News Flash

मोकळे आकाश.. : आपण सारे अर्जुन

महाभारतात असंख्य कथा-उपकथा आहेत.

मोकळे आकाश.. : आपण सारे अर्जुन

|| डॉ. संजय ओक
महाभारत हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. ते एक महाकाव्य तर आहेच, पण त्याचबरोबर ती एक सूडकथाही आहे. द्रौपदीच्या अपमानाचा प्रवास आहे. राज्यकर्त्यांच्या भाळी लिहिलेला विजनवास आहे. कृष्णाची शिष्टाई आहे.  युधिष्ठिराची सोईस्कर चतुराई आहे. एकलव्याचे व्रत आहे आणि द्रोण- कृपा – भीष्माची पत आहे. महाभारत कुंतीच्या प्रीतीचे आहे, विदुराच्या नीतीचे आहे. भीमाच्या शक्तीचे आहे आणि तितकेच अर्जुनाच्या एकलकोंडय़ा वृत्तीचे आहे.

महाभारतात असंख्य कथा-उपकथा आहेत. काही सर्वज्ञात आहेत, तर काही लौकिकार्थाने अज्ञात राहिल्या आहेत. गुरुवर्यानी सांगितल्यावर नेम धरून झाडावरच्या पक्ष्याचा डोळा फोडणारा अर्जुन सर्वाना परिचित आहे, पण द्रौपदीला पाच भावांच्या पत्नीचे स्थान देणारा, नागकन्या उलुपीशी विवाह करणारा, अश्वमेधाचा घोडा अडविणारा राजपुत्र आपलाच मुलगा आहे हे ज्ञात नसलेला ‘सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति।’ असे म्हणून हातपाय गाळणारा अर्जुन खऱ्या अर्थाने आपल्याला पूर्णपणे ज्ञात नाही. आज या करोनाच्या काळात मला महाभारताची आठवण व्हावी आणि त्यातल्या नेमक्या एकाच व्यक्तीने आणि विचारांनी माझ्या मनाचा पाठलाग करावा यास कारण तरी कोणते असावे? यास कारण ठरते आहे- झापडं लावून फक्त मर्यादित आणि काहीसा आत्मकेंद्रित विचार करण्याची बळावत चाललेली आपली वृत्ती.

प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ राकेश सिन्हा माझा जीवश्चकंठश्च मित्र. मी नायर रुग्णालयाचा अधिष्ठाता असताना चार वष्रे झपाटल्यासारखे काम करायचो. रुग्णालयाची प्रगती हाच एकमेव ध्यास होता. राकेशने माझ्या कार्यशैलीचे नेमके वर्णन करताना एक शब्द वापरला होता.monomaniach with a megalomission.

एखादी व्यक्ती जेव्हा एकच उद्दिष्ट घेऊन काम करू लागते तेव्हा ती त्यात पूर्णपणे गुरफटून जाते. आपल्या कामाशी एकरूप होणे हे तिचे एकमेव उद्दिष्ट बनून जाते. त्यामुळे इतरेजनांवर काय आणि कोणते परिणाम होतील याचा विचार बंद होतो. अशी व्यक्ती कधी स्वत:चा फायदा बघते, पण बऱ्याच वेळेला व्यवहार फायदा-तोटा यापलीकडचा असतो. वैयक्तिक उद्देशपूर्ती करण्याच्या लालसेत कधी सामाजिक भान सुटले आहे हे त्या व्यक्तीच्या लक्षात येत नाही आणि मग त्याचा ‘अर्जुन’ होतो. त्याला ना झाड दिसत ना फांदी; दिसत असतो तो फक्त पक्ष्याचा डोळा. तो डोळा, ते लक्ष्य त्याच्या संपूर्ण अस्तित्वाचा नेमका अर्थ बनून राहते.

आज करोनाच्या काळात निर्बंध लादणे-उठविणे आणि अति आवश्यक सेवांची खानेसुमारी करताना आपण सारे अर्जुन झालो आहोत. प्रत्येकाला घराबाहेर पडायचे आहे. पूर्वाश्रमीचे जीवन भरभरून जगायचे आहे. ऑफिसातील गप्पाष्टकं जमवायची आहेत. शनी-रवी भुशी डॅमखाली डुंबायचे आहे. प्रत्येकाच्या झाडावरचे पक्षी वेगळे आहेत. फोडायचा डावा डोळा मात्र एकच आहे. त्यामुळे कळत नकळत सामाजिक जाणिवा बोथट होत आहेत. मला रेल्वेचा पास मिळून लोकल प्रवासाची मुभा हवी आहे. मला माझा व्यापारउदीम चोवीस तास करावयाचा आहे. मला माझे दुकान सकाळपासून रात्रीपर्यंत उघडे ठेवायचे आहे. मला नाटकाचे प्रयोग हवे आहेत. मला मालिकेचे शूटिंग हवे आहे, मला अर्धवट राहिलेल्या सिनेमाच्या चार शिफ्ट्स रात्री पूर्ण करावयाच्या आहेत.. हे सारं सारं माझ्या झाडावरच्या पक्ष्याचा डोळा आहे आणि आम्ही सारे अर्जुन आहोत.. एकलक्ष्यी, एकमती, एकवृत्ती आणि एकाकी!

करोनाच्या काळात उद्योग थांबलाय, व्यापार शमलाय, मनोरंजनाने मान टाकलीय, पण रुग्णालय आणि वैद्यकीय विश्वाने मात्र ध्वजा फडकत ठेवलीय. पीपीई किट्स घालणे म्हणजे, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे! ना न्याहारी करता येत, ना शरीरधर्म. पण या साऱ्याचा पूर्ण स्वीकार करून वैद्यकाने आपल्याभोवती कवच किंवा आजच्या परिभाषेत बोलायचे तर बायो-बबल निर्माण केला आहे. महाभारतातला चक्रव्यूहच जणू. तो अभेद्य नाही याची आम्हालाही जाणीव आहे, पण किमान फक्त आपल्याच ध्येयापुरते विचार करणारे अर्जुन आज आमच्यात निपजले नाहीत याचे मात्र मला संजयाच्या निरूपण शैलीतून सांगावेसे वाटते आहे.

करोनाशी प्रतिकार म्हणजे अज्ञाताशी युद्ध आहे. कुरुक्षेत्रावर निदान अठरा अक्षौहिणी सेना समोर उभी ठाकलेली दृश्यमान होती. इथे मात्र शत्रू अज्ञात आहे. द्रोणाचार्य, कृपाचार्याची जागा डेल्टा आणि कटप्पाने घेतली आहे. वापरलेले एकेक अस्त्र कालांतराने निष्प्रभ होताना दिसत आहे. ‘नरो वा कुंजरो वा’ म्हणणारी युधिष्ठिर नीती टिकाव धरणारी नाही, हे डब्लूएचओचे बदलते निर्देश आणि धोरणांमधून ध्वनित झाले आहे; आणि सारासार विचार करणारा कृष्ण फक्त मंद स्मित करत रथ हाकतो आहे आणि पार्थाला सांगता होतो आहे, ‘सारासार विचार कर अर्जुना. लशीचे अस्त्र जरी भात्यात आले तरी मास्क आणि ‘कोव्हिड अ‍ॅप्रॉप्रिएट बिहेविअर’ची नीती वापर. उद्दिष्ट केवळ पक्ष्याचा डोळा फोडण्याचे नाही, तर समस्त मानवजातीचा तारणहार बनण्याचे हवे..’

‘यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।।’

sanjayoak1959@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2021 1:24 am

Web Title: all of you arjun mahabharat ssh 93
Next Stories
1 थांग वर्तनाचा! :संस्कृती आपण संस्कृती
2 उद्रेकातून उरले काही..
3 वसंतबहार
Just Now!
X