‘लोकरंग’मधील (६ जुलै) गिरीश कुबेर यांच्या ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरातील ‘सीताकांत स्मरण’ या लेखावरील निवडक प्रतिक्रिया. काही व्यक्ती, प्रसंग आठवले की आपण मोहरून जातो. वैभवशाली भूतकाळाचा रोमहर्षक पटच आपल्या मनचक्षूंसमोर साकार होतो. इंदूरचे रसिकाग्रणी आणि संगीताचे मर्मज्ञ अभ्यासक रामू भय्या दाते, नागपूरचे कलाप्रेमी श्रीमंत बाबूराव देशमुख, पुलंच्या तोंडून कुमार गंधर्व यांच्या आठवणी ऐकणे, पंडित भीमसेन जोशींच्या ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ या अभंगास पुलंनी केलेली पेटीची बहारदार साथ, पुण्याचे अत्रेप्रेमी सुहास बोकील यांनी जागविलेल्या आचार्यांच्या आठवणी… यांविषयी कुणी लिहिले किंवा बोलले की, आनंदाची प्रसन्न लहर अंगावरून जाते. हा लेख वाचून माझी काहीशी अशीच अवस्था झाली.
आकाशवाणीवरील एक कल्पक आणि अभ्यासू अधिकारी असा त्यांचा लौकिक होता. रसिक श्रोत्यांसाठी रंजक, प्रबोधक कार्यक्रम सादर करणे हा त्यांचा ध्यासच नव्हे तर श्वास होता आणि यातूनच गीत रामायणासारख्या अजरामर कार्यक्रमाची निर्मिती झाली. खरं तर गीतरामायण हा सीताकांत लाड, ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके या त्रिमूर्तींच्या अलौकिक प्रतिभेचा उत्तुंग आविष्कार होता- जिचे गारूड पंचाहत्तर वर्षे उलटूनही कायम आहे. लेखकाला सीताकांतजींसारख्या मर्मज्ञ रसिकाचा सहवास लाभावा हा मणिकांचन योगच आहे. – अशोक आफळे, कोल्हापूर.
लाडांचे रम्य स्मरण…
या लेखामुळे गीतरामायण कसे लिहिले गेले याची आठवण खुद्द सीताकांत लाड यांच्याकडून समजली. एखादी गोष्ट कथन करण्याची सीताकांत यांची शैली अप्रतिम होती. लाड दाम्पत्यांचा आदरातीर्थ करण्याचा स्वभावही कळला. लाडांचं बालपण गिरगावात गेलं आणि त्यांना गाण्याचा वारसा वडिलांकडून मिळाला या गोष्टी कळल्या. – अशोक जमदाडे
प्रेरणा मिळेल…
हा लेख वाचून लेखकाने सीताकांत लाड यांच्याविषयी पुन्हा लिहायला हवं असंच वाटून गेलं. सध्याच्या आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांना त्यांच्यापासून भरपूर प्रेरणा मिळेल. आता आम्ही ‘अशी बहरली आकाशवाणी’ अशी १६ भागांची मालिका केली. त्या निमित्ताने वृत्त विभागासाठी चंद्रशेखर कारखानीस यांच्याशी गप्पा झाल्या. त्यात त्यांनी लेखकाचा उल्लेख केला होता. उमेदीच्या काळात त्यांनी वृत्तनिवेदक म्हणून पुण्याला काम केलं होतं. – विद्यागौरी
स्नेहाळ स्नेहचित्रे…
या सदराच्या नावाप्रमाणे ‘स्नेहा’ळलेली दिग्गजांची शब्दचित्रे वाचायला मिळतात. गीतरामायणामागची कथा वाचली. लेखाचा समारोप वाचताना मला एक खंत मात्र वाटली की, त्या काळापासूनच्या महनीय प्रभावशाली व्यक्ती /शब्दप्रभूंकडून गांधीजींच्या रामाकडे (कळत-नकळत) झालेले दुर्लक्ष… जनमानसास तो समजावून देण्यास सारे कमी पडल्याने – भयावह वाटाव्यात अशा ‘जय श्री रामाच्या’ झुंडी देशात तयार होत आहेत. – रमा सप्तर्षी, पुणे.
माझा राम मला आपसूकच गवसला
हा लेख वाचून काहीसा भूतकाळात हरपलो. साधारण नव्वदच्या दशकापासून सकाळी शाळेची तयारी करता करता जळगाव आकाशवाणी केंद्रावर पुन:प्रसारित केलेले गीतरामायण ऐकण्याची सवय लागलेली. गीतरामायण जीवनाचा एक अविभाज्य भाग तर झालेच शिवाय पुढच्या संघर्ष आणि उभारीच्या काळात मनावर कायमचं कोरलेही गेले. गीतरामायण आणि वाचनालयात माझा राम मला आपसूकच गवसला होता याचा मला आज सार्थ अभिमान वाटतो. या लेखातून मला त्याच अद्भुत गीतरामायणामागची गोष्ट कळली. – संतोष नागो शिंदे.
रंगतदार उत्तररंगाची प्रतीक्षा
हा लेख वाचून‘पुढा स्नेह पाझरे, माघा चालती अक्षरे’ या माऊलीच्या शब्दांचीच आठवण होईल अशा शैलीत साकारल्या जाणाऱ्या या सदरातील ‘सीताकांत स्मरण…’ या कीर्तनातील गजराचे स्मरण करून देणाऱ्या लेखाचा पूर्वरंग उत्तम जमला असून रसाळ उत्तररंगाची वाट पाहायला लावणारा झाला आहे. गोव्यातील गेल्या पिढीतील ‘सुशेगाद’ सारस्वत कुटुंबातील सुसंस्कृत आणि कलासक्त जीवनशैलीचा प्रत्यय या पूर्वरंगात पदोपदी येतो. वीणाताईंवरील लेखाप्रमाणेच या लेखातही पुलंच्या शब्दात सांगायचे तर ‘प्रभूच्या पहिल्या अवताराचे दर्शन’ सुरमईच्या रूपात घडले. ‘सीताकांत स्मरण…’ हा गजर जयजयराम शब्द उच्चारून पूर्ण होतो आणि शेवटच्या परिच्छेदात वर्तमानातील ‘जय श्रीराम’चा प्रतिध्वनी उमटत असतानाच हरदासाची कथा मूळ पदावर या म्हणीची आठवण झाली आणि गंमत वाटली! – गजानन गुर्जरपाध्ये
ते उपेक्षितच राहिले
हा लेख वाचून मन भूतकाळात रममाण झाले. माझी लाडांशी प्रत्यक्ष ओळख नव्हती. असे असले तरी मला लाडांबद्दल आत्मीयता वाटते याचे कारण ते माझे वडील भास्करराव भिकाजी भोसले ( माजी स्टेशन डायरेक्टर, आकाशवाणी, पुणे) यांचे जिवलग मित्र होते. २ आक्टोबर आकाशवाणी १९५३ साली आकाशवाणीचे पुणे केंद्र सेंट्रल बिल्डिंगच्या खालच्या मजल्यावर सुरू झाले तेव्हा पहिल्या सहा अधिकाऱ्यांमध्ये माझे वडील होते. त्यांच्याकडे महिला व बालकांच्या कार्यक्रमाचा विभाग देण्यात आला होता. नंतर काही काळाने सीताकांत लाड व बा. भ.बोरकर हेही पुणे केंद्रावर कार्यक्रम अधिकारी म्हणून रुजू झाले.
लाड त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे लवकरच पुणे केंद्रात लोकप्रिय झाले व माझ्या वडिलांचे तर जवळचे मित्र झाले. त्यामुळे वडील असताना त्यांचे नाव व आठवणी घरात सतत निघायच्या. गीतरामायणाची मूळ संकल्पना लाडांचीच होती. ती त्यांनी त्यावेळचे केंद्र प्रमुख एन. एल. ऊर्फ नंदलाल चावला यांच्या कानावर घातली. ती चावलांनाही आवडली व त्यांनी लाडांना परवानगी दिली. ती मिळताच लाडांनी गीतकार ग. दि. माडगूळकर आणि गायक व संगीतकार सुधीर फडके यांच्याकडे हा आकाशवाणीचा उपक्रम सोपवला. लाड हे कुशल संघटक असल्यामुळे त्यांनी आकाशवाणीतील बाह्मणांपासून ते मुसलमानांपर्यंत सर्वांना या उपक्रमात सामील करून घेतले. त्या सर्वांनी या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी मनापासून हातभार लावला. १९५५-५६ साली एकूण ५६ गीतांत गीतरामायण रेडिओवर सादर झाले. गीतांना श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
माडगूळकरांना महाकवी व आधुनिक वाल्मीकी या पदव्या गीतरामायणामुळेच मिळाल्या व फडके यांनाही गायक व संगीतकार म्हणून अमाप प्रसिद्धी मिळाली. त्यामानाने गीतरामायणाचे मूळ संकल्पक व संयोजक सीताकांत लाड काहीसे उपेक्षितच राहिले. आजही गीतरामायण ही आकाशवाणी पुणे केंद्राची सर्वात लोकप्रिय व यशस्वी कलाकृती मानली जाते. त्याचे खरे श्रेय अर्थातच लाडांना आहे. खासगी जीवनात सीताकांत लाड हे जातपात पाळत नसत. माझे वडील आकाशवाणीतील पहिले अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजातील अधिकारी होते. लाड पती-पत्नींचे आमच्या सारस्वत कॉलनीतील बंगल्यात येणे-जाणे होते व कौटुंबिक संबंधही होते. त्यामुळे त्यांच्या आठवणी मी माझे आजोबा भिकाजी गणेश भोसले (गुरुजी) आजी शेवंताबाई, आई शांताबाई व आत्या मनोरमाबाई साळवे यांच्या तोंडून ऐकल्या होत्या. लाड आणि त्यांच्या पत्नी मालतीबाई हे पाहुणचार व आदरातिथ्याबद्दलही प्रसिद्ध होते.
माडगूळकरांचे मानसपुत्र नेमिनाथ उपाध्ये हे आकाशवाणीत कामाला होते. ते सांगत असत की लाड वहिनींनी आम्हाला इतके चवदार पदार्थ करून घातले की त्यांची चव अजून जिभेवर रेंगाळते असते. लाडांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बालगंधर्वांनी त्यांना आपले मानसपुत्र मानले होते. गंधर्वांच्या अनेक दुर्मीळ वस्तू लाडांच्या संग्रहात होत्या व त्यांचे ऐतिहासिक महत्त्व लाड संदर्भासह सांगू शकत. १९५८ साली माझे वडील भास्करराव भोसले यांची बदली प्रमोशनवर आकाशवाणीच्या अहमदाबाद केंद्रावर असिस्टंट डायरेक्टर म्हणून झाली. लाडही नंतर बदलीवर पणजी केंद्रावर असिस्टंट डायरेक्टर म्हणून गेले व पुण्यापासून लांब गेल्यामुळे काहीसे विस्मृतीत गेल्यासारखे व एकाकी पडल्यासारखे झाले.
आकाशवाणीत कल्पक व प्रतिभावान अधिकाऱ्याला न्याय मिळतोच असे नाही. लाडांच्या आठवणी ऐकून मला राहून राहून वाटते की लाडांनी माडगूळकर- फडकेंचा गीतरामायणाचा उपक्रम यशस्वी केला तसेच स्वत: एखादे ‘गद्या रामायण’ मराठीत लिहिले असते तर तेही गाजले असते. कारण ते रंगविण्या इतकी रसाळ व प्रासादिक शैली व लिहिण्याची हातोटी लाडांकडे नक्कीच होती. काहीशा उपेक्षित राहिलेल्या सीताकांत लाड यांना प्रकाशात आणल्याबद्दल लेखकाचे आभार! – राजेंद्र भास्करराव भोसले, पुणे.