मेसेज शेअर केले जातात आणि त्यानंतर गूगल पे, यूपीआय किंवा इंटरनेट बँकिंगची माहिती शेअर केली जाते आणि पसे मिळवले जातात. अशा प्रकारे एका दिवसात जवळपास ७०-७५ हजार रुपयांची रक्कम वेगवेगळ्या लोकांकडून मिळवली जाते असा अनुभव प्रत्यक्ष लोकांना आला आहे. सहसा आपल्या ओळखीची व्यक्ती तातडीची मदत मागत असल्याने लोक पटकन पसे पाठवून देतात. मात्र शहानिशा केल्याशिवाय मदत करू नये. याचप्रमाणे ज्या पद्धतीने पासवर्ड मिळवला गेला तीच िलक मेसेंजरमध्ये इतरांना पाठवली जाते आणि ही चेन पुढे चालू राहते.

या गोष्टींना अटकाव करण्यासाठी आपला पासवर्ड आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे हा एकमेव उपाय आहे. याचबरोबर समजा कोणताही गरव्यवहार झाल्याचे लक्षात आले तर घाबरून न जाता सर्वात आधी आपला पासवर्ड रिसेट करून पुन्हा एकदा अ‍ॅक्सेस परत मिळवता येतो. याबद्दल बऱ्याचदा वापरकर्ते स्वत घाबरून जातात आणि इतरांनाही घाबरवतात त्यामुळे त्याबद्दल घाबरून न जाता सर्वाना आहे ती परिस्थिती सांगून कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा.

एकीकडे अशा प्रकारचे गुन्हे समोर येत असताना फेक प्रोफाइल्सचे प्रमाणसुद्धा मोठय़ा प्रमाणावर वाढताना दिसत आहे. यामध्ये जुन्या अकाऊंटला हातही न लावता अगदी हुबेहूब अकाऊंट बनवलं जातं. असाच प्रकार बऱ्याच फेसबुक युजर सोबतदेखील झाला आहे. यामध्ये अकाऊंटचे क्लोिनग केले जाते. त्यानंतर नवीन बनावट अकाऊंटवरून वेगवेगळ्या ओळखीच्या लोकांना रिक्वेस्ट पाठवल्या जातात. बऱ्याचदा ओळख न पटवता बनावट अकाऊंटच्या फ्रेंड रिव्केस्ट स्वीकरल्या जातात. त्यानंतर सुरुवातीला गुड मॉìनग, गुड नाइटचे मेसेज येतात, पण हळूहळू या बनावट अकाऊंटवरून आíथक मदतीची मागणी केली जाते. त्यातून मोठय़ा प्रमाणात फसवणूक होत असल्याचे गुन्हे समोर आले आहेत.

योग्य खबरदारी घेतली आणि कोणत्याही प्रकारची माहिती आपण शेअर केली नाही तर प्रोफाईल सुरक्षित ठेवता येऊ शकतात. त्यामुळे आपण कोणत्याही प्रलोभनाना भुललो नाही आणि आपली माहिती सुरक्षित ठेवली तर सोशल मिडियावर सुरक्षितपणे आपण वावरू शकतो. आपली फसवणूक होणं टाळण्यासाठी आपल्याला आलेला एसएमएस, समाजमाध्यमांवरचा मेसेज किंवा ई-मेलचा स्रोत काळजीपूर्वक तपासणं ही पहिली महत्त्वाची पायरी असते. त्याकडे लक्ष दिल तर आपण मोठी फसवणूक टाळू शकतो  थोडक्यात आपली डिजिटल सुरक्षा आपल्याच हातात आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

सेलिब्रिटीसुद्धा टाग्रेट

प्रोफाइल क्लोिनग आणि हॅकिंगचा फटका अनेक कलाकारांनासुद्धा बसला आहे. मध्यंतरी कॉपीराइटचे उल्लंघन केल्याचा मेसेज पाठवून बऱ्याच गायकांच्या इन्स्टाग्राम प्रोफाइल्सचा अ‍ॅक्सेस मिळवून त्यातील माहितीत फेरफार झाल्याचे बघायला मिळाले होते. याचपद्धतीने सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, गायिका शमिका भिडे यांच्यासह अनेक सुप्रसिद्ध कलाकारांना हॅकिंगचा सामना करावा लागला होता.

या गोष्टी लक्षात ठेवा

तुमच्या सोशल मीडियावरील अकाऊंटची माहिती कोणालाही शेअर करू नका.

कोणत्याही फॉर्ममध्ये किंवा मेसेजमध्ये माहिती शेअर करताना खातरजमा करून डिटेल्स शेअर करा.

नियमितपणे तुमचा पासवर्ड अपडेट करत राहा.

ईमेलवर किंवा कोणत्याही मेसेजमध्ये तुमची आíथक माहिती किंवा पासवर्ड्स लिहून ठेवू नका.

फेसबुकसाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करा, यामुळे तुमच्या मोबाइलवर आणि ईमेलवर येणाऱ्या ओटीपीशिवाय तुमच्या अकाऊंटचा वापर कोणीही करू शकणार नाही.

हॅकिंग आणि क्लोिनगबाबत घाबरून जाऊ नका. त्याबद्दलच्या पोस्ट शेअर करून इतरांमध्ये भीती निर्माण करू नका.

जन्मतारीख, नाव अशा गोष्टींचा वापर पासवर्डमध्ये करू नका.

अकाऊंट डी-अ‍ॅक्टिव्हेशन किंवा व्हेरिफिकेशनसारखे महत्त्वाचे मेसेज फेसबुक आपल्या वॉलवर किंवा पेजवर कधीच पोस्ट करत नाही. आपल्याला ‘नोटिफिकेशन सेंटर’ किंवा ‘सिक्युरिटी रिव्ह्य़ू’मध्ये दाखवते. त्यामुळे आपली किंवा आपल्या पेजची वॉल ओपन असेल, तर त्यावर आलेल्या कोणत्याही- अगदी अधिकृत दिसणाऱ्या ‘आयडी’कडून आलेल्याही संदेशावरही विश्वास ठेवू नका.

बहुसंख्य हॅकर्स आपल्याला फेसबुक किंवा किंवा गूगल (किंवा तुमची बँक) यांच्याकडून मेल आले आहे, असं भासवतात आणि क्लिक करायची िलक मात्र भलत्याच कोणत्या ठिकाणची असते. ते ठिकाण कोणतं हे िलकच्या दुसऱ्या भागात आपल्याला स्पष्ट दिसतं.

ओळखा फेक प्रोफाइल

सोशल मीडियावर तयार होणाऱ्या फेक प्रोफाइल्स व्यवस्थित पाहिल्या तर आपल्याला लक्षात येऊ शकतात, त्यामुळे पूर्ण खातरजमा न करता कोणत्याही नवीन व्यक्तीशी संपर्क ठेवू नये. आपल्याच ओळखीच्या व्यक्तीकडून आपल्याला मेसेज आला आणि आपल्याला क्लोिनगचा संशय आला तर प्रोफाइलकडे लक्ष दिल्यास आपल्याला माहिती मिळू शकते. सहसा नवीन तयार केलेल्या अकाऊंटमध्ये वापरकर्त्यांची पूर्ण माहिती नसते. त्याचबरोबर फोटोमध्ये देवदेवतांचे फोटो किंवा कलाकारांचे फोटो असतात. स्वत:चा फोटो आणि माहिती अशा फेक प्रोफाइलमध्ये दिसून येत नाही. सहसा नव्याने तयार केलेल्या अकाऊंटमध्ये फार पोस्ट नसतात, त्यामुळे पूर्ण प्रोफाइलवर नजर टाकल्यास आपल्याला सहज खरी प्रोफाइल लक्षात येऊ शकते.

तक्रारीचा पर्याय

अशा प्रकारच्या गुन्ह्य़ांना घाबरून न जाता वेळीच तक्रार केली तर नुकसान होत नाही. याबद्दल http://www.cybercrime.gov.in येथे तक्रार नोंदवून नजीकचे पोलीस स्थानक निवडता येते. त्यानंतर पुढील कार्यवाही सायबर विभाग आणि पोलीस करतात. याचबरोबर नजीकच्या पोलीस स्थानकाशी संपर्क करून तक्रार नोंदविण्याचा पर्याय आहे. याचबरोबर फेसबुक तसेच इतर माध्यमांमध्येही खोटय़ा प्रोफाइलला रिपोर्ट करण्याचा पर्याय आहे. बऱ्याचदा वैयक्तिक मानहानी टाळण्यासाठी तक्रार करत नाहीत आणि यातून या गुन्ह्य़ांना अधिक खतपाणी मिळत जाते. त्यामुळे योग्य यंत्रणांची मदत घेऊन तक्रार केली पाहिजे. त्याचबरोबर झालेला प्रकार लोकांसमोर मांडून अशा घटना रोखण्याचे प्रयत्न केले पाहिजेत.