मनोहर पारनेकर

samdhun12@gmail.com

gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
Yuzvendra Chahal Becomes First Bowler To Complete 200 Wickets in IPL
IPL 2024: युझवेंद्र चहलने रचला इतिहास, आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला गोलंदाज
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Gautam Gambhir Hugs MS Dhoni after CSK vs KKR Match IPL 2024
IPL 2024: चेन्नई-कोलकाताच्या सामन्यापेक्षा धोनी-गंभीरच्या गळाभेटीची चर्चा, दोघांच्या ‘जादू की झप्पी’ चा VIDEO व्हायरल

बहोत घुमी है हमने दिल्ली और इंदौर की गलियां

न भूली है, न भूलेगी हमें लाहोर की गलियां

– राजिंदर कृष्ण

नर्गिस आणि करण दिवाण यांच्या भूमिका असलेल्या आणि १९४९ साली प्रदर्शित झालेल्या ‘लाहोर’ या चित्रपटातील हा एक शेर. स्वतंत्र भारतात जन्माला आलेल्या दोन पिढय़ांच्या माहितीसाठी : इंदोर शहर म्हणजे होळकर संस्थांनच्या एकोणीस तोफांची सलामी असलेलं राजधानीचं शहर होतं. तसंच ब्रिटिश साम्राज्यामध्ये या संस्थानावर होळकर घराण्याची सत्ता होती. (शाळकरी विद्यार्थ्यांनी त्यांच्या समाज शिक्षण या विषयाच्या पाठय़पुस्तकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल निश्चित वाचलं असेल! )

हिंदी सिनेसृष्टीमधील प्रख्यात गीतकार आणि पटकथाकार राजिंदर कृष्ण यांचा जो एक शेर मी लेखाच्या सुरुवातीला दिला आहे त्यास वाचकांनी फार गंभीरपणे घेऊ नये. याचंकारण म्हणजे, इंदोर शहर हे स्वातंत्र्याच्या आधी पन्नासएक वर्षांपासून केवळ गल्ल्या सोडून इतर बऱ्याच कारणांसाठी बातमीचा विषय असायचे. यापैकी आता मी सांगणार आहे त्या चार गोष्टी अशा..

पहिली गोष्ट : सर्वसाधारणपणे १९३० ते १९५० या तीन दशकांच्या काळात बॉम्बे खालोखाल इंदोर हे क्रिकेटच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेचे महत्त्वाचे केंद्र होते. होळकर क्रिकेट संघातील कर्नल सी. के. नायडू आणि कॅप्टन मुश्ताक अली हे देशभरात प्रसिद्ध आणि अतिशय लोकप्रिय क्रिकेटपटू होते. (कर्नल आणि कॅप्टन हे इंदोरच्या महाराजांनी त्यांना बहाल केलेले लष्करी हुद्दे होते. त्या दोघांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात बंदुकीतून एक तरी गोळी झाडली असेल का, याबद्दल मला शंका आहे.) भारतीय क्रिकेटचा एरॉल फ्लिन म्हणून प्रसिद्ध असलेला मुश्ताक अली आणि त्यानंतर जवळजवळ अर्धशतकानंतर भारतीय क्रिकेटमधील ‘द वॉल’ म्हणून प्रसिद्ध झालेला राहुल द्रविड या दोघांचाही जन्म इंदोरचा आहे.

दुसरी गोष्ट : राष्ट्रीय पातळीवर बऱ्याच वेळा बातमीचा विषय असलेले सर शेठ हुकूमचंद जैन (कासलीवाल) हेदेखील इंदोरचेच. शेठजींना ‘कॉटन प्रिन्स ऑफ इंडिया’ असं म्हटलं जायचं. त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या दोन कॉटन मिल्स होत्या. शिवाय कलकत्त्यात तागाच्या गिरण्या (Jute Mills) प्रथमच सुरू करणाऱ्या भारतीय उद्योगपतींपैकी ते एक होते. १९१९ मध्ये घेतलेली डेम्लर, ४५ एच.पी., स्पेशल गोल्ड लिमोसिन ही त्याकाळची  देशातली सर्वात महागडी आणि भपकेदार मोटार गाडी त्यांच्याकडे होती.

तिसरी गोष्ट : त्या काळात तुकोजीराव आणि यशवंतराव होळकर हे पिता-पुत्र इंदोर संस्थानाचे राजे होते. दोघेही सतत बातमीत असत, पण त्यांच्या प्रजाजनांना अभिमान वाटावा अशा कारणांसाठी मात्र क्वचितच. त्या काळात देशभरात खळबळ माजवणाऱ्या ‘बावला खून खटल्या’त तुकोजीराव अडकले होते. मुमताज बेगम नावाची एक अतिशय सुंदर मुस्लीम नर्तिका होती. अब्दुल कादिर बावला नावाच्या एका धनाढय़ व्यापारी असलेल्या तिच्या प्रियकराबरोबर ती मुंबईत राहत होती.

(मुमताज अगोदर तुकोजीराव महाराजांच्या जनानखान्यातून पळून आली होती) या मुमताज बेगमला पळवून आणण्यासाठी महाराजांनी मुंबईला आपले गुंड पाठवले होते. तिला

पळवून नेण्याचा बेत सपशेल फसला. पण त्या प्रयत्नात त्यांच्या गुंडांनी बावलाचा खून केला. त्यानंतर महाराजांवर खटला भरला गेला आणि या खटल्यात महम्मद अली जिना आणि सर तेज बहादूर सप्रू हे देशातील दोन सर्वोत्तम वकील एकमेकांविरुद्ध उभे राहिले होते. या खटल्यात शेवटी महाराजांना आपली गादी गमवावी लागली. इंग्रज सरकारने त्यांना आपलं राजेपद त्यागण्यास भाग पाडलं.

चौथी गोष्ट : १९२६ ते १९३९ या काळात सर सिरेमल बापना हे होळकर संस्थानाचे (इंदोर) पंतप्रधान होते. दुसरं महायुद्ध सुरू व्हायच्या काही वर्ष आधी त्यांनी बेनेटो मुसोलिनी आणि अ‍ॅडॉल्फ हिटलर या दोघांची गुप्तपणे भेट घेतली होती. आजच्या शब्दात सांगायचं तर या दोन्ही भेटी म्हणजे ग्रेट ब्रिटनच्या ‘बॅक चॅनल डिप्लोमसी’ चा एक भाग होता. (म्हणजे दुसऱ्या देशाच्या प्रमुखाबरोबर अनधिकृतरित्या संपर्क प्रस्थापित करणे) ते मुसोलिनीला काप्री येथे भेटले. ही भेट ठरवण्यात ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी पुढाकार घेतला होता. इथियोपियावर आक्रमण करण्याची मुसोलिनीची काही योजना आहे का, याचा अंदाज घेण्यासाठी ही भेट आयोजित करण्यात आली होती. हिटलर बरोबर त्यांची भेट घडवून आणण्याची कल्पना सर विन्स्टन चर्चिल यांची होती. (नाझी जर्मनीचा उदय होतो आहे हे  सर्वात आधी त्यांनी ओळखलं होतं.) सर सिरेमल यांचे पणतू उपेंद्र सिंग यांनी केलेल्या संशोधनामुळे ही सनसनाटी नवीन माहिती काही वर्षांपूर्वीच उघडकीला आली आहे.

.. तर काही महिन्यांपूर्वीच भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदोरची सलग चौथ्यांदा निवड झाली. भारताच्या शहर विकास मंत्रालयाने ‘स्वच्छ भारत अभियान’ या मोहिमेअंतर्गत इंदोर शहराची अलीकडेच ही निवड केली. या मिशनच्या सर्वेक्षणात चार प्रमुख मापदंडांवर भारतातील सुमारे चारशेहून जास्त शहरांचं मूल्यमापन केलं गेलं ते असं- १) कचरा संकलन २) घनकचरा व्यवस्थापन ३) स्वच्छतागृहांची उभारणी. ४) स्वच्छताविषयक धोरणांची आखणी. मुख्यत्वेकरून, मूळ ठिकाणीच कचरा वेगवेगळा करणे आणि त्यावर त्या ठिकाणच्या जवळच प्रक्रिया करणे या क्षमतांमुळेच इंदोरला हा मान मिळाला. यासाठी नागरिक आणि अधिकारी यांमध्ये परस्पर विश्वास निर्माण तर करावा लागलाच. शिवाय, कायदा मोडणाऱ्या व्यक्तींसाठी जबर दंडाची शिक्षा पण ठेवली आहे. या दोन महत्त्वाच्या गोष्टींमुळे हे साध्य झालं.

या संदर्भात २०१४ साली ४००+ शहरांच्या यादीत इंदोरचा क्रमांक १४९ होता. पण केवळ तीन वर्षांच्या काळात शहराने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. यासाठी नागरिक आणि प्रशासकीय अधिकारी यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. या शहरासाठी ही फारच मोठी आणि विशेष अभिमानाची गोष्ट आहे. कारण एक- हे शहर बऱ्याच काळापासून प्रामुख्याने खवय्यांचं (इथली पोहा-जिलेबी फार प्रसिद्ध आहे आणि आज ‘छप्पन्न दुकान’ हा भाग शहराची एक प्रमुख पेहेचान बनली आहे.) आणि गवय्यांचं शहर म्हणूनही प्रसिद्ध आहे. आणि दुसरं म्हणजे, नागरी प्रशासन कुशलता किंवा नागरी प्रश्नांमध्ये जनतेच्या सहभागाविषयी हे शहर यापूर्वी कधीच फारसं प्रसिद्ध नव्हतं.

इंदोरचं उदाहरण बघताना जगातली सर्वात स्वच्छ शहरं कोणती? आणि त्यांनी हे स्थान प्राप्त करण्यासाठी काय प्रयत्न केले? त्या तुलनेत भारतातील शहरं नेमकी कुठे आहेत? असे प्रश्न जिज्ञासू वाचकांच्या मनात साहजिकच उभे राहतील. यातल्या दुसऱ्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देणं हे या लेखाच्या मर्यादेबाहेर आहे. पण मी जगातील दहा सर्वात स्वच्छ (पण कोणताही क्रम न देता) शहरांची यादी खाली देतो. ती अशी- हेलसिंकी (फिनलंड), ऑस्लो (नॉर्वे), व्हिएन्ना (ऑस्ट्रिया), स्टॉकहोम (स्वीडन), कोबे (जपान), सिंगापूर, फ्रीबर्ग (जर्मनी), अ‍ॅडलेड (ऑस्ट्रेलिया), झुरिक (स्वित्झर्लंड), लक्झेम्बर्ग शहर (लक्झेम्बर्ग) आणि कॅलगेरी (कॅनडा.)

शेवटी इंदोरशी जवळचा किंवा थोडय़ाबहुत प्रमाणात का होईना संबंध असलेल्या, इंदोरमध्ये किंवा त्याच्या जवळपास जन्मलेल्या, तिथे वाढलेल्या, शिक्षण घेतलेल्या, वास्तव्य केलेल्या किंवा स्थायिक झालेल्या काही प्रसिद्ध व्यक्ती पुढीलप्रमाणे आहेत. (अर्थातच ही यादी पूर्ण नसून तिच्यात भर नक्कीच घालता येईल.)

(१) कला, साहित्य, पत्रकारिता :  एम. एफ. हुसेन, विष्णू चिंचाळकर (गुरुजी), महादेवी वर्मा, शिवमंगल सिंग सुमन (उज्जन), डॉ. राहत इंदोरी, राहुल बारपुते, राजेंद्र माथुर, प्रभाष जोशी, दीपक चौरसिया आणि बाबा डिके.

(२) क्रिकेट : सी. के. नायडू, सी. एस. नायडू, मुश्ताक अली, सर डेनिस कॉम्प्टन (महू), चंदू सरवटे, राहुल द्रविड, हनुमंत सिंग, राजसिंग डुंगरपुर आणि नरेंद्र हिरवानी.

(३) हॉकी : शंकर लक्ष्मण.

(४) हिंदी सिने जगत : लता मंगेशकर, किशोर कुमार, जॉनी वॉकर, सलीम खान (सलीम-जावेद या जोडीमधला), त्याचा मुलगा आणि आजचा सुपरस्टार सलमान खान, स्वानंद किरकिरे, स्नेहा खानवलकर, अंकिता लोखंडे आणि शुभांगी अत्रे.

(५) शास्त्रीय संगीत : उस्ताद रजब अली खान, उस्ताद अमीर खान (त्यातल्या त्यात तरुण अशा इंदोर घराण्याचे संस्थापक पंडित कुमार गंधर्व, उस्ताद रईस खान, उस्ताद हलीम जाफर खान (जावरा), उस्ताद निजामुद्दीन खान (जावरा), पंडित मुकुल शिवपुत्र, पंडित उदय भवाळकर (उज्जन) गुंडेचा ब्रदर्स- रमाकांत आणि उमाकांत (उज्जन), सत्यशील देशपांडे आणि कलापिनी कोमकली.

(६) राजकारण : होमी दाजी , सुमित्रा महाजन, दिग्विजयसिंह आणि कैलास विजयवर्गीय.

(७) इतर क्षेत्रांतल्या काही प्रसिद्ध व्यक्ती :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर (महू), फिल्डमार्शल के. एम. करिअप्पा (डेली कॉलेज)आणि सध्या न्यूयॉर्कस्थित विख्यात सर्जन सी. एस. राणावत.

शब्दांकन : आनंद थत्ते