‘गेले ते दिवस’ हा वि. वि. करमरकर (‘लोकरंग’ ८ फेब्रुवारी) यांचा लेख  वाचला. त्यातील विचारांशी मी सहमत आहे. मी गेली ५० वर्षे क्रिकेटमध्ये रस घेत आहे व समालोचन ऐकत/ पाहत आहे. मलाही ज्युनियर पतौडींपासूनच्या संघापासून आपल्या देशाच्या संघातील बहुतेक सर्व क्रिकेटपटूंची नावे अजून स्मरतात. lok03त्यावेळी क्रिकेटचा वर्षांतून एखादाच दौरा असे व तेव्हाचे सारे वातावरण उल्हासाचे व उत्साहाचे असे. घरीदारी एकच प्रश्न- ‘संघात कोण-कोण असतील?’ ‘सामन्यांचे वेळापत्रक कधी कळणार?’ ‘सुनीलच्या किती धावा?’, इत्यादी. सुनील गावस्कर व त्यानंतरच्या सर्व संघांनी आम्हाला जिंकण्याची सवय लावली. त्याने क्रिकेटपटूंची संघटना बांधली. मानधन वाढवून घेतले. एखाद-दोन जाहिराती केल्या. इथवर सर्व ठीक होते. पण नंतर जाहिरातबाजीने क्रिकेटचे बाजारीकरण झाले. हे क्रिकेटपटू आहेत की, जाहिरातपटू, असा प्रश्न आता पडू लागला आहे.
माझ्या महाविद्यालयात आमचे प्राध्यापक काही वेळा मॅचमध्ये रस घेत व क्रिकेटवर गप्पाही मारत. इतर प्राध्यापक वर्गात ट्रान्झिस्टर्स आणू देत नसत, परंतु प्रभुराम जोशी व राम पटवर्धन हे मुलांनाच वर्गात स्कोअर विचारीत. वर्गात बारीक आवाजात ट्रान्झिस्टर्स लावू देत असत अथवा १०-१५ मिनिटांनी स्कोअर विचारीत असत. संघ विजयाच्या मार्गावर असल्यास वर्गात जल्लोष होई.
पुढे पुढे ट्रान्झिस्टर्स मुबलक झाले. दूरदर्शनवर सामने पाहता येऊ लागले. बिल्डिंगमध्ये एखादाच टी.व्ही. सेट असे. मग त्यांच्या घरी गर्दी अनावर होई. समालोचकांच्या नावाबद्दलही चर्चा होई. हिंदीतली समालोचनाची सवय नव्हती, तीही होऊ लागली. गल्लीगल्लीत, कोपल्या-कोपऱ्यावर मॅचची चर्चा होई. क्रिकेटमध्ये पैसा खूप आला आणि खेळाडू खेळापेक्षा मोठे झाले.  गावस्करच्या निवृत्तीनंतर कसोटी सामन्यातील ते ‘कॉपी-बुक क्रिकेट’ संपले. आता सचिनच्या निवृत्तीनंतर क्रिकेटमधील राम गेला. खरेच ‘गेले ते दिवस!’

रंग-संवेदनेचा हृदयस्पर्शी लेख
दासू वैद्यांचा ‘रंग’ हा लेख वाचून मनात काही वैयक्तिक अनुभवांचे रंग दाटून आले. मी वैद्यकीय क्षेत्रात नोकरी करते. फार पूर्वी दवाखान्यात लाल रंगाचा ड्रेस घालून गेले असताना एका वृद्ध रुग्णाने, ‘लाल’ रंगाचा ड्रेस घालत जाऊ नका, ‘आम्हाला भीती वाटते,’ अशी विनंतीवजा सूचना केल्यावर मी चपापले होते. लाल रंग मला व्यक्तिश: आवडत असला तरी त्यानंतर दवाखान्यात जाताना मी लाल रंगाचे कपडे कधीच घालू शकले नाही. गर्भवती स्त्रीला नाना प्रकारचे डोहाळे लागतात, ही कल्पना की वैज्ञानिक सत्य, हा वाद बाजूला ठेवून एक पुन्हा व्यक्तिगत अनुभव सांगावासा वाटतो. मी गर्भवती असताना मला पिवळय़ा रंगाचे डोहाळे लागल्याचे स्मरते. तो रंग मला पूर्वी विशेष आवडत नसे व मूल झाल्यानंतर ते वेड खरेच ओसरले. हा काय प्रकार असेल? काही रंग कलेच्या माध्यमातून प्रतीके बनून समोर आल्यावर त्याच पद्धतीने मनावर ठसतात. माझ्या मनात निळा रंग कवितांमुळे तरल पद्धतीने रुतून बसलाय. तर पांढरा रंग वैधव्याची निशाणी म्हणून नावडता बनलाय. रंगांची आवड-निवड अनुभवांवर, मानसिकतेवर, स्वभावावर अवलंबून असते, हे सहज लक्षात येते. काही रंग स्वप्नात येऊनही त्यांना अनुभवून बघण्याची सूचना देऊन गेलेत. तात्पर्य, अत्यंत वैयक्तिक अशा रंगानुभूतीला वैद्यांनी स्पर्श केला आहे. एकूण मानवी संवेदनांना रंगांधळेपण आले असल्याच्या काळात वैद्यांची ही संवेदनशील रंग-उधळण मनाला गहिरा आनंद देऊन गेली. लेख वाचणाऱ्या प्रत्येकानेच रंगविषयक अनुभांचा हा मनोज्ञ खेळ कधी ना कधी अनुभवला असेल.
– राजश्री बिराजदार, दौंड, पुणे.