मागील काही लेखांपासून आपण एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात मराठीत लिहित्या झालेल्यांचे लेखनकार्य समजून घेत आहोत. या दशकात लेखनास आरंभ होऊन पुढे विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांत विपुल लेखन-संशोधन केलेल्यांमध्ये आवर्जून घ्यावे असे नाव म्हणजे- वासुदेव वामनशास्त्री खरे. खरेशास्त्री यांची ओळख आहे ती इतिहास संशोधक म्हणून. मूळचे गुहागरचे, पुढे पुण्यात संस्कृत आणि व्याकरणाचे अध्ययन, मग न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वर्षभर अध्यापन आणि नंतर अखेपर्यंत मिरजेतील एका शाळेत संस्कृतचे अध्यापक म्हणून खरेशास्त्रींनी नोकरी केली. मात्र इतिहास संशोधनाविषयी पुण्यातील वास्तव्यातच त्यांच्या मनात आस्था निर्माण झाली होती. त्यामुळे मिरजेत गेल्यावर इंग्रजीचा अभ्यास आणि इतिहास संशोधन जोडीनेच सुरू झाले. त्याचे फळ म्हणजे, १८९२ साली ‘नाना फडनवीसांचें चरित्र’ हा खरेशास्त्रींचा इतिहासविषयक पहिला ग्रंथ प्रसिद्ध झाला. नाना फडणवीसांविषयी टोकाची स्तुती आणि टोकाचा द्वेष अशा संमिश्र जनमताचा वेध घेत लिहिलेले हे चरित्र. त्यातील हा एका उतारा पाहा-

‘‘घाशीराम कोतवाल व बाजी मोरेश्वर एकाच जातीचे क्रूरकर्मे होत. हे ‘सद्गृहस्थ’ नानांच्या विश्वासास पात्र झाले. त्यामुळें नानांस बहुत लोकापवाद सहन करावा लागला. सरकारांतून नेमून दिलेल्या कारभाऱ्यानें परभारें एखादा अत्याचार केला तर त्याचा दोष नानांच्या अंगीं लावणें हा उघड उघड अन्याय आहे. घाशीराम प्रकरणांतही नानांच्या शिरावर कोणताच दोष येऊं शकत नाहीं. घाशीराम सावळादास याला स. १७८२ सालीं पुणें शहरची कोतवाली मिळाली. घाशीरामचें पुणें दरबाराकडे कर्ज येणें होतें, शिवाय त्यानें त्या दरबाराच्या दुसऱ्या एका सावकाराचा हवाला घेतला, त्यामुळेंच त्याला हा हुद्दा देण्यांत आला होता. एरवी घाशीरामचा नानांकडे दुसरा कोणताच वशिला नव्हता. पांडुरंग कृष्ण सरअमीन याला विचारल्याशिवाय कोतवालानें कोणताही कारभार करूं नये अशी नानांची सक्त ताकीद होती. असें असतां घाशीरामनें आपलें कृत्य इतक्या गुप्तपणें केलें की, त्याचा सुगावा खुद्द सरअमीनलाही लागला नाहीं. मग नानांस कोठून लागणार? या बाबतींत हलगर्जीपणाचा कांहीं दोष देतां येण्यासारखा असेल तर तो घाशीरामचा जोडीदार पांडुरंग कृष्ण सरअमीन यालाच देणें वाजवी आहे. असें असतां स्वकीय अज्ञ जनांनी व परकीय तज्ज्ञ इतिहासकारांनीं या घाशीराम प्रकरणाचें सर्व खापर नानांच्याच माथीं फोडलें आहे! त्यांचें म्हणणें, दिल्लीं कलकत्ता अशा दूरदूरच्या सूक्ष्म बातम्या मिळविणाऱ्या नानांना पुणें प्रांतांतल्या किंवा खुद्द पुण्यांतल्या बातम्या कशा कळल्या नाहींत? नानांची संमति असल्याशिवाय पुण्यांत दिवसाढवळ्या असले गुन्हे घडतील कीं काय? यावरून त्यांचा कारभार सैल व जुलमी होता हें निर्विवाद सिद्ध होतें! परंतु हा युक्तिवाद चुकीचा आहे. नानांना अतींद्रियदृष्टि नव्हती. त्यामुळें हाताखालच्या लोकांचीं दुष्कृत्यें त्यांना एखादे वेळीं ओळखतां आलीं नाहींत तर तो त्यांचा दोष मानतां येत नाहीं. शिवाय अशा एक दोन उदाहरणांवरून त्यांचा सर्वच कारभार जुलमी होता असें अनुमान काढणें हा धडधडीत सत्यविपर्यास होय! हल्लीसुद्धां इतका कडेकोट बंदोबस्त असतांही सरकारनें नेमलेल्या कारभाऱ्यानें संस्थानांत मन मानेल तसा धुमाकूळ घालावा किंवा एखाद्या सरकारी अधिकाऱ्यानें शिस्तीच्या नांवाखालीं वाटेल तितके खून पाडावेत असेही प्रकार क्वचित् होऊं शकतात हे वाचकांना आतां नव्यानें सांगावयास नकोच! नानांच्या कारभाराचें वैशिष्टय़ हेंच कीं, त्यांनी अशा अपराध्यांना देहांतप्रायश्चितें दिलीं. परंतु आतां मात्र अशा गुन्हेगारांना एखादे वेळीं कोणतीच शिक्षा होत नाहीं!’’

Hanuman Jayanti 2024
हनुमान जयंती २०२४: मारुतीची जन्मकथाच निराळी!
husband wife killed 6 injured in road accident
नागपूर : भीषण अपघातात पती-पत्नी ठार, ६ जखमी; कारची उभ्या ट्रॅक्टरला जबर धडक
Mukh Darshan Arranged for Devotees on Gudhi Padwa at Pandharpur Temple due to Conservation Work
मराठी नववर्ष आणि गुढीपाडवा दिवशी विठ्ठलाचे मुख दर्शन दिवसभर : औसेकर महाराज
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन

पुढे मिरजमळा संस्थानकडील पटवर्धन सरदाराचे दप्तर खरेशास्त्रींच्या हाती आले. पटवर्धन हे १७६० ते १८०० या काळातील पेशवाईतील एक मुत्सद्दी, तर मिरज हे तत्कालीन राजकीय उलाढालींचे एक महत्त्वाचे केंद्र. त्यामुळे देशांतील सर्व राजकीय घडामोडींची व कारस्थानांची बातमीपत्रे मिरजेंत- पटवर्धनांकडे येत असत. ही पत्रे खरेशास्त्रींनी नकलून काढली. ती प्रसिद्ध करण्यासाठी त्यांनी १८९७ च्या जूनमध्ये ‘ऐतिहासिक लेखसंग्रह’ हे मासिकही सुरू केले. मात्र जेमतेम तीन वर्षे सुरू राहून मासिक बंद पडले. परंतु हार न मानता पुढे १९२४ पर्यंत खरेशास्त्रींनी ही ऐतिहासिक कागदपत्रे विस्तृत प्रस्तावनांसह ‘ऐतिहासिक लेखसंग्रह’ याच शीर्षकाने १२ खंडांमध्ये प्रकाशित केली. हे मराठीतील इतिहासविषयक मोठेच काम झाले. ते आज उपलब्ध असून आपण आवर्जून वाचावे. ‘ऐ. ले. संग्रहा’च्या पहिल्या भागाच्या प्रस्तावनेतील हा काही भाग पाहा-

‘‘ज्यानी रामेश्वरपासून अटकेपर्यंत भगवा झेंडा नाचविला, ज्यांनी गिलचे, रोहिले, पठाण, शीख रजपूत, रांगडे इत्यादि शूर लोकांच्या फौजा शेकडो वेळा लढाईत गांठून, मारून, तुडवून धुळीस मिळविल्या, दूरदूरच्या प्रांतात मानी व प्रतापी राजांची सिंहासने ज्यांच्या विजयदुंदुभीच्या नादाने दर वर्षांस हदरू लागत, त्या महाराष्ट्र-वीरांनी काय काय पराक्रम केले ते लिहून ठेवण्याचे काम सुद्धा आम्हांपैकी कोणाच्या हातून अजून झाले नाही! ते काम कित्येक इंग्रज ग्रंथकारांनी आपले इतिहास इंग्रजांसाठी लिहिले असल्यामुळें त्यांतून आम्हांविषयी माहिती त्रोटक असावयाची व तीत जिंकलेल्या लोकांची बाजू पुढें न येता फक्त जिंकणाऱ्यांचीच बाजू दाखविलेली असावयाची, हें कोणाहि विचारी मनुष्याच्या लक्ष्यांत येण्याजोगे आहे.. काव्येतिहाससंग्रहा (संपा. चिपळूणकर, मोडक, साने; प्रथम अंक- जाने. १८७८) मुळे मराठी इतिहासाचे आस्थेनें पर्यालोचन करण्याची इच्छा बऱ्याच लोकांच्या मनांत जागृत झाली. दुर्दैवानें काव्येतिहाससंग्रह बंद पडला! तथापि त्यावेळेपासून तेंच काम पुढे सुरू ठेवण्याविषयी मधून मधून प्रयत्न कित्येकदां झाले व हल्लीहि होत आहेत. परंतु हे काम जितक्या नेटानें व आस्थेने व व्यवस्थेनें व्हावयास पाहिजे तितकें ते होत नाही ही गोष्ट निर्विवाद आहे..’’

हे सांगून पुढे ते लिहितात-

‘‘परशुरामभाऊ, नाना फडनवीस, व हरिपंत फडके या त्रिकूटाच्या अनेकविध कारस्थानांचीं न त्यांपैकी त्या दोघा सरदारांचीं, स्वाऱ्यांतील स्वहस्तलिखित अशी ती साग्र व सुसंगत मजकुराची पत्रे वाचू लागले म्हणजे त्या थोर पुरुषांनीं स्वदेशासाठीं कशा हालअपेष्टा भोगिल्या, कसे पराक्रम केले, मोठमोठय़ा संकटांतून कसा बचाव करून घेतला या सर्व गोष्टींचें हुबेहुब चित्र डोळ्यांपुढें उभे राहून वाचक तल्लीन होऊन जातो. व हल्लीच्या काळाचा त्यास विसर पडून तो त्या पत्र लिहिणाऱ्यांच्या सुखदु:खांचा विभागी होतो! सारांश काय की, ज्यांनी कारस्थाने लढविली व पराक्रम केले व पाहिले त्यांनीच लिहिलेला हा पेशवाईच्या (पानिपतोत्तरकालीन) ४० वर्षांचा अस्सल इतिहास प्रसिद्ध केला जात आहे.’’

याव्यतिरिक्त ‘अधिकार योग’ (१९०८), ‘हरिवंशाची बखर’ (१९०९), ‘इचलकरंजी संस्थानचा इतिहास’ (१९१३) ही पुस्तकेही खरेशास्त्रींनी लिहिली आहेत. शिवाय काव्य आणि नाटय़लेखनही त्यांनी केले आहे. मात्र त्यावरही त्यांच्यातील इतिहास संशोधकाचा प्रभाव जाणवतो. ‘गुणोत्कर्ष’, ‘तारामंडळ’, ‘संगीत चित्रवंचना’, ‘सं. कृष्णकांचन’, ‘सं. देशकंटक’ आदी त्यांची नाटके प्रसिद्ध आहेत. नाटकांत त्यांनी कल्पकता आणि इतिहास यांचा मेळ उत्तमरीत्या साधला होता. त्यांच्या ‘शिवसंभव’ (१९२२) या नाटकातील पुढील भाग वाचला असता त्याचा प्रत्यय येईल –

‘‘शहाजी- उजाडतां उजाडतां जीं स्वप्नें पडतात त्यांचा फलादेश तत्काल होतो हा नेहमींचा अनुभव आहे. देवीचें ध्यान कसें कसें तुम्हांला दिसलें तें सांगा पाहूं.

जिजाऊ- ज्या सुंदरपणाला त्रिभुवनांत तुलनाच नाहीं त्याचें वर्णन मी तरी काय करणार? तिच्या शरीराभोंवतीं तेज पसरलें होतें त्याकडे पाहिलें म्हणजे डोळें दिपून जात! आणि वाटे कीं, देवीच्या अंगावर हिऱ्यामोत्यांचे दागिने झळकत आहेत त्यांच्याच प्रकाशाचा हा लखलखाट नसेल ना? अथवा तिनें शुभ्रवस्त्रें परिधान केलीं आहेत तीं विजेच्या तंतूंनीं विणलीं असावीं, आणि त्यांचाच हा देदीप्यमान प्रकाश असावा! अथवा तिच्या कोमल हास्याचें तें चांदणेंच फांकलें असावें! तिच्या मुखचंद्राकडे जरी मला टक लावून बघवलें नाहीं, तरी ती मजकडे प्रेमळ व प्रसन्न दृष्टीनें पहात आहे हें माझ्या लक्षांत येत होतें, आणि त्यामुळें अंगावर अमृताचा वर्षांव होत असल्याचा भास होत होता! वाचा कशी ती मला फुटेचना! तरी त्यांतून सुद्धां तिला कांहीं विचारावें असा मनाचा हिय्या केला. तों ‘‘थांब’’ अशी तिनें हातानें खूण केली, व तुला फळ आणून देतें असें बोलून ती अंतर्धान पावली! त्याबरोबर मीं जागी होऊन डोळे उघडले तों फटफटीत उजाडलेले!..

शहाजी- मलाही सकाळपासून उत्तम शकुन होत आहेत. तुम्हाला पडलेलें स्वप्न आणि हे शकुन कोणच्या लाभाचे सूचक असावेत बरें!

जिजाऊ- (हंसत) हाच प्रश्न मी पुराणिकबोवांना विचारला. त्यांनीं सांगितलें कीं यापासून तुम्हांला सौख्यभोग व अपार वैभव प्राप्त होईल आणि इकडे लौकरच वजिरीचा अधिकार मिळेल!

शहाजी- वैभव, सौख्यभोग आणि वजिरीचा अधिकार! त्यांची महती कोण मानतो? बापाच्या लहरींपासून जिने लहरी स्वभाव घेतला ती चंचल लक्ष्मी! तिच्या पाठीस कोण लागला आहे? केवळ इंद्रियार्थाची तृप्ति करणारे पण वस्तुत: रोगांचें आगमन सुचविणारे जणूं काय त्यांचे भालदारच, असे ते तुच्छ विषयभोग! त्यांचा कोणाला हव्यास आहे? जिथें मुळीं सुलतानाच्याच अधिकाराची शाश्वती नाहीं, तेथें वजिरीच्या अधिकाराला काय किंमत आहे? जिथें मुळीं देवच देव्हाऱ्यांत रहाण्याची भ्रांति, तिथें पुजाऱ्याची वतनदारी कशी चालेल? राणीसाहेब, हें निजामशाही राज्य आतां फार दिवस टिकणार नाहीं. मोंगलाईचें प्रहण याला एव्हांपासून लागलें आहे. या राज्याचे सरदार, अधिकारी व महाजन मोंगल बादशहाच्या मोहिनीमंत्रानें कर्तव्यमूढ झाले आहेत. मलिकअंबरानें मरते वेळीं या सुलतानाचा हात माझ्या हातांत दिला, त्यामुळें इमानाला जागून मी त्याची नोकरी दक्षतेनें करतों आहें. एरवी हा सुलतान कोणाही सरदाराला नकोच आहे! खरोखर, हल्लींचा सुलतान हा निजामशाहीचा शेवचटा सुलतान होईल, त्यानंतर हें राज्य नाश पावेल, असें या सुलतानाच्या जन्मकाळींच कोणी ज्योतिषानें भविष्य वर्तविलें आहे तेंच दुर्दैवानें खरें ठरणार, ही माझी खात्री होऊन चुकली आहे. तसें झालें म्हणजे चोहोंकडे मोंगलाई अमलाचा जुलूम सुरू होऊन प्रजेला जीवन्मृताच्या विपत्ति भोगणें प्राप्त आहे! हा सर्वव्यापी अनर्थ जर चुकवावयाचा असेल तर आपलेंच असें निराळें स्वतंत्र मराठी राज्य निर्माण करण्याच्या उद्योगाला एव्हांपासून लागलें पाहिजे. त्याकरतां मराठय़ांची बुद्धि व पराक्रम एकत्र करून त्यांचा ओघ या कार्याकडे वळवला पाहिजे. एकंदर मराठमंडळांत आत्मविश्वास, साहसाची प्रीति व दृढनिश्चय हीं उत्पन्न केलीं पाहिजेत. तुझ्या कुळांत राज्यसंस्थापक अवतारी पुरुष उत्पन्न होईल असा देवीनें मालोजी राजांना वर दिलेला आहे तो राज्यसंस्थापक प्रकट होण्याची वेळ हीच आहे. तुम्हांला पडलेलें स्वप्न जर त्याच्या अवताराचें सूचक असेल तरच महाराष्ट्राचा तरणोपाय आहे, आणि त्यांतच आमचे परम कल्याण आहे. पुराणीकबोवांनीं सांगितलेला फलादेश एखाद्या स्वार्थलंपट माणसाला संतोषी करील, पण महाराष्ट्राची दैन्यावस्था कशी चुकेल या योजनेत व्यग्र झालेला जो मी, त्या मला हे कुटुंबकल्याणाचे विचार रुचत नाहींत! राणीसाहेब, तुमच्या स्वप्नामुळें कुटुंबकल्याणाचा केवढाही वर्षांव माझ्यावर झाला तरी त्यानें माझी देशकल्याणाची तळमळ शांत होणार नाहीं.’’

खरेशास्त्रींविषयी आणि त्यांच्या लेखनाविषयी आणखी जाणून घ्यायचे असल्यास दामोदर मोरेश्वर भट यांनी लिहिलेले ‘गुरुवर्य वासुदेव वामनशास्त्री खरे चरित्र व ग्रंथपरिचय- पूर्वार्ध आणि उत्तरार्ध’ हे पुस्तक अवश्य वाचावे.

संकलन: प्रसाद हावळे

prasad.havale@expressindia.com