News Flash

माणसांच्या मुळांची शोधयात्रा

गोत्र म्हणजे आपले मूळ.. वंश, कूळ. परंतु हे कूळ भारतीय परंपरेतील धर्माचे किंवा जातीचे नव्हे.

(संग्रहित छायाचित्र)

 डॉ. राजेंद्र सलालकर    

दीर्घकाळाच्या साधनेनंतर गायक एखाद्या मफलीत बसतो तेव्हा खोल श्वास घेऊन, घनगंभीर खर्जातून आलाप घेत रेशमी सुरांवर आरूढ होतो. हळूहळू एकेक अंतरा घेत पुन्हा पुन्हा समेवर येत आपल्या भरदार आवाजाने आणि गाण्याच्या सादरीकरणाने मफलीवर गारूड करतो. शेवटी भरवीच्या दीर्घ आणि वेगवान आलापांनी साऱ्या श्रोत्यांना भारावून टाकतो.. तसाच काहीसा अनुभव रवींद्र शोभणे यांच्या ‘गोत्र’ या ग्रंथाच्या वाचनाने येतो.

गोत्र म्हणजे आपले मूळ.. वंश, कूळ. परंतु हे कूळ भारतीय परंपरेतील धर्माचे किंवा जातीचे नव्हे. आपला लेखक म्हणून जो पिंड घडला, जीवनाचे जे दर्शन घडले आणि जे साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केला, त्याचे संस्कार कशात आहेत? आपले सांस्कृतिक गोत्र कोणते? या प्रश्नांच्या शोधात केलेली मुसाफिरी म्हणजे ‘गोत्र.’

रवींद्र शोभणेलिखित ‘गोत्र’ या ग्रंथात ग्रेस, डॉ. द. भि. कुलकर्णी, मनोहर तल्हार, या. वा. वडस्कर, आनंद यादव, आशा सावदेकर, रवींद्र गोडबोले, श्रीपाद जोशी, श्रीधर शनवारे आणि मनोहर म्हैसाळकर या व्यक्तिमत्त्वांचा वेध घेतला आहे. या साऱ्यांनी महाराष्ट्राच्या साहित्यिक-सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. या  व्यक्तिमत्त्वांचा शोभणेंवर परिणाम झाला नसता तरच नवल. त्यांचा हा मित्रपरिवार मोठा विलक्षण. त्यांच्यातल्या साहित्यिकाला घडविणारा. व्यावहारिक पातळीवर माणूसपणाची आठवण करून देणारा. या सर्वामधील मत्रभावाचे सूक्ष्म तंतू तरलपणे आणि तेवढय़ाच तटस्थपणे ‘गोत्र’मध्ये विणलेले आहेत.

ग्रेस हे मराठी साहित्यिक-सांस्कृतिक जगताला पडलेले एक गूढ स्वप्न! संवेदनशील लेखक-कलावंत असणाऱ्या शोभणेंना त्याची भुरळ पडली नसती तरच नवल. योगायोगाने मॉरिस कॉलेजात अध्यापक-विद्यार्थी या नात्याने ही मत्री अधिक घट्ट विणली जाते. ग्रेस यांच्या व्यक्तिमत्वातली गूढता आणि भारावलेपण कायम अचंबित करणारं. त्यात त्यांचाआवडता विद्यार्थी म्हणून मान्यता मिळाल्यानंतर ग्रेस यांना अंतर्बा न्याहाळण्याची संधी त्यांना मिळते. ग्रेस हा अलौकिकाच्या शोधात निघालेला अवलिया. या दुनियेची सफर करून झाल्यानंतर भौतिक जगात तितक्याच कोरडेपणाने वावरणारा आणि त्या दरम्यान अहंकाराचा एक भक्कम तट उभा करून बाहेरच्यांना अटकाव करीत, आपल्याच मस्तीत जगणारा हा माणूस. मंतरलेल्या शब्दांनी आपल्या विद्यार्थ्यांना भारावून टाकणारे, गहन गूढ अर्थाने भरलेल्या शब्दांनी वाचकांना स्तिमित करणारा अनुभव देणारे, कविता आणि ललितगद्य लेखनाने मराठी साहित्याला भरजरी अनुभवाचे कोंदण प्राप्त करून देणारे,आपल्या खांद्यावर पाय ठेवून कुणी मोठं होत असेल तर ते सहन न करणारे.. यापैकी कोणते ग्रेस खरे? या प्रश्नांचा शोध घेत या व्यक्तिमत्त्वाचा शोभणेंनी घेतलेला शोध निश्चितच अपूर्व आहे.

डॉ. द. भि. कुलकर्णीच्या सहवासात शोभणेंना काहीसा असाच अनुभव येतो. डॉ. द. भि. कुलकर्णी अतिशय विद्वान. ज्ञानेश्वर, तुकाराम, मर्ढेकर, जी. ए. कुलकर्णी, सौंदर्यशास्त्र, महाकाव्य- एकूणच संतसाहित्य ते आधुनिक  नव साहित्याचे साक्षेपी अभ्यासक. माणसातील अलौकिकाबरोबरच माणूस म्हणून तपासून पाहणं, वेळप्रसंगी त्याला सोलून काढणं ही सर्जनशील कलावंताची भूमिका असली पाहिजे अशी त्यांची धारणा. परंतु त्यांची धारणा आणि वर्तनव्यवहार यात विसंगती होत्या. द. भि. मुळात अहंकारी होते. ‘मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र : पुन:स्थापना’ हा प्रबंध त्यांनी नागपूर विद्यापीठात डी. लिट.साठी सादर केला होता. पण साहित्यक्षेत्रातील राजकारणाने त्यांना ही पदवी मिळू दिली नाही. यातूनच त्यांचा अहंकार फुलत गेला असेल का? अलौकिकतावादाची झूल अंगावर पांघरताना लौकिक जगण्यातील नीती-संकेत आपल्यापुरते मुडपून घेणाऱ्या डॉ. द. भिं. च्या व्यक्तिमत्त्वाचा ‘गोत्र’मधील शोध तेवढाच अर्थपूर्ण आहे.

इंग्रजी साहित्याचे अभ्यासक, कथालेखक, अभिजात साहित्याची आवड असणारे समीक्षक, जनसाहित्याचे भाष्यकार आणि माणसांविषयीची गुणग्राहकता असलेले एक कार्यकर्ता म्हणजे प्राचार्य या. वा. वडस्कर. बहुजन चळवळींबद्दल आस्था बाळगत एकाकी झटण्याची तयारी ठेवणारा कार्यकर्ता, मार्क्‍सवादी विचारांच्या बांधिलकीपोटी थेट रशियाचा प्रवास करणारा, समविचारी माणसांची मोट बांधणारा आणि थेट आंदोलनात उतरून वेळप्रसंगी समाजासाठी झीजही सहन करणारा वडस्करांसारखा माणूस शेवटी व्यावहारिक अशा निष्ठुर अनुभवांनी पराकोटीच्या औदासीन्यापर्यंत का येतो? यावर  चिंतन करणे लेखकाला महत्त्वाचे वाटते. आपल्या अवतीभवतीच्या माणसांनीच हल्ले चढवल्यानंतर एखादा प्रतिभावंत एवढा विफल का होतो? जीवनातल्या या विसंगतीची सोडवणूक न करता आल्यामुळे आपल्याच कोशात आत्ममग्न होत शेवटी अंतर्धान पावतो. हा सगळा प्रवास शोभणेंनी जवळून पाहिलेला असल्यामुळे त्या अनुभवाचं अस्वस्थपण या लेखनातून पाझरत राहतं.

पुस्तकातील अशीच एक गोष्ट कादंबरीकार- कथाकार मनोहर तल्हारांची. जीवनाकडून फार मोठी मागणी नसतानाही हातात काहीही येत नाही आणि येतं ते कापरासारखं उडून जातं. पण या अनुभवातून-सहानुभवातून शोभणेही गेलेले असल्यामुळे त्यांच्याही जगण्याच्या वाटा या प्रवासात तेजाळून निघाल्यात.

आनंद यादवही उत्तरकाळात वास्तवाची वाट सोडून संतचरित्रात का रमले, हा प्रश्न शोभणेंना अस्वस्थ करतो. एकेकाळी मौज-सत्यकथा आणि श्री. पु. भागवत, राम पटवर्धन यांच्या मुशीत घडलेल्या ‘गोतावळा’, ‘नटरंग’सारख्या कादंबऱ्या लिहिणारा हा लेखक उतारवयात चरित्रात्मक कादंबरीलेखनाकडे का वळला? त्याशिवाय ‘सत्तांतर’, ‘कलेचे कातडे’ ‘संतसूर्य तुकाराम’ अशा घटनांनी ते वादग्रस्त ठरले आणि तिथूनच त्यांच्या शोकांतिकेची सुरुवात झाली. त्यातच पुरोगामी, शोषितांचा- दुर्मुखलेल्यांचा आवाज मुखर करणारा हा लेखक समरसता साहित्यासारख्या उजव्या विचारांच्या व्यासपीठावर का विराजमान व्हावा? अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होऊनही त्यांना त्या सन्मानाला मुकावे लागले. या दुर्दैवी प्रवासाचा शोध घेताना लेखक अधिक वस्तुनिष्ठ भूमिका घेतो.

रवींद्र गोडबोले, श्रीपाद जोशी आणि मनोहर म्हैसाळकर हे वाङ्मयीन क्षेत्रातील प्रतिभावंत-कार्यकत्रे. केमिकल इंजिनीअिरगची पदवी घेतलेले गोडबोले तितक्याच चिकित्सकपणे साहित्यात रमायचे. वाङ्मयावर निरंतर प्रेम करणारा आणि लेखकांमधील निर्मितीच्या शक्यता धुंडाळणारा हा एक साक्षेपी संपादक. एका बाजूला भाऊ पाध्ये- नामदेव ढसाळ इत्यादी बंडखोरांशी आपली नाळ बांधू पाहणारा, विदर्भ साहित्य संघाशी जुळलेला, साहित्यिक चळवळींच्या केंद्रस्थानी वावरणारा, भाषाशास्त्र, तौलनिक साहित्याभ्यास, संवादशास्त्र इत्यादी विद्याशाखांचा अभ्यासक असलेला कवी श्रीपाद जोशी तर विदर्भ साहित्य संघाच्या इतिहासात आपली मुद्रा अधिक घट्टपणे उमटविणारे मनोहर म्हैसाळकर हे उत्तम संघटक, राजकारणी, मत्रभाव जपणारे, नाटक साहित्य यात रमणारे आणि आपल्या जगण्याचे एकमेव उद्दिष्ट म्हणून केवळ साहित्य संघाचा विचार करणारे अवलिया. या सगळ्यांच्या सहवासात समांतरपणे एक लेखक म्हणून, शोभणेंची झालेली जडणघडण महत्त्वाची आहे.

मराठी साहित्यातली व्यक्तिचित्रणाची परंपरा प्रतिमापूजनाच्या दोषापासून मुक्त नाही. या प्रतिमापूजनाला बाजूला सारत माणूस म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध ‘गोत्र’मधून घेतला गेला आहे. हा लेखक सगळा शोध तटस्थपणे घेऊनही बाजूला होत नाही तर तो त्या शोधाचाच एक भाग होऊन जातो.

अशा साऱ्या विलक्षण व्यक्तिमत्त्वांचा एक मोठा कोलाज ‘गोत्र’मध्ये शोभणे चितारतात.

हा कोलाज वाचकांच्याही जाणिवा समृद्ध करेल.

‘गोत्र’ – रवींद्र शोभणे,

राजहंस प्रकाशन,

पृष्ठे – १७७, मूल्य – २५० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2020 4:16 am

Web Title: article on gotra ravindra shobhane book review abn 97
Next Stories
1 स्त्रीकेंद्री नातेसंबंधांच्या कथा
2 निखळ निर्मळतेचा शोध
3 सांगतो ऐका : मोझार्ट एक जिवंत आख्यायिका
Just Now!
X