scorecardresearch

नूडल्सची गुंतावळ

‘मॅगी’ प्रकरणामुळे एखाद्या जवळच्या मित्राने किंवा कुटुंबातील नातेवाईकाने अचानक विश्वासघात करावा तसे दु:ख आणि तसा धक्का मध्यमवर्गीय गृहिणी आणि घरांना बसला आहे.

नूडल्सची गुंतावळ

‘मॅगी’ प्रकरणामुळे एखाद्या जवळच्या मित्राने किंवा कुटुंबातील नातेवाईकाने अचानक विश्वासघात करावा तसे दु:ख आणि तसा धक्का मध्यमवर्गीय गृहिणी आणि घरांना बसला आहे. एकीकडे आमची नाळ आणि आमचे नाते नूडल्सशी पुन्हा जुळावे असे वाटते आहे; तर दुसरीकडे आम्ही सुजाण भारतीय नागरिकांनी अंतर्मुख होण्याची वेळही आली आहे. आमच्या देशात पूर्वापार उपलब्ध असलेले पारंपरिक पदार्थ आणि खाद्यसंस्कृती पुन्हा नव्याने आपलीशी करणे गरजेचे झाले आहे.
गेला संपूर्ण आठवडा भारतामध्ये मॅगी नूडल्सने गाजला. वास्तविक पाहता शाळेमधल्या हाफ चड्डीच्या वयापासून आजपर्यंत ज्या नूडल्सनी आमची साथसंगत केली, ज्यांनी ‘‘मम्मी, भूख लगी है..’’ या शाळेतून घरी आलेल्या सादेला ‘‘बस्स, दो मिनिट!’’ म्हणून प्रत्युत्तर दिले, ज्या खाद्यपदार्थाने दोन मिनिटांच्या वेळेला एक आगळेवेगळे असे परिमाण दिले, त्या मॅगी नूडल्सच्या अस्तित्वावरच केलेला प्रहार हा अर्थातच आम्हाला जिव्हारी लागला. उलटसुलट दावे-प्रतिदावे, विविध प्रयोगशाळांमधून मिळणारे शिसे या धातूच्या अस्तित्वाचे अंश, मोनोसोडियम ग्लुटामेट याचे प्रमाण या साऱ्या गोष्टींमुळे संपूर्ण वातावरण मॅगी तयार होताना कढईत ढवळली जात नसेल इतक्या प्रमाणात ढवळून निघाले. प्रश्न लाखो गृहिणींच्या विश्वासाचा होता. आपल्या भुकेल्या मुलाला चटकन् गरमागरम पदार्थ करून देण्यासाठी त्यांनी वर्षांनुवष्रे मॅगीला जवळ केले होते. मॅगी हे मम्मीचे दुसरे रूपच होते. एरवी घरात शिजणाऱ्या भाज्यांना नाके उडवणाऱ्या बालचमूंच्या पोटात भाज्या जाण्याचा सोपा मार्ग म्हणजे फ्लॉवर, कोबी, गाजर, हिरवे वाटाणे या सर्व भाज्यांनी मॅगीला दिलेली महिरप! ‘‘मॅगीतून कोंबडय़ांनी दाणे टिपल्यासारखे भाज्या बाजूला काढायच्या नाहीत, त्या पोटातच गेल्या पाहिजेत!’’ हा आजी आणि आईने दिलेला सज्जड दम.. यावर आमचे बालपण िशपले गेले आहे. तेव्हा एखाद्या जवळच्या मित्राने किंवा कुटुंबातील नातेवाईकाने अचानक विश्वासघात करावा तसे दु:ख आणि तसा धक्का मध्यमवर्गीय गृहिणी आणि घरांना बसला, हेच खरे! मीडियानेही सतत मॅगीपुराण चालवून या संपूर्ण प्रकाराला फोडणी दिली. कदाचित मॅगी प्रत्यक्ष शिजवताना गृहिणींनी ती दिली नसेल, ती कसर मीडियाने भरून काढली.
या सर्व चर्चा ऐकताना माझ्या मनात विचारांचे असंख्य तरंग उठत होते. भारतामध्ये खाद्यपदार्थ, पेये, शीतपेये आणि दूध यांवर वेळोवेळी विविध राज्यांमधून असे आरोप झालेले आहेत. नाही असे नाही. पेप्सी आणि कोका-कोला यांचे सेंद्रिय खतांशी असलेले नाते काही वर्षांपूर्वी चíचले गेले. आणि ते ज्ञात असूनही जनसामान्यांनी ती पेये पिण्याचे थांबवलेले नाही. महानगरपालिकेमध्ये कार्यरत असताना शाळेमधील मुलांना दुपारच्या वेळेस वऌळ सुगंधित दूध देण्याची योजना काही शाळांतील मुलांना उलटय़ांचा त्रास झाल्यामुळे थांबविली गेली. या संपूर्ण योजनेचा सखोल अभ्यास करून दूध निर्दोष असल्याचा निर्वाळा मी दिला होता. पण योजना बंद झाली आणि त्याला पूरक असा पर्याय चटकन् सापडला नाही, हे सत्य आहे. अनेकदा जनमानसाशी संबंधित असलेले निर्णय शास्त्रीय सत्याकडे डोळेझाक करून भावनेच्या रेटय़ामुळे घेतले जातात आणि पर्यायाने समाजाचे नुकसान होते, हेच खरे. मॅगीच्या बाबतीत विविध राज्यांतून उलटसुलट परिणाम हाती येत आहेत. शिसे या धातूचा अंतर्भाव थेट आटय़ामधून किंवा मद्यामधून होणे असंभवनीय. चव येण्यासाठी जो मसाला घातला जातो त्याचे बारकाईने अवलोकन करणे गरजेचे आहे. इतकेच नाही तर ज्या अ‍ॅल्युमिनियमच्या फॉइलमध्ये त्या मसाल्याचे छोटेखानी पाकीट बंद केले जाते, त्या संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास आणि मॅगी पिवळ्या रंगाच्या ज्या वेष्टनामधून आपल्यासमोर येते, त्यात वापरले जाणारे निरनिराळे रंग यांचाही अभ्यास होणे गरजेचे आहे. दुधाच्या बाबतीत काही देशांमध्ये ही वेष्टने आणि रंग अनुचित प्रकारास कारणीभूत ठरले होते आणि त्याचे दाखले वैद्यकीय शास्त्रात उपलब्ध आहेत. मानवी शरीरामध्ये शिशाचा प्रवेश झाला की कोणते दुष्परिणाम होतात, याचा विचार होणे गरजेचे आहे. शरीरातील सर्व इंद्रिये आणि संस्था यांवर शिसे अर्थात लेडचे दुष्परिणाम होतात. रंगाच्या कारखान्यात आणि रासायनिक द्रव्यांच्या संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये, तसेच रंगीबेरंगी खेळणी तोंडात घालणाऱ्या लहान मुलांमध्ये कधी कधी शिशाच्या विषप्रयोगाची लक्षणे दिसून येतात. डोकेदुखी, चिडचीड, थकवा, झोप न लागणे, मन एकाग्र करण्यात अडचणी, पोटात पिळवटल्याप्रमाणे दुखणे, उलटय़ा, बद्धकोष्ठ, रक्ताचे प्रमाण कमी होणे, श्रवणशक्ती क्षीण होणे, झटके येणे, स्नायूंमध्ये थकवा जाणवणे आणि मूत्रिपड निकामी होणे.. हे शिशाचे दुष्परिणाम माणसांमध्ये आढळलेले आहेत. यासाठी शरीरात जाणाऱ्या शिशाचे प्रमाण फार मोठे असावयास हवे असेही नाही. कारण या धातूला माणसाच्या शरीरात कोणतेही अपेक्षित स्थान वा कार्य नाही. शरीरात अंदाजे २५ मायक्रोग्राम शिसे दर डेसीलिटरमागे दिसून आल्यास व्यक्तीस वैद्यकीय उपचारांची गरज भासते. सर्वसाधारणपणे वैद्यक क्षेत्रामध्ये शिशाच्या विषप्रयोगाची घटना ही कोणता ना कोणता अपघात वा व्यावसायिक दुर्घटनेमुळे घडलेली आहे. तेव्हा मॅगीमध्ये शिसे आढळण्याचे कोणतेही कारण नाही, ही अपेक्षा जितकी रास्त; तितकीच त्याचे प्रमाण शरीरास हानीकारक ठरेल का, याचाही अभ्यास होणे गरजेचे आहे. मॅगीमध्ये आढळलेला दुसरा घटक म्हणजे मोनोसोडिअम ग्लुटामेट. वास्तविक पाहता अनेक अन्नपदार्थामध्ये चव वाढविण्यासाठी तसेच सर्वदूर लोकप्रिय असलेल्या चायनीज पदार्थामध्ये आणि डबाबंद खाद्यपदार्थामध्ये याचा वापर सढळ हस्ते केला जातो. अर्थात प्रमाणाबाहेर घेतल्यास अमृताचेही विष होते, हे जर सत्य असेल तर त्यास मोनोसोडियम ग्लुटामेटही अपवाद कसे ठरावे?
मॅगी खाऊन प्रकृतीवर अपाय झाल्याच्या थेट केसेस आजवर वैद्यकशास्त्रात आपल्या देशात नमूद झालेल्या नाहीत, हे लक्षात घेण्यासारखे आहे. माझ्या दृष्टीने या संपूर्ण प्रकाराच्या बाबतीत काही वेगळे प्रश्न निर्माण होतात. नेस्ले कंपनीसारख्या बलाढय़ आंतरराष्ट्रीय कंपनीस नामोहरम करण्यासाठी रचलेले हे कुभांड वा राजकीय षड्यंत्र तर नसेल? खप वाढवण्यासाठी जीवघेणी स्पर्धेत प्रतिस्पर्धी कंपन्या कोणत्याही थराला जातात, हे अनेक उत्पादनांच्या बाबतीत आपण अनुभवले आहे. एखाद्या कंपनीस आíथक लाभासाठी खच्ची करण्याचा हा डाव तर नसेल? या प्रश्नांची उत्तरेही नजीकच्या काळात जनतेसमोर येतील अशी अपेक्षा आहे.
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ ज्या पदार्थाचे घरोघरी सेवन झाले, ज्याला भारतीय संस्कृतीने संपूर्णपणे आपलेसे केले, अशा पदार्थावर एका रिपोर्टनंतर बंदी घालणे आणि त्याच्याविरुद्ध राळ उठवणे, ही प्रक्रिया वैद्यकीय परिभाषेत सांगावयाचे झाल्यास ङल्ली-खी१‘ १ीूं३्रल्ल या सदरात मोडण्यासारखी आहे. त्यातच वेगवेगळ्या राज्यांनी आणि बाजारपेठांनी मॅगीला हद्दपार करून नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत आपण कल्याणकारी राज्ये आहोत हे दाखवण्याचा आटापिटा चालवला आहे. या सर्व राज्यांचे आरोग्य अधिकारी उघडय़ावर मांडल्या जाणाऱ्या खाण्याच्या वस्तू, गाडीवर विकली जाणारी चायनीज भेळ, खाऊगल्लीत बर्फी-मिठाईवर बसणाऱ्या माश्या, पेढय़ांच्या माव्यामध्ये होणारी भेसळ, तुमच्या-माझ्या घरात सकाळी येणाऱ्या दुधात मिसळले जाणारे डिर्टजट या सर्व गोष्टींबाबत इतकी जागरूकता का बरे दाखवीत नाहीत, असा प्रश्न माझ्यासारख्या वैद्यकीय व्यावसायिकाला पडतो. जेव्हा वैश्विक बाजारात आपल्या देशाचे चलनी नाणे खणखणून वाजवावयाचे असते तेव्हा कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी आपण दहा वेळा विचार करणे आणि प्रयोगशाळेतील शास्त्रीय पुराव्यांवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. भारताने मॅगीला हद्दपार केले तर स्वित्र्झलडने आपल्या ‘हलदीराम’साठी बाजाराची कवाडे बंद केल्याचे वाचनात आले. प्रश्न सार्वजनिक आणि सामाजिक आरोग्याचा असल्यामुळे तो महत्त्वाचा आहे, हे खरेच; पण त्याची उत्तरे भावनेच्या भरात शोधल्यास राष्ट्राला दूरगामी परिणाम भोगावे लागतात, हेही तितकेच खरे. इतक्या मोठय़ा प्रमाणात विश्वासाला तडा गेल्यावर कंपनीने स्वत:हून पाकिटे माघारी बोलावणे हे योग्यच होते. ढफडऊवउळ फएउअछछ हे अनेक जगप्रसिद्ध कंपन्यांचे जुनेजाणते तंत्र आहे. ‘आम्ही आमच्या उत्पादनांच्या दर्जाबाबत अतिशय जागरूक आहोत’ हे ग्राहकांना पटवून देण्यासाठी वापरलेला हा एक आडवळणाचा मार्केटिंग फंडा आहे असे व्यवस्थापन क्षेत्रात बोलले जाते. अगदी होंडा, टोयोटासारख्या जागतिक कंपन्याही ग्राहकांकडून आपल्या मालाची पुन्हा उचल करून त्यात फेरफार करतात. मॅगीच्या बाबतीत तर प्रश्न थेट पोटाशी- आणि पर्यायाने विश्वासाशी- म्हणजेच हृदयाशी जोडलेला आहे. पुढच्या काही काळात हेच मॅगी नव्या जोमाने नव्या रूपात आपल्यासमोर येईल आणि रुसलेली सूनबाई दोन दिवसांच्या माहेरवासानंतर पुन्हा सासरी आल्यासारखे तिचे स्वागतही होईल. दोन मिनिटांच्या जाहिराती पुन्हा झळकू लागतील आणि त्यासाठी आमचे चित्रतारे आणि तारका यांनी दोन कोटी रुपये घेतल्याच्या बातम्याही आम्ही वाचू. प्रश्न वैयक्तिक आवडीनिवडीचा आहे, हे मान्य!
माझ्या मनात मात्र या संपूर्ण प्रकारामुळे विचारांची काही वेगळी आवर्तने उठली, ती येथे नमूद करणे आवश्यक वाटते. माझ्या विद्यापीठात असलेल्या हॉटेल मॅनेजमेंटच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या वंदना मिश्रा यांच्याशी याबाबत माझे बोलणे झाले. भारत हा विशाल, अठरापगड जातींचा, संस्कारांचा आणि खाद्यपदार्थाची लयलूट असलेला असा देश आहे. इथे प्रत्येक १०० कि.मी.वर बोलीभाषा बदलते तसेच खाण्याचे पदार्थ आणि त्यांची चवही बदलते. केवळ सकाळच्या न्याहारीचा आणि संध्याकाळच्या भुकेल्या वेळेचा विचार जरी आपण केला, तरी जितकी राज्ये, तितके वेगवेगळे न्याहारीचे आणि अल्पोपाहाराचे पदार्थ आपल्या देशात उपलब्ध आहेत. आंध्र प्रदेशात मूग- डाळीपासून केलेले पेसारत्तू, अरुणाचल प्रदेशामध्ये गव्हापासूनचा खुरा, आसाममधील तांदळापासून केलेला जोलपान, बिहारमधील सत्तूचे पराठे, छत्तीसगडमधील मुठीया, गुजरातमधील ढोकळा, हरियानवीत बेसनकी मसाला रोटी, झारखंडमधील लिट्टीचोखा, कर्नाटकामधील नीर डोसा, ओडिसामधील चुराभजा, पंजाबमधील आलुपराठा ते अगदी पश्चिम बंगालमधील लच्छी आलू.. आपण यापकी काही पदार्थ जवळच्या उपाहारगृहांमधून घरी आणतो. पण हे पदार्थ थेट घरपोच मिळण्याची सोय काही भगिनींच्या समूहांतर्फे, बचतगटांतर्फे केटरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे प्रोजेक्टस् म्हणून स्वीकारता येईल का, याचा विचार व्हावयास हवा. स्वयंपाकाची आवड असलेले अनेक स्त्री-पुरुष माझ्या परिचयाचे आहेत. शनिवार-रविवारी केटरिंग कॉलेजेसमधून हे पदार्थ उत्तमरीत्या बनविण्याचे शिक्षण देणारे छोटे वर्ग आपण आपल्या देशात चालू करू शकू. गृहोद्योगाचे स्वरूप या व्यवसायास अधिक सक्षमतेने दिल्यास अनेकांना रोजगार उपलब्ध होईल आणि कदाचित मॅगी नूडल्सपेक्षा ते अधिक पौष्टिक व किफायतशीर ठरेल. आपणास अधिकाधिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आपले जीवनमान सुखदायक करण्याची सवय लागली आहे. इन्स्टंट पदार्थाशिवाय आज आपले खाद्यजीवन पूर्ण होत नाही. आमचे पूर्वज असलेले आदिमानव नसíगकरीत्या उपलब्ध असलेली कंदमुळे थेट झाडा-वेलींवरून तोडून खायचे, ते खाद्यपदार्थाचे पहिले इन्स्टंट रूप होते. उत्क्रांतीबरोबर आम्ही ‘प्रोसेस्ड फूड’ या संकल्पनेचा स्वीकार केला आणि त्यातूनच इन्स्टंट खाद्यसंस्कृती उदयास आली. मॅगी मग आमच्यासाठी उेऋ१३ आणि उल्ल५ील्ल्रील्लूी ऋ िचे रूप घेऊन आली. त्याचे पडसाद आणि परिणाम आम्हाला वेळोवेळी अनुभवास येत आहेत. मॅगी प्रकरणामुळे सुजाण भारतीय नागरिकांनी अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे. आणि आमच्या देशात पूर्वापार उपलब्ध असलेल्या पारंपरिक पदार्थाना आणि पद्धतींना पुन्हा नव्याने आपलेसे करणे गरजेचे झाले आहे.
मॅगीच्या या धक्कादायक घटनेमुळे आतून काहीतरी हलल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली आहे. विश्वास ठेवायचा तरी कोणावर आणि कुठवर? मॅगी नूडल्स या नुसत्या आमच्यासाठी आमच्या ओठांवरून घरंगळणाऱ्या गुंतावळ नव्हत्या, तर नोकरी करून थकून घरी येणाऱ्या आमच्या गृहिणींचा हक्काचा आधार होता. आज त्या आधाराला धक्का लागला आहे. येणाऱ्या काही दिवसांत स्वच्छ पाऊस पडावा, हे तापलेले वातावरण शमावे आणि पहिल्या पावसाबरोबर खिडकीतून येणाऱ्या मृद्गंधाबरोबर स्वयंपाकघरातून नूडल्सचा दरवळ यावा, आमची नाळ आणि आमचे नाते नूडल्सशी पुन्हा जुळावे, हीच काय ती इच्छा!

 डॉ. संजय ओक – sanjayoak@dypatil.edu  
(कुलगुरू, डी. वाय. पाटील विद्यापीठ)

मराठीतील सर्व लेख ( Lekha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या