विद्याधर कुलकर्णी

एकेकाळी प्रकाशझोतात वावरलेल्या व्यक्ती त्यातून बाहेर गेल्यावर पुढे  कसं आयुष्य व्यतीत करतात, हे जाणून घेणारा शेवटचा लेखांक.. रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अर्धशतकाहून अधिक काळ आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवणारे श्रीकांत मोघे!

एकेकाळी मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रांत ‘चॉकलेट हिरो’ अशी प्रतिमा असलेले नायक, वसंत कानेटकर यांच्या ‘लेकुरे उदंड जाली’ नाटकामधील राजशेखर ऊर्फ राजा, पु. ल. देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’मधील बोरटाके गुरुजी, ‘वाऱ्यावरची वरात’मध्येच ‘दिल देके देखो’ या गीतावर रंगमंचावर अक्षरश: शम्मी कपूर शैलीत नृत्य करून रसिकांना मनमुराद आनंद देणारे कलाकार अशी नटश्रेष्ठ श्रीकांत मोघे यांची ओळख आहे. रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अर्धशतकाहून अधिक काळ रसिकांवर आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवणारे मोघे वयाची ऐंशी वर्षे पार केल्यानंतरही समकालीन आहेत! गुडघेदुखीचा त्रास होत असल्यामुळे शरीराची हालचाल मंदावली असली, तरी घरातल्या घरात व्हीलचेअरवर बसून त्यांचे ‘नाटक’ अजून सुरूच आहे! घर हाच त्यांचा रंगमंच झाला असून बसल्या जागेवरूनच ते नाटकातील स्वगतं सादर करतात. या शारीरिक अवस्थेबद्दल त्यांची कोणतीही तक्रार नाही वा ‘आमच्या काळातील असोशी, तळमळ नव्या कलाकारांमध्ये दिसत नाही’ अशी त्यांची कुरबुरदेखील नसते.

किलरेस्करवाडीच्या (जिल्हा- सांगली) कीर्तनकार मोघे यांचे श्रीकांत हे ज्येष्ठ चिरंजीव. शिक्षणासाठी सांगलीला आल्यानंतर विज्ञान शाखेत पहिल्या वर्षांला असताना विलिंग्डन महाविद्यालयात भाईंशी (पु. ल. देशपांडे) त्यांची ओळख झाली. पुढे त्यांच्या ‘अंमलदार’ या नाटकाचा प्रयोग त्यांनी पुण्याच्या स. प. महाविद्यालयात केला होता. त्या नाटकाला ‘वाळवेकर ट्रॉफी’ मिळाली होती. चित्रपट, नाटक आणि साहित्याबद्दलचे मोघेंचे झपाटलेपण हे पुलंशी मैत्री जुळण्याचे सूत्र ठरले!

पुढे ‘श्रीकांत मोघे आपल्याला बातम्या देत आहेत..’ असा खडा आवाज दिल्ली आकाशवाणीवर ऐकू येऊ  लागला. दिल्लीच्या ऑल इंडिया रेडिओमध्ये नोकरी करतानाच त्यांनी रंगभूमीची सेवा केली. दिल्लीहून मुंबई येथे बदली झाल्यानंतर ‘प्रपंच’ या सिनेमाद्वारे १९६१ साली त्यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. याच दरम्यान ‘जमाना’, ‘उलझन’, ‘ढाँग’, ‘मिट्टी की गाडी’ अशा हिंदूी नाटकांमधूनही त्यांनी काम केले. पुलंच्या साहित्याचा प्रभाव असलेल्या मोघे यांना ‘कृष्णाकाठी कुंडल’ या नाटकाद्वारे पुलंसमवेत काम करण्याची संधी लाभली. मुंबईला आल्यानंतर लगेचच ‘वाऱ्यावरची वरात’ करायला मिळाले. हे नाटक खूपच जोरात चालले. त्या नाटकात पुलंबरोबर अभिनय करताना ते ‘उगीच का कांता’ हे पद आणि पोवाडा म्हणत होते.

१९६५ च्या सुरुवातीचा तो काळ. एकदा दादरच्या शिवाजी मंदिरहून निघून सध्या जेथे शिवसेना भवन आहे त्या रस्त्यावरून चहाची तल्लफ भागविण्यासाठी निघाले असताना समोरून शिवाजी पार्कच्या दिशेने येत असलेले प्रा. वसंत कानेटकर मोघे यांना भेटले. ‘‘माझ्या डोक्यात एक नवं, वेगळंच नाटक घोळतंय- जे ‘लाइफ स्टोरी इन दि डिस्गज ऑफ म्युझिकल सटायर’ या पठडीतलं आहे,’’ असे सांगत कानेटकर मोघेंना म्हणाले, ‘‘या नाटकात तू मुख्य भूमिका करावीस असं माझ्या डोक्यात आलंय.’’ हे नाटक एका लेखकाच्या जीवनावर बेतलं आहे, ज्याच्याकडे यश, पैसा, नाव असं सगळं आहे; पण खूप आवड असूनही अजून पदरी मूल नाही. हे नाटक म्हणजेच- ‘लेकुरे उदंड जाली’! कानेटकरांनी ‘रायगडाला जेव्हा जाग येते..’मध्ये काशीनाथ घाणेकर आणि ‘लेकुरे उदंड जाली’मध्ये श्रीकांत मोघे अशा दोन कलाकारांचे रंगमंचीय आयुष्य घडवले. एकाच कालखंडात ही दोन्ही नाटकं अगदी तुफान चालत होती. नट म्हणजे कोण असतो? कुणीतरी लिहिलेले शब्द त्याच्या हाती येतात आणि जिव्हारी जडतात. त्या शब्दांना तो रंगमंचावर किंवा चित्रपटात प्राण फुंकून सादर करतो. प्राण फुंकणं म्हणजेच त्या नटाचं आयुष्य जगणं असतं. फूल उमलतं, सुगंधित होतं, सुवास पसरवतं आणि एका क्षणी कोमेजून जातं. फुलणं, उमलणं, सुगंधित होणं हे खोटं कसं? ही वस्तुस्थिती आहे. श्रीकांत मोघे या नटाच्या आयुष्यात ‘लेकुरे उदंड जाली’ची भूमिका ही त्याचं साररूप अस्तित्व आहे.

रंगभूमीच्या क्षेत्रात सहा दशकांहून अधिक काळ वावरलेल्या मोघे यांना नाटकाने नाव, पैसा आणि प्रसिद्धी दिली. गेल्या चार वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास होत असल्यामुळे ते फारसे घराबाहेर पडत नाहीत. परंतु नाटकानेच अवघे जीवन व्यापून टाकलेल्या मोघे यांच्यातील नाटक अजूनही जिवंत आहे. नाटक हाच श्वास असलेल्या मोघे यांना वयाची ऐंशी वर्षे पार केल्यानंतही चेहऱ्यावर रंग चढवावा आणि पुन्हा रंगभूमीवर पाऊल ठेवावे असे वाटते. मात्र शरीर साथ देईल याची शाश्वती वाटत नाही. असे असले तरी- ‘‘स्वप्नात आणि जागेपणीही माझे नाटक अद्यापही सुरूच आहे. समोर कोणी असो वा नसो, त्या नाटकांची स्वगतं म्हणतो आणि जणू रंगभूमीवर भूमिका साकारतो आहे या आनंदातच जगतो,’’ असे ते सांगतात. कोणाविषयी कशाचीही तक्रार नसल्याने ते तृप्त आहेत. मैफलीमध्ये गायकाने राग आळवावा तसे नाटकांची स्वगतं म्हणणं हा रियाज ते नित्यनेमाने करतात.

मराठी रंगभूमीच्या संदर्भातही नेमके तसेच घडले. स्वातंत्र्योत्तर काळात मराठीत वसंत कानेटकर, मधुसूदन कालेलकर, जयवंत दळवी, विजय तेंडुलकर आणि पु. ल. देशपांडे असा मोठे नाटककार उदयास आले. या नाटककारांच्या नाटकांमुळे मराठी नाटकांकडे प्रेक्षकांचा ओघ सुरू झाला आणि रंगभूमी बहरली. ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकातील ‘श्याम’ या व्यक्तिरेखेने मोघे यांना वयाच्या तिशीमध्ये ओळख दिली. नाटकांमुळे त्यांना जगभर भ्रमंती करण्याची संधी लाभली. अगदी लंडनला गेल्यानंतरही तेथील रंगभूमी चळवळीशी ते जोडले गेले. ‘मत्स्यगंधा’ या नाटकात वसंत कानेटकरांनी अवघ्या साडेतीन तासांमध्ये महाभारतातील भीष्म उभा केलेला. मा. दत्ताराम बापू यांनी साकारलेला भीष्म हा मोघे यांचा ‘ड्रीम रोल’ होता. हा भीष्म त्यांना इंग्रजीतून करायचा होता. पण ते शक्य झाले नाही. डॉ. श्रीराम लागू, सतीश दुभाषी, दत्ता भट, यशवंत दत्त यांच्यापासून राजा गोसावींपर्यंत अनेकांनी साकारलेल्या ‘नटसम्राट’मध्ये आपण वेगळे काय करणार, असा प्रश्न पडल्याने विचारणा होऊनही मोघेंनी ‘नटसम्राट’ केलं नाही. ‘‘पण हे नाटक हिंदीत आले असते, तर मी नक्की भूमिका साकारली असती,’’ असे ते सांगतात.

आपले मराठी नाटक सर्वागाने फुलले. मराठी नाटकांनी रंगभूमीच्या सर्व शक्यता अजमावून पाहिल्या. परंतु मराठी नाटक राष्ट्रीय आणि वैश्विक स्तरावर फारसे पोहचले नाही. याची कारणमीमांसा मोघे करतात ती अशी- ‘‘आमच्यामध्ये विकण्याची पात्रता नाही. विकाऊ होणे हे मराठी माणसाला कमीपणाचे आणि सवंगपणाचे वाटते. या गोष्टींमुळे मराठी नाटक व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी होताना दिसत नाही. आता नव्याने मराठी रंगभूमीवर आलेल्या शेक्सपीअरच्या ‘हॅम्लेट’ या नाटकाला व्यावसायिक यश मिळते आहे ही चांगली गोष्ट आहे; पण आमच्या मातीतील ‘एकच प्याला’ व ‘तो मी नव्हेच!’ ही नाटके इंग्रजीत कधी जाणार, हा प्रश्न मला पडतो.’’

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आणि ताणतणावाच्या काळात माणसाला हसायला हवे आहे. ही बाब ध्यानात घेऊन ‘मला उमजलेले पुलं’ हा एकपात्री प्रयोग ते गेल्या काही वर्षांपासून करत आहेत.

नाटय़ संमेलनाचे अध्यक्षपद भूषवल्यानंतर चार वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास होत असल्याने मोघे यांच्या चालण्या-फिरण्यावर बंधने आली आहेत. परंतु त्याविषयी कोणतीही खंत वा व्यथा त्यांना नाही. आता वाचनासाठी भरपूर वेळ त्यांना उपलब्ध झाला आहे.  दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील कार्यक्रमांतही त्यांनी विरंगुळा शोधला आहे. कवी सुधीर मोघे यांच्या कविता आणि व्यक्तिचित्रांचे खणखणीत आवाजात वाचन करणे हा त्यांच्या आनंदाचा भाग आहे.

‘‘मी नट असल्यामुळे शब्दांमध्ये प्राण फुंकल्याखेरीज मला स्वस्थ बसवत नाही. माझ्या वेगवेगळ्या भूमिकांचे संवाद म्हणत असतो. कधी मी ‘गरुडझेप’ नाटकातील शिवाजी होतो, कधी ‘अंमलदार’मधील सर्जेराव, कधी ‘अश्रूंची झाली फुले’तील शंभू महादेव, तर कधी ‘कथा कुणाची व्यथा कुणा’ नाटकातील अरविंद होतो. ‘तुझे आहे तुजपाशी’मध्ये तर मी सतीश, राजेश आणि श्याम अशा भूमिका साकारतो. ‘जन्म आणि मृत्यू या दोन टोकांदरम्यान नियतीने माणसाची चालवलेली फसवणूक एकदा लक्षात आली, की प्रेमाने भोवती जमणाऱ्या माणसांची जमेल तशी, जमेल तेवढी आणि जमेल तेव्हा हसवणूक करण्यापलीकडे आपल्या हातात काय राहतं?’ हे भाईंनी सांगितलेले तत्त्वज्ञानच मी अंगिकारले आहे,’’ असे मोघे आवर्जून सांगतात!