स्वप्निल घंगाळे – response.lokprabha@expressindia.com
पासवर्ड हा जितका सक्षम तितकं तुमचं डिजिटल आयुष्य सुरक्षित, असं सांगितलं जातं. जगभरातील त्यातही भारतामधील अनेकांचा डिजिटल वावर का कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित करणारा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

करोनामुळे संपूर्ण जगामध्ये डिजिटल माध्यमांचं महत्त्व वाढलं आहे. वर्क फ्रॉम होमपासून ऑनलाइन शिक्षणापर्यंत अनेक गोष्टी अनेकांनी या महासाथीच्या लाटेत पहिल्यांदाच अनुभवल्या. मात्र यापूर्वी कधी नव्हता एवढा ऑनलाइन सेवांचा वापर होत असताना सायबर सुरक्षेकडे मात्र आजही मोठय़ा प्रमाणात दुर्लक्ष केलं जात असल्याचंच चित्र आहे. नॉर्डपास या पासवर्ड मॅनेजर कंपनीच्या अहवालातून हेच स्पष्ट होत आहे. जगभरातील ५० देशांमधील सर्वाधिक लोकप्रिय पासवर्ड कोणते आहेत, याची यादीच अहवालात देण्यात आली आहे. असं म्हणतात की, प्रत्येक व्यक्तीच्या हातावरच्या रेघा या वेगवेगळ्या असतात. प्रत्येक व्यक्तीच्या हाताचे ठसे हे इतरांपेक्षा वेगळे असतात. खरं तर आज पासवर्डसंदर्भातही अशीच सतर्कता बाळगणे गरजेचे आहे, मात्र संपूर्ण जगभरातच सायबर सुरक्षेसंदर्भात साक्षरता आजही कमीच आहे. भारतात सर्वाधिक वापरला जाणारा पासवर्ड आहे ‘‘पासवर्ड’’. नॉर्डपासने तब्बल ५० मोठय़ा देशांचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. म्हणजे जगातील जवळपास एक चतुर्थांश देशांमधील लोकांच्या पासवर्ड वापरासंदर्भातील माहितीचे विश्लेषण त्यांनी केले आहे आणि त्यात फारच सहज ओळखता येतील असे पासवर्ड आघाडीवर आहेत. सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या पासवर्ड्समध्ये १२३४५६, १२३४५६७८९ आणि १२३४५ हे तीन पासवर्ड्स आघाडीवर आहेत.

काय आहे अहवाल?

नॉर्डपास ही कंपनी ग्लोबल पासवर्ड मॅनेजमेंटच्या क्षेत्रात ऑनलाइन सुरक्षेसंदर्भात काम करते. ही कंपनी दरवर्षी जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे पासवर्ड्स कोणते आहेत याबद्दल संशोधन करून त्याचा अहवाल प्रकाशित करते. यंदाच्या वर्षीही कंपनीने असाच अहवाल प्रकाशित केला असून त्यामध्ये समावेश असणाऱ्या सर्व ५० देशांमधील सर्वाधिक लोकप्रिय पासवर्ड, ते अंदाजे (सर्वेक्षण करण्यात आलेल्यांपैकी) कितीजण वापरतात आणि तो पासवर्ड क्रॅक करण्यासाठी सरासरी किती वेळ लागू शकतो याची यादी देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे भारतामधील जवळजवळ सर्वच पासवर्ड एवढे सहज आणि सोपे आहेत की ते अवघ्या एका सेकंदात क्रॅक करता येतील, असा दावा कंपनीने केला आहे.

भारताबद्दल…

भारतात ‘‘पासवर्ड’’ हाच शब्द पासवर्ड म्हणून वापरणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्याचबरोबर भारतामध्ये १२३४५, १२३४५६, १२३४५६७८९, १२३४५६७८, इंडिया१२३, १२३४५६७८९०, १२३४५६७ आणि एबीसी१२३ हे पासवर्ड वापरणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. भारतामधील सर्वाधिक लोकप्रिय पासवर्ड्सपैकी ‘‘इंडिया१२३’’ हा पासवर्ड वगळता जवळजवळ सर्वच पासवर्ड हे एका क्षणात क्रॅक करता येण्यासारखे आहेत, असं या अहवालात म्हटलं आहे. ‘‘इंडिया१२३’’ हा पासवर्ड क्रॅक करण्यासाठी अंदाजे १७ मिनिटे लागतात. भारतातील अनेक नवखे इंटरनेट वापरकर्ते पासवर्ड सहज लक्षात रहावा म्हणून तो सोपा ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र पासवर्ड सोपा ठेवताना तो इतरांनाही सहज समजू शकेल, ही गोष्टही लक्षात घेणं फार गरजेचं असतं.

कंपनीचं म्हणणं काय?

नॉर्डपास कंपनीने या अहवालासंदर्भात जारी केलेल्या पत्रकामध्ये कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोनास कार्केलिस यांनी पासवर्डचं महत्त्व समजावून सांगितलं आहे. ते सांगतात, ‘‘आपला पासवर्ड हा आपल्या डिजिटल आयुष्याची किल्ली आहे, हे आपण लक्षात ठेवायला हवं. आपण जेवढा जास्त वेळ ऑनलाइन माध्यमांवर घालवतो तेवढं आपलं आयुष्य त्यांच्यावर अवलंबून असतं. त्यामुळेच आपण आपल्या सायबर सुरक्षेची जास्तीत जास्त काळजी घेणं हे फार महत्त्वाचं आहे. मात्र दुर्दैवाने पासवर्ड कमकुवत (सहज क्रॅक करता येतील असे) होत चालले आहेत. वापरकर्ते पासवर्डच्या सुरक्षेचा गांभीर्याने विचार करताना दिसत नाहीत,’’ अशी खंत जोनास यांनी व्यक्त केली.

जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे १० पासवर्ड्स (उतरत्या क्रमाने)

१२३४५६, १२३४५६७८९, १२३४५, qwerty, password १२३४५६७८, ११११११, १२३१२३,

१२३४५६७८९०, १२३४५६७.

भारतात सर्वाधिक वापरले जाणारे १० पासवर्ड्स (उतरत्या क्रमाने)

Password १२३४५, १२३४५६, १२३४५६७८९, १२३४५६७८, indiarst १२३, १२३४५६७८९०, १२३४५६७, qwerty, abc१२३ हे भारतात सर्वाधिक वापरले जाणारे पासवर्ड आहेत. याव्यतिरिक्त xxx, iloveyou, krishna, Indyarst, sairam, omsairam, jaimatadi, welcome, indianअसे पासवर्डही सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या २५ पासवर्ड्सच्या यादीत आहेत. तर saibaba, linkedin, bigbasket, ganesh, sachin, computer, abhishek९८७६५४३२१, priyanka, dragon, zomato, monkey, tinkle, rajesh, deepak, dubsmash, lakshmi हे पासवर्ड पहिल्या पन्नासात आहेत.

स्वत:चं नाव पासवर्डमध्ये वापरणारेही अनेक

जगभरात स्वत:चं नाव पासवर्ड म्हणून वापरणाऱ्याचं प्रमाणही मोठं असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या आवडत्या म्युझिक बॅण्डचं किंवा आवडत्या संघाचं नाव पासवर्ड म्हणून ठेवणाऱ्यांची संख्याही लाखोंच्या घरात आहे. परदेशात फेरारी, पोर्शे यासारख्या गाडय़ांची नावं पासवर्ड म्हणून ठेवणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.

कुठे चुकतंय?

पासवर्डमध्ये क्रमांक, त्यासोबत अपर केस, लोअर केस अक्षरं, विरामचिन्हं किंवा अन्य काही चिन्हं वापरावीत असा सल्ला या क्षेत्रातले तज्ज्ञ देतात. पासवर्ड जितका गोंधळात टाकणारा तितकं ते खातं हॅक होण्याची शक्यता कमी, असं साधं गणित असतं. मात्र अनेकदा लोक ‘‘त्यात काय होतंय एवढं’’ किंवा ‘‘आपल्याकडे काय आहे असं मौल्यवान’’ अशा विचार करून पासवर्डकडे दुर्लक्ष करतात. मात्र खात्यामध्ये काही महत्त्वाची माहिती नसली तरी ते हॅक करून त्या माध्यमातून संबंधित व्यक्तीची बरीच खासगी माहिती चोरली जाण्याची आणि त्या व्यक्तीच्या परिचितांना गंडा घातला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामान्यपणे लोक त्यांच्याशी संबंधित नाव किंवा क्रमांक पासवर्डमध्ये वापरतात. असं केल्याने लगेच पासवर्ड लक्षात राहील असा एक समज असतो. मात्र पासवर्डसंदर्भात याच्या विरुद्ध विचार केला पाहिजे असं तज्ज्ञ म्हणतात. तुमच्या नावावरून, वाढदिवसावरून तुमचा पासवर्ड नसेल तर तो त्यातल्या त्यात बरा पासवर्ड आहे, असं म्हटलं जातं. मात्र अनेकजण याच्या अगदी विरुद्ध वागतात. मुलांची नावं, स्वत:चं नावं, वाढदिवसाची तारिख, मोबाइल क्रमांक पासवर्ड म्हणून वापरतात. यात हॅकर्सचं काम सोप्प होतं. सामान्यपणे वाढदिवसाचं वर्ष, वाढदिवसाच्या तारखेमधील क्रमांक, पासवर्ड अपडेट केला असेल ते वर्ष, एखादं खास वर्ष लोकांकडून पासवर्डमध्ये वापरण्याचं प्रमाण अधिक आहे. आपल्याशी संबंधित आकडे वापरण्याऐवजी वेगळा विचार करून पासवर्ड तयार करावा असा सल्ला सामान्यपणे दिला जातो. अनेक जण एकच पासवर्ड वेगवगेळ्या खात्यांसाठी वापरतात. असं केल्याने एखादं जरी खातं हॅक झालं तरी त्या माध्यमातून इतर खाती हॅक करणं सोपं होतं.

पोलिसांकडूनही जनजागृती

पोलिसांकडूनही हल्ली समाजमाध्यमांवर पासवर्डसंदर्भात जनजागृती केली जाते. मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलवरून तर तरुणाईला समजेल अशा भाषेमध्ये मिम्स, ट्रेण्डिंग विषय आणि मजेदार पोस्टच्या माध्यमातून पासवर्डचं महत्त्व तरुणांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र तरीही या नवीन अहवाल पाहिल्यास पासवर्डबद्दल नेटकऱ्यांमध्ये किती उदासीनता आहे हे दिसून येतं. एकंदरित आपण रोज ज्या फेसबुक, ट्विटर किंवा व्हॉट्सअ‍ॅप खात्याचा वापर करणार आहोत, ते अन्य कोणीही वापरणार नाही, याची काळजी आपण घ्यायला हवी. त्यासाठी सक्षम पासवर्ड ठेवणं ही आजच्या सायबर चोरांचा सुळसुळाट असलेल्या काळाची गरज झाली आहे. इंटरनेटवरचा वावर सुरक्षित रहावा म्हणून एवढं तरी करायलाच हवं.