पुतळ्यांचा राशोमोन प्रभाव!

पुतळ्यांच्या उंचीबद्दल (भौतिक आणि कलेल्या दृष्टीने) पाडेकरांनी प्रश्न उपस्थित केला आहे

(संग्रहित छायाचित्र)

पुतळ्यांचा राशोमोन प्रभाव!

‘लोकरंग’मधील (९ डिसेंबर) ‘उंची महत्त्वाची की कलात्मकता?’ हा दत्तात्रय पाडेकर यांचा लेख वाचला. पुतळे – स्मारके हा भारतीयांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय! पुतळे उभारण्यासाठी लोक बलिदानही देतील आणि त्यांचा विध्वंस करायला प्रसंगी कोणाचा जीवही घेतील! प. बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातसुद्धा पुतळे पाडले वा हटवले गेले आहेत. सर्व जगात थोडीफार अशीच परिस्थिती आहे. रशियात राष्ट्र उभे करणाऱ्या लेनिनच्या पुतळ्यांची कशी विटंबना केली गेली, हे आपण पाहिलेच आहे. व्हिएतनाम युद्धाच्या विरोधात उभारलेल्या आंदोलनात (१९६८) अमेरिकी यादवी युद्धातील जनरल जॉन ए. लोगान यांच्या ‘ग्रॅण्ड पार्क’मधील अश्वारूढ ब्राँझच्या पुतळ्यावर बसून आंदोलकांनी उत्तर व्हिएतनामच्या ‘नॅशनल लिबरेशन फ्रंट’चे झेंडे फडकावले आहेत. देशासाठी लढणाऱ्या योद्धय़ांच्या पुतळ्यांच्या नशिबी हे येईल, असा कोणी विचारही केला नसेल. त्याचीच पुढची कडी म्हणजे अमेरिकन कॉन्फेडरेटच्या योद्धय़ांचे अश्वारूढ पुतळे हटवण्यासाठी ऑगस्ट, २०१७ मध्ये सुरू झालेली चळवळ! कॉन्फेडरेटचे पुतळे म्हणजे गोऱ्यांची श्रेष्ठता (व्हाइट सुप्रीमसी) आणि गुलामगिरीची अनुकूलता दर्शवतात, असे चळवळ्यांचे म्हणणे. मात्र काहींनी असे पुतळे हटवण्यास विरोधही दर्शविला. त्यात अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचाही समावेश आहे. हे पुतळे म्हणजे सांस्कृतिक वारसा आहे, असा त्यांचा दावा आहे. अमेरिकी स्वातंत्र्ययोद्धा रॉबर्ट एडवर्ड  ली यांचा पुतळा २०१७ च्या ऑगस्टमध्ये हटवण्यात आला. नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता पुतळा हटवल्याचे कारण तेव्हा देण्यात आले आणि हटवलेल्या पुतळ्यांची यादी वाढतच गेली.

दोन्ही महायुद्धांतील अमेरिकी नायक जनरल जॉर्ज एस. पॅटन (ज्युनियर) यांचा ‘वेस्ट पॉइंट, युनायटेड स्टेट अ‍ॅकॅडमी’ येथील ब्राँझमधील पुतळा त्यांच्या पत्नी बीट राईस यांनी १९५० मध्ये उभारला. या पुतळ्याचे हात घडवताना पॅटन यांचे पूर्ण जनरल (Full General) पदाचे त्यांच्या हेल्मेटवरील चांदीचे चारही तारे वापरण्यात आले. या पुतळ्याचे तोंड ‘कॅडेट लायब्ररी’कडे आहे. कहर म्हणजे, याच ठिकाणी ५० यार्डाच्या अंतरावर अमेरिकी माजी जनरल आणि ३४ वे राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर यांचाही पुतळा आहे.. बरोबर विरुद्ध दिशेला तोंड करून! ‘अ जिनियस फॉर वॉर’ या पुस्तकात लेखक कालरे दी’इस्टी यांनी याचे वर्णन नेमक्या शब्दांत केले आहे. ते लिहितात- ‘It is bittersweet  irony that the statue of these two lifelong comrades should have their backs turned to each other.’ त्यामुळे कोणत्या थोर व्यक्तीची दिशा योग्य, याबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असावा. आपल्याकडेही एका महात्म्याची पूजा करताना दुसऱ्या महात्म्याकडे पाठ फिरवण्याचा पायंडा सुरू झाला आहे. मुळात पुतळे उभारून आदर्श निर्माण होतात काय, याचा सुज्ञांनी विचार केला पाहिजे.

पुतळ्यांच्या उंचीबद्दल (भौतिक आणि कलेल्या दृष्टीने) पाडेकरांनी प्रश्न उपस्थित केला आहे. भव्यतेबरोबर कलात्मकता येते, हा गैरसमज सध्या दृढ होताना दिसतो आहे. लग्न, वाढदिवस व उत्सवांत तर अतिरेकी टोक गाठण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे. भव्यतेबद्दल डॅन ब्राऊन यांच्या ‘द दा विंची कोड’ या कादंबरीतील पोलीस आणि नायक रॉबर्ट लँगडॉन यांचा पॅरिसमधील ७१ फूट उंचीच्या काचेच्या नव-आधुनिक पिरॅमिडबद्दल संवाद आहे. हा पिरॅमिड चीनमध्ये जन्मलेले अमेरिकी आर्किटेक्ट आय. एम. पे यांनी बनवला आहे. या पिरॅमिडची कल्पना होती फ्रान्सचे दोन वेळा निवडून आलेले माजी राष्ट्राध्यक्ष (१९८१-१९९५) फ्रांस्वा मित्तराँ यांची. ते डाव्या विचारसरणीचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. असे म्हणतात की, त्यांना ‘फरोह कॉम्प्लेक्स’ होता. त्यामुळे त्यांना इजिप्तमधील कलात्मक वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद होता. तर, हा पिरॅमिड पॅरिस येथील लुव्र संग्रहालयाच्या आवारात आहे. साधारणत: याच कालावधीत आपल्या देशातही जुनी थडगी खोदण्यास सुरुवात झाली. तीन-चार दशके लोटली तरी या थडग्यांची धूळ खाली बसलेली नाही.

फ्रान्समधील परंपरावादी नागरिकांच्या मते, या पिरॅमिडमुळे संग्रहालयाची वास्तू आणि परिसराची प्रतिष्ठा नष्ट झाली आहे. आधुनिक विचारांच्या नागरिकांच्या मते, या पारदर्शी उंच पिरॅमिडमुळे जुन्या आणि नव्या वास्तूत सांकेतिक एकरूपता आली आहे. परंतु आपल्या देशाप्रमाणे तेथे वाद पराकोटीला गेलेला नाही. ब्राऊनच्या कादंबरीतील संवादात पोलीस रॉबर्ट लँगडॉनला विचारतो की, ‘‘तुम्हाला पिरॅमिड आवडले का?’’ लँगडॉनला प्रश्नाचा रोख लगेच लक्षात येतो. उत्तर ‘हो’ दिले तर तुमची कलात्मकतेबद्दलची अभिरुची दिसून येते आणि जर उत्तर ‘नाही’ दिले तर तो फ्रान्सचा अपमान ठरतो. त्यामुळे लँगडॉन प्रश्नाचे उत्तर टाळून विषयाला पूर्णत: कलाटणी देतो- ‘मित्तराँ प्रभावशाली व्यक्ती होते’ अशी टिपण्णी करून!

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या कलात्मक उंचीवरून भविष्यात लँगडॉनसारखेच उत्तर देण्याची तयारी पर्यटकांना ठेवावी लागेल. पॅरिसमधील जगप्रसिद्ध ‘आयफेल टॉवर’ला (उंची- ३२४ मीटर) तेथील कला क्षेत्रातील जाणकार मंडळी ‘कारखान्याचे अजस्र काळेकुट्ट धुरांडे’ म्हणतात, तर तिथे काम करणारे कर्मचारी त्याला थेट राक्षसाची उपमा देतात आणि पर्यटकांच्या लांबच लांब रांगांना राक्षसी रांगा म्हणतात!

स्मारके-पुतळे उभारण्याबाबत प्रत्येकाचे वेगळे मत असू शकते. प्रभाव व्यक्तीसापेक्ष असतो. लेखात उल्लेखलेल्या पुतळा उभारणीतील तांत्रिक व कलात्मक चुका आणि त्रुटींकडे पूर्णत: दुर्लक्ष करून आपण भव्यतेचा ढोल पिटणार असू, तर तो ‘राशोमोन प्रभाव’च म्हणावा लागेल!

– दीपक रामचंद्र धुमाळ, नवी मुंबई

‘बिग इज ब्युटीफुल’ला छेद

‘उंची महत्त्वाची की कलात्मकता?’ या दत्तात्रय पाडेकर यांच्या लेखात ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे परखड समीक्षण वाचायला मिळाले. ‘बिग इज ब्युटीफुल’ या धारणेला छेद देणारा हा लेख आहे. सरदार पटेलांच्या पुतळ्याची तुलना उंचीसाठी ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ (न्यू यॉर्क), ‘स्प्रिंग टेम्पल बुद्ध’ (चीन), ‘द मदरलँड कॉल्स’ (रशिया) किंवा ‘क्राइस्ट द रीडीमर’ (ब्राझिल) या पुतळ्यांशी केली जाते. परंतु या पुतळ्यांचे शिल्पकलात्मक सौंदर्य विचारात घेतले, तर एक उंची सोडल्यास या पुतळ्यांशी अजिबात तुलना होऊ शकत नाही. हे पुतळे उंचीने कमी असले, तरी त्या सर्वामध्ये जिवंतपणा आहे. त्यांच्या ठेवणीमध्ये जिवंतपणा दाखवणारी ‘अ‍ॅक्शन’ आहे. सरदार पटेल यांच्या पुतळ्यात ते राष्ट्रगीतासाठी निश्चल उभे असल्यासारखे वाटतात.

शिल्पाकृतीच्या सर्व निकषांचे उल्लेख पाडेकरांच्या लेखामध्ये आहेत. जसे की- चेहऱ्यावरील भाव, शारीरिक ठेवण, अंगावरील वस्त्रांचा पोत, त्यांच्या चुण्या आदी. पुतळ्याच्या चौथऱ्याच्या आकाराचाही त्यांनी उल्लेख केला आहे. कुठलाही पुतळा घ्या. त्याचा चौथरा हा त्या पुतळ्याचा अविभाज्य घटक असतो. पुतळा आणि चौथरा मिळून एक कलात्मक रचना असते. तिला एक सौंदर्यात्मक मूल्य असते. असो. पाडेकरांसारख्या जाणकार, अनुभवी समीक्षकाने अभिजात कलाकृतींची केलेली समीक्षणे सामान्य लोकांची अभिरुची संपन्न करण्यास नक्कीच साहाय्यक ठरतील.

– भा. द. साठे, मुंबई

स्मारकासाठी पुतळाच का?

वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याविषयी दत्तात्रय पाडेकर यांचे अतिशय मार्मिक आणि सडेतोड विवेचन वाचले. त्यांना जितके दोष या राम सुतारकृत पुतळ्यामध्ये जाणवले आहेत, त्यापेक्षा ते अधिकच असावेत. सदर पुतळ्याच्या सौंदर्याविषयी न बोललेलेच बरे! राम सुतार यांचे वय आणि त्यांच्या महान कलाकारकीर्दीचा आदर राखूनही असे खेदाने म्हणावे लागत आहे. खूप पसे खर्च करणे म्हणजेच उत्कृष्ट कलानिर्मिती हा विचार (निदान सरकारदरबारी तरी) बदलला गेला पाहिजे. मूलत: कोणतेही स्मारक हे पुतळ्याच्याच स्वरूपात का असावे? इतकी मोठी रक्कम (सुमारे तीन हजार कोटी रुपये) खर्च करून पटेल यांच्या स्मारकासाठी इतर अनेक लोकोपयोगी पर्याय शोधता आले असते.

– अरुण म. काळे

‘शिल्प’ नव्हे, ‘पुतळा’च!

दत्तात्रय पाडेकर यांचा लेख वाचला. त्यात े्नसरदार पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला ‘पुतळा’ म्हटले यातच सर्व काही आले. ‘शिल्प’ व्यक्तिमत्त्व व्यक्त करते, तर ‘पुतळा’ त्या व्यक्तीचे बारूप दाखवतो. ढोबळ गोष्टी कधी अप्रतिम होत नाहीत. तिथे त्या व्यक्तीची उंची कळते, पण त्यात यांत्रिकपणा येतो. कणखर, पोलादी असे सरदार पटेल त्यातून दिसणे अशक्य. देश तुकडय़ांनी विभागला होता. देशात त्यांनीच सार्वभौम सत्ता आणली. तो कणखरपणा आणि पोलादीपणा शिल्पात यायला हवा होता.

– जयश्री पाटणकर, मुंबई

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पडसाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Readers reaction on lokrang articles

ताज्या बातम्या