12 August 2020

News Flash

श्रीमंत कुणाला म्हणावे?

सामान्य माणसांना छोटय़ा छोटय़ा गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करणारे पाक्षिक सदर.. अनेक व्यक्तींना आपण फार श्रीमंत व्हावे अशी एक सुप्त इच्छा असते. काही मंडळी ती इच्छा बोलून...

| January 12, 2014 01:01 am

सामान्य माणसांना छोटय़ा छोटय़ा गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करणारे पाक्षिक सदर..
अनेक व्यक्तींना आपण फार श्रीमंत व्हावे अशी एक सुप्त इच्छा असते. काही मंडळी ती इच्छा बोलून दाखवतात, तर काही ती मनात खोल दाबून ठेवतात. ‘श्रीमंत म्हणजे नक्की कोण?,’ असे विचारले तर मात्र, ‘असा काय विचित्र प्रश्न आहे हा?,’ असे भाव लोकांच्या चेहऱ्यावर दिसतात. त्यात चुकीचे काही नाही. ‘ज्याच्याजवळ पैसे आहेत तो श्रीमंत!’ एवढी सरळ सोपी व्याख्या असताना, नको तिथे पाल्हाळ कशाला लावताय, असे म्हटले जाते. पण खरेच ते तसेच आहे का?
२००४ मधली गोष्ट. वर्गात रेगेसर शिकवत होते आणि त्यांनी सहज विचारले- ‘श्रीमंत म्हणजे काय? श्रीमंत कोणाला म्हणावे?’ व्यवस्थापन- शास्त्राच्या हुशार विद्यार्थ्यांना हा प्रश्न अगदीच ‘हा’ वाटला. कोणी म्हणाले, पैसेवाल्या माणसांना श्रीमंत म्हणावे. ज्याच्याजवळ सोने आहे तो श्रीमंत.. ज्याच्याजवळ जमीनजुमला, शेअर्स आहेत तो श्रीमंत. त्यातल्या त्यात काही आगाऊ मुलांनी ‘अमुक तमुक सव्‍‌र्हेनुसार, ज्याच्याजवळ एक बिलियन अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त संपत्ती आहे तो श्रीमंत!,’ असेही सांगितले. काहींनी सोपा मार्ग स्वीकारला : बफे, अंबानी, बिर्ला, टाटा हे सगळे श्रीमंत. रेगेसरांच्या चेहऱ्यावर बारीक स्मित उमटले. त्यांनी पुढचा प्रश्न विचारला, ‘जी नावे तुम्ही घेताय ती मंडळी त्यांच्या मनाला येईल ते उद्या सकाळी करू शकतात का?’ अजिबात नाही. या प्रत्येक जणाच्या नावाची एक डायरी आहे आणि तीत पुढील वर्षभर ही मंडळी काय करणार आहेत, हेसुद्धा ठरलेले आहे. त्यात यित्कचितही बदल करणे या मंडळींना फार तापदायक आहे. पण मुंबईतल्या सिग्नलवरचा भिकारी मात्र त्याला हवा तसा स्वच्छंद जगू शकतो.
यावर वर्गातील अनेकांनी अनेक आक्षेप घेतले. ‘भिकाऱ्याला हक्काचे घर आहे का?,’पासून ‘त्याला जेट विमानातून जग फिरता येणार आहे का?,’ इथपर्यंत प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. पण सर्वाच्या मनात खोलवर कुठेतरी हा मुद्दा कोरला गेला : फक्त पैसे असून चालत नाही, तर आपल्याकडे जीवनात अनेक पर्याय असतील तरच आपण खरे श्रीमंत आहोत, याची जाणीव झाली. दैनंदिन जीवनात पर्याय असणे म्हणजे काय, याचादेखील थोडा विचार करणे आवश्यक आहे. खिशात एवढे पैसे आहेत, की आज मला जेवताही येते, चित्रपटदेखील बघता येतो, आणि दिवसभर आराम केला तरी रात्रीच्या जेवणाची भ्रांत नाही, एवढाच ‘श्रीमंत’ असण्याचा संकुचित अर्थ नाही. मग श्रीमंत म्हणजे नक्की कोण?
आपल्या प्रत्येकाचे एक जीवनमान आहे. एक जीवनशैली आहे. काही मंडळी दरमहा २५,००० रुपयांमध्ये सुखात राहतात. तर काही हातात दरमहा ५,००,००० रुपये असले तरच महिना काढू शकतात. म्हणजे आपल्या आíथक गरजा व्यक्तीसापेक्ष आहेत. आपली जीवनशैली उंचावत जाते, किंवा ती तशी उंचावत जावी अशी आपली इच्छा असते. पाच वर्षांपूर्वी पायी जाणारा आज दुचाकीची अपेक्षा ठेवतो, तर ज्याच्याजवळ दुचाकी आहे तो चारचाकीची अपेक्षा ठेवतो. त्यात महागाईची भर पडत असते. थोडक्यात सांगायचे तर दरमहा आपली जीवनशैली सांभाळून जगण्यासाठी व त्यात सुधारणा आणण्यासाठी लागणारी रक्कम वाढायची शक्यताच जास्त आहे. आता श्रीमंत कोणाला म्हणावे, याच्या पहिल्या निकषाकडे आपण आलो आहोत. तुमच्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत तुम्हाला आवश्यक त्या जीवनशैलीनुरूप जगण्यासाठी आवश्यक तितका पसा आज तुमच्याजवळ असेल, किंवा तुमचे उत्पन्नस्रोत तितकी पैसा निर्माण करू शकत असतील तर कदाचित तुम्ही श्रीमंत आहात. श्रीमंत तोच- जो त्याच्या जीवनशैलीप्रमाणे उपलब्ध सर्व पर्यायांचा/ सुखांचा आनंद त्याच्या संपूर्ण हयातीत घेऊ शकतो. आज एखादा उद्योगपती छान मजेत राहत असेल, पण पुढील वर्षी काय होणार, याची त्याला खात्री नसेल तर त्याला श्रीमंत म्हणणे योग्य होणार नाही.
पण हा झाला केवळ एक निकष. नुसते जमीनजुमले असून उपयोगाचे नाही. ते वेळेवर उपयोगी आले पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या  ‘अनुमती’ या चित्रपटात पशाच्या पाठबळाअभावी हतबल झालेल्या वृद्धाला पत्नीच्या आजारपणात पैसे उभे करण्यासाठी विम्याच्या पॉलिसीचा  काही उपयोग होत नाही. कारण त्या विशिष्ट पॉलिसीच्या अटींमध्ये ते बसत नाही. हातात एक ‘अ‍ॅसेट’ किंवा ‘मालमत्ता’ असूनही तिचा उपयोग होत नाही. अशी काही माणसे आपल्या आजू बाजूला दिसून येतात, की ज्यांच्याजवळ मालमत्ता असते, पण दोन वेळेला खायला अन्न नसते. त्यांना श्रीमंत म्हणणे म्हणजे त्यांच्या आíथक स्थितीची टिंगल ठरेल. त्यामुळे तुमचे उत्पन्नाचे स्रोत आणि मालमत्ता तुम्हाला श्रीमंत करतात का, हे तपासून पाहणे आवश्यक आहे.
केवळ आपण मजेत जगले म्हणजे झाले, असे भारतीय संस्कृती मानत नाही. आपले कुटुंब आणि आपला समाज यांची काळजीदेखील आपण घेतली पाहिजे, असे आपल्याला शिकविले जाते. आपल्या हयातीत तर आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतोच; पण आपल्या पश्चातदेखील ती व्यवस्था आपण बघितली पाहिजे. ‘त्याचे काय, सात पिढय़ा बसून खातील इतका पसा आहे त्याच्याजवळ!,’ असे लोकांनी म्हटले म्हणजे झाले असे मात्र नाही. मोठमोठय़ा उद्योगपतींच्या निधनानंतर त्यांची मुले एकमेकांशी भांडतात आणि पशासाठी न्यायालयांचे उंबरे झिजवतात. कित्येकदा या वादात मालमत्ता कोर्टाच्या ताब्यात असतात व त्यांच्या कुटुंबियांना दोन वेळेला धड जेवायला मिळत नाही. तरुण स्वत:चे पोट भरतात, पण वृद्ध व्यक्तीचे हाल बघवत नाहीत.  या सर्व हालअपेष्टांचे मूळ कर्त्यां व्यक्तीने स्वत:च्या हयातीत मृत्युपत्र किंवा इतर योग्य ती तजवीज न करणे, यात असते. जिथे कुटुंबालाच काही मिळत नाही, तिथे समाजाला काय मिळणार?
 थोडक्यात, माणसाची श्रीमंती ही व्यक्तीसापेक्ष असते. त्याला त्याच्या संपत्तीचा उपयोग त्याच्याकरिता आणि त्याच्या मरणानंतरही त्याच्या कुटुंबाकरिता व समाजाकरिता करता आला, तर ती व्यक्ती श्रीमंत आहे असे मानावे.  श्रीमंत होणे एक प्रक्रिया आहे; साध्य नाही. धनार्जन करणे, धनसंचय करणे आणि तो आपल्या पुढील पिढीच्या हाती देणे, यात एक प्रकारचा आनंद आहे. योग्य मार्गाने धनसंचय करून श्रीमंत होण्यात पाप नक्कीच नाही. ‘जोडोनिया धन उत्तम विचारे, उदास विचारे वेच करी’ हे संतवचन आहे. त्यामुळे श्रीमंत जरूर होता येईल आणि मी, माझे कुटुंब याच्या पलीकडे जाऊन समाजहितार्थ आपली संपत्ती दिल्यास आपल्या आत्म्याला उत्तम गती मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2014 1:01 am

Web Title: whom should we call rich
टॅग Financial,Money
Next Stories
1 विषयाचा विसरू पडे। इंद्रियांची कसमस मोडे।
2 काही ऐतिहासिक निरीक्षणे
3 ‘बालोद्यान’.. आकाशवाणीचे दिवस
Just Now!
X