नेर्दलड्स
आपल्याकडे आता सणासुदींचा मोसम सुरू झाला आहे. आपणा भारतीयांप्रमाणेच वेगवेगळ्या देशांतील स्थानिक संस्कृतींत वैविध्यपूर्ण सण आणि उत्सव साजरे केले जात असतात. देशोदेशींच्या या सण व उत्सवांचा वेध घेणारे लेख.. खास ‘लोकरंग’ वर्धापनदिनानिमित्ताने!
दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला- ‘‘ही कम्स, ही कम्स.. अवर डियर, गुड ओल्ड सिंट; माय बेस्ट फ्रेंड, युअर बेस्ट फ्रेंड, द  फ्रेंड ऑफ इच अ‍ॅन्ड एव्हरी किड्..’’  किंवा ‘‘देअर इज अ नॉक अ‍ॅट द डोअर, अ हार्र्ड नॉक, अ सॉफ्ट नॉक, व्हू वूड दॅट बी?’’ ..‘‘डोन्ट वरी माय चाइल्ड, आय अ‍ॅम अ गुड  फ्रेंड. फॉर दो आय अ‍ॅम ब्लॅक अ‍ॅज सूट, आय वॉन्ट यू टु बी हॅपी..’’ अशी डच भाषेतली अनेक जिंगल्स नेर्दलड्समधल्या लहान मुलांच्या तोंडी आपल्याला ऐकायला मिळतात. आणि जसजसा  पाच डिसेंबरचा दिवस जवळ येतो, तसा लहान मुलांचा आनंद आणि उत्सुकता शिगेला पोहोचते. दरवर्षी पाच डिसेंबर हा दिवस नेर्दलड्समधल्या लहान मुलांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि खास असतो. कारण त्या दिवशी त्यांचा आवडता सिंटक्र्लास (सेंट निकोलस) त्याच्या सहकाऱ्यांसोबत (ब्लॅक पीट्स) सगळ्या लहान मुलांसाठी भेटवस्तू, गोळ्या, चॉकलेट्स घेऊन येतो.
सेंट निकोलस दिन ६ डिसेंबरला असला तरी नेर्दलड्समध्ये पाच डिसेंबरलाच तो साजरा केला जातो. या उत्सवाची सुरुवात मध्ययुगात झाल्याची नोंद आहे. नाताळच्या सणावेळी आपण ज्या सॅन्टाक्लॉजची वाट बघतो त्याचं मूळदेखील या सिंटक्र्लासमध्येच (सेंट निकोलस) आहे. सेंट निकोलस हा तिसऱ्या शतकातला एक थोर संत. त्याचा जन्म सध्याच्या तुर्कस्तानातील मायरा या गावी झाला. तर मृत्यू सध्याच्या इटलीमधील बारी या गावी झाला. परंतु डच लोकांच्या मते, सेंट निकोलस स्पेनमध्ये वास्तव्यास होता. अशी धारणा असण्यामागे दोन शक्यता आहेत- (१) मायरा व बारी या दोन स्थळांच्या नावांचा अपभ्रंश होऊन आलेल्या माद्रिद या स्पेनमधील गावाहून सेंट निकोलस येतो असं प्रचलित झालं. किंवा- (२) इटलीतील बारी हे गाव १८ व्या शतकापर्यंत स्पेनचा भाग होते व म्हणून सेंट निकोलस स्पेनहून येतो असे प्रचलित झालं. त्यामुळे दरवर्षी तिथून तो नेर्दलड्समध्ये येतो असं लोक मानू लागले. सेंट निकोलसचं मूळ कुठेही असलं तरी डच लोक अगदी मनापासून त्याची प्रार्थना करतात. इतिहासातही सेंट निकोलसचा ‘सर्वाचं रक्षण करणारा’ अशा शब्दांत गौरव केल्याचं आढळतं. मुलंमुली, विद्यार्थी, व्यापारी, दर्यावर्दी, मच्छिमार आणि त्यांच्या बोटी अशा सर्वाचं रक्षण करणारा महान संत म्हणून सेंट निकोलसची महती आहे. दर्यावर्दी लोक त्याला जास्त मानत असल्यामुळं असेल कदाचित; सिंटक्र्लास दरवर्षी बोटीतून नेदर्लंड्समध्ये येतो अशी समजूत आहे. त्याच्यासोबत त्याचे मिश्कील सहकारी ब्लॅक पीट्सदेखील असतात. ब्लॅक पीट्सचा प्रथम उल्लेख सन १८५० साली प्रकाशित झालेल्या आणि यान क्नेक्त या अ‍ॅमस्टरडॅममधील एका शिक्षकाने लिहिलेल्या ‘सेंट निकोलस अ‍ॅन्ड हिज सव्‍‌र्हन्ट्स’ या पुस्तकात आढळतो. हे सहकारी कृष्णवर्णीय असण्यामागेदेखील दोन धारणा आहेत. एक अशी की, हे सहकारी जुन्या उत्तर आफ्रिकेतले आणि आत्ताच्या मोरोक्कोतले मूर लोक होते, म्हणून ते कृष्णवर्णीय असतात. तर दुसरी धारणा अशी की, या सहकाऱ्यांना घरांच्या चिमण्यांमधून खाली-वर करावं लागतं, तेव्हा त्यांच्या अंगाला चिमणीतली काजळी लागते, म्हणून ते कृष्णवर्णीय!मात्र, हा वर्णभेद गेल्या काही वर्षांत वादाचा मुद्दा ठरू लागला आहे आणि त्यामध्ये सरकारला विशेष लक्ष घालावं लागत आहे. या सहकाऱ्यांमध्येदेखील एक मुख्य (होफ्दपीत), स्पेनवरून येताना बोटीवर उपयोगी पडेल असा दिशांचं ज्ञान असणारा पीट (वेखवैजपीत), भेटवस्तूंचं पॅकिंग करणारा (पाक्यस्पीत) असं कामानुसार वर्गीकरण असू शकतं. या सहकाऱ्यांचे अंगरखे छान रंगीबेरंगी असतात. त्यांच्या टोप्याही रंगीत पिसांनी सजवलेल्या असतात. अंगरख्यावर फ्रिलची कॉलर असते.नित्यनेमाने पाच डिसेंबरला सकाळी सिंटक्र्लास त्याचा लाल बिशपचा अंगरखा परिधान करून  नेदर्लंड्समधल्या एखाद्या गावाला किंवा शहराला भेट देतो. दरवर्षी ही गावं किंवा शहरं वेगळी असतात. त्यांची बोट किनाऱ्याला लागली की त्या गावातील लोक आणि स्थानिक चर्चेस घंटानादाने त्यांचं स्वागत करतात. त्यानंतर सिंटक्र्लास एका सजवलेल्या पांढऱ्याशुभ्र घोडय़ावर बसून त्याच्या सहकाऱ्यांसोबत शहरातून फेरफटका मारतो. अ‍ॅमस्टरडॅममध्येही दरवर्षी सिंटक्र्लासची एक मिरवणूक निघते. गेल्या वर्षी या मिरवणुकीचं ७५ वं वर्ष होतं. सिंटक्र्लाससोबत अनेक ब्लॅक पीट्स गमतीजमती करून लोकांचं मनोरंजन करतात. त्यानंतर सिंटक्र्लास नेदर्लंड्सच्या राजाची भेट घेतो. त्या दिवशी लहान मुलं घरातल्या शेकोटीपाशी किंवा खिडकीपाशी त्यांचे लाकडी बूट (क्लॉग्स) किंवा बूट ठेवून देतात. त्यांना आशा असते की, रात्री सिंटक्र्लास येऊन त्यांच्यासाठी आणलेल्या भेटवस्तू त्या बुटांमध्ये ठेवेल. त्यांना असंही वाटतं की, सिंटक्र्लासच्या घोडय़ासाठी थोडंसं गवत आणि गाजरं ठेवली तर त्याबदल्यात त्यांनाही मिठाया, गोळ्या, चॉकलेट्स मिळतील. त्यांना मोठय़ांकडून सांगितलं जातं की, रात्री त्यांचा आवडता सिंटक्र्लास घोडय़ावरून त्यांच्या घराच्या छतावर येईल आणि त्याच्या आदेशानुसार एखादा ब्लॅक पीट घराच्या चिमणीमधून खाली उतरून मुलांसाठी आणलेल्या भेटवस्तू आणि गोळ्या-बिस्किटं बुटांमध्ये ठेवून जाईल. लहान मुलांना असंही बजावलं जातं की, ब्लॅक पीट वर्षभर त्या- त्या मुला-मुलीची वागणूक पाहत असतो आणि त्याची नोंद करत असतो. जी मुलं शहाण्यासारखी वागतील त्यांनाच फक्त बक्षिसं आणि भेटवस्तू मिळतील. आणि जी वेडेपणा करतील त्यांना शिक्षा म्हणून ब्लॅक पीट आपल्या झोळीत घालून स्वत:बरोबर स्पेनला घेऊन जातील! सिंटक्र्लासच्या आवडीच्या आणि नशीबवान मुला-मुलींना घराबाहेरील पिशवीत त्यांची बक्षिसं मिळतील! शाळांमध्येही एक गमतीशीर नियम आहे. सिंटक्र्लासच्या दिवशी वर्गातील सर्व मुलांची नावं चिठ्ठय़ांमध्ये लिहून त्या चिठ्ठय़ा एका टोपीत ठेवतात. त्यानंतर प्रत्येक मुलगा/मुलगी एक-एक चिठ्ठी उचलते आणि ज्याचं नाव त्या चिठ्ठीत असेल त्यासाठी एक भेटवस्तू बनवते. ही भेटवस्तू त्या मुलाचे किंवा मुलीचे छंद जोपासणारी असली पाहिजे. त्या भेटवस्तूसोबत एक संकेतात्मक कविता किंवा एखादा निरोप असतो; ज्यातून भेटवस्तू पाठवणाऱ्याची ओळख पटते. पण तोवर हे सगळं एक गुपित असतं. एकूणच मुलांची खरंच मज्जा असते.सिंटक्र्लासच्या निमित्तानं साजऱ्या होणाऱ्या पाटर्य़ामध्ये मुलं आणि त्यांचे पालक सिंटक्र्लासची जिंगल्स म्हणतात, छोटी नाटकं वा पपेट-शो करतात. अनेकदा लहान मुलांसाठी ट्रेझर हंटचा खेळ खेळला जातो; ज्यामध्ये मुलांना खजिना शोधण्यासाठी काही संकेत दिले जातात आणि बरोबर उत्तर दिल्यास त्या मुलाला/ मुलीला सिंटक्र्लासकडून बक्षीस मिळतं. या पाटर्य़ासाठी विशेष ब्रेड-बिस्किटं बनवली जातात. काही बिस्किटं पार्टीसाठी आलेल्या प्रत्येक माणसाच्या नावाच्या आद्याक्षराच्या आकाराची असतात; जी मार्झिपॅन किंवा पेस्ट्रीपासून बनवलेली असतात. तर काही गोड बिस्किटं बडीशेप, दालचिनी आणि काही मसाले घालून बनवलेली असतात. त्यांना ‘पेपरनोतेन’ म्हणतात. याशिवाय स्पेक्युलास (मसालेदार बिस्किटं), क्रौदनोतेन (आलं आणि मसाला असलेली छोटी बिस्किटं), ताई-ताई (बडीशेप आणि मधाची बिस्किटं), दौव्हकातर (सणासाठी तयार केलेले गोड ब्रेड) असे अनेक पदार्थ बनवले जातात. त्याचबरोबर लोक बिस्कोप्स्वैन (एक प्रकारची वाईन) घेणंही पसंत करतात.दिवस संपला की सिंटक्र्लास पुन्हा त्याच्या गावी स्पेनला निघून जातो. लहान मुलं न विसरता प्रेमानं त्याला निरोप देतात आणि म्हणतात, ‘बाय बाय सिंटक्र्लास. बाय बाय ब्लॅक पीट. बाय बाय सो लॉग. बाय बाय सिंटक्र्लास. बाय बाय ब्लॅक पीट. लिसन टू अवर फेअरवेल सॉंग!!’