डॉ. चैतन्य कुंटे
‘धन्य धन्य वैष्णव संग। अखंड तेथे पांडुरंग।

कीर्तनी नाचतसे अभंग। अखंड काळ सर्वदा।’

Pune : पुण्यातील प्रसिद्ध बाजारपेठला ‘तुळशीबाग’ हे नाव कसे पडले? जाणून घ्या, नावामागचा रोमांचक इतिहास
Loksatta vasturang Gudhipadva 2024 Buy news house car goods
गुढीपाडव्याला उंचे गुढी उभवावी
chavadi maharashtra political crisis
चावडी : राणे आणि भुजबळांची वेगळी तऱ्हा
career in singin
चौकट मोडताना : ‘छंद म्हणून हवा तेवढा जोपासा’

वारकरी संप्रदायात आद्य कीर्तनकार मानलेल्या संत नामदेवांच्या या पंक्तीत भजनाचे महत्त्व अधोरेखित होते.

‘महाराष्ट्रातील धर्मसंगीत’ असा विचार चहुअंगाने मांडायचा तर मोठय़ा कालपटावर अनेक तत्त्वपरंपरा, पंथ आणि त्यांच्याशी जोडलेले संगीत, तसेच महाराष्ट्राची अन्य प्रांत, पंथ, भाषा आणि संगीत यांच्याशी होत राहिलेली देवाणघेवाण अशा बाबींचा विचार करावा लागेल. हे सारे एका लेखात सामावणे अशक्य आहे. त्यामुळे लवकरच येत असलेल्या आषाढी वारीच्या निमित्ताने प्रामुख्याने वारकरी भजनाबद्दल इथे लिहिणार आहे.

महाराष्ट्राच्या धर्मसंगीत परंपरेचा मागोवा घेताना भागवत संप्रदायाच्या उद्गमाआधी आणि नंतर असे ठळक विभाग पाडले तर ध्यानात येते की दहाव्या शतकापर्यंत शैव, शाक्त, गाणपत्य, वैष्णव यांसह बौद्ध, जैन हे पंथही इथे प्रचलित होते. त्या काळातील धर्मसंगीत नेमके कसे होते याची विशेष नोंद नाही. पुढे महानुभाव, नाथ, वारकरी, दत्त, रामदासी इ. संप्रदाय रुजले आणि अगदी अलीकडच्या काळापर्यंत कित्येक उपपंथांची भर पडत राहिली. खंडोबा, म्हाळसा, यल्लम्मा, रेणुका, रवळनाथ अशा लोकदेवतांचीही प्रभावळ मराठी धर्मजीवनाचे महत्त्वपूर्ण अंग आहे. या साऱ्याच संप्रदायांनी आपापली पदे रचली, संगीतधाटणी तयार केली.

१२ वे ते १७ वे शतक एवढय़ाच मर्यादित काळातील मराठी भक्तिसाहित्य पाहिले तरी गीतप्रबंधांचा व्यापक पट उलगडतो. हे प्रकार असे : गाथा, श्लोक, स्तोत्र, नामावली वा बिरुदावली, धुवा, जति, फागडा, पद (द्विपदी, चौपदी, अष्टपदी, चर्यापद), नमन व मंगलाचार, आरती (जयकाराच्या, विभूतिपर, काकड आरती, शेजारती, धूपारती, इ. प्रकार), धवल वा ढवळे, पाळणा, भूपाळी, ओवी, अभंग (देवद्वार, देवीद्वार, एकनाथी इ.), गोपीगीत वा गौळण, विराणी, कूटगीत, खेळिया, रासगीत, कापडी, भारूड, धावा, सवाया, वासुदेवगीत, गोंधळगीत, जागरणगीत, भराडीगीत, जोगवा, दोहा, चतुरंग, चूर्णिका, लावणी (भेदिक, कलगी-तुऱ्याची), रिवायत, इ.

शिवाय कीर्तनी संगीतातील आर्या, दिंडी, साकी, कटाव, फटका, इ. प्रकार केवळ काव्यछंद म्हणून नव्हे, तर चालींचे साचे म्हणूनही वेधक आहेत. एकेकाळी आध्यात्मिक आशयाचा पोवाडा व गझलही महाराष्ट्रात होता. वारकरी संप्रदायातील संतप्रभावळीखेरीज इतर पंथांचे रचनाकार आणि कीर्तनकारांच्या रचनाही धर्मसंगीताच्या दृष्टीने वेधक आहेत. त्यांत निपटनिरंजन, अमृतराय, मध्वमुनीश्वर, माणिकप्रभु इ. नावे महत्त्वाची आहेत. शेख महंमदसारख्या मुस्लीम असूनही वारकरी संप्रदाय अनुसरणाऱ्या संतकवींच्या रचनाही लक्षणीय आहेत.

वर उल्लेखिलेल्यापैकी काही प्रबंध आजही गायले जातात. परंतु संहितारूपाने उपलब्ध असलेल्या हजारो पदांपैकी गेयरूपात आज शिल्लक असलेले फारच थोडे आहे. कालौघात विसरलेले असे बरेच संगीत आहे. अगदी साधं उदाहरण देतो. ५०-६० वर्षांपूर्वी घराघरांत स्त्रीगीत म्हणून गायले जाणारे धावे, ओव्या, गोपीगीते आता विस्मृतीत गेली आहेत आणि ‘माजघरातलं भक्तिसंगीत’ आपण हरवून बसलो आहोत.

शिखांचे गुरुबानी संगीत, पुष्टिमार्गीय संगीत, बंगाल-आसाम-मणिपूरचे संकीर्तन संगीत या कलासंगीताला जवळ करणाऱ्या धर्मसंगीताच्या परंपरांच्याही पूर्वी महाराष्ट्राची धर्मसंगीत परंपरा होती. मग कलासंगीतपर अशी धर्मसंगीत प्रणाली महाराष्ट्रात आज का बरे दिसत नाही? काही अभ्यासकांचे मत आहे की, महाराष्ट्राची उत्तर वा दक्षिणेपेक्षा निराळी अशी स्वत:ची संगीतप्रणाली होती. ‘हनुमत मत’ म्हणून लावणीकार तिचा उल्लेख करतात. आणि दासोपंतांसारख्या रचनाकारांनीही त्याच प्रणालीत रचना केल्या होत्या. मुखारी, धनाश्री, मारू, अहिरी, नाट, मल्हार, कल्याण, गौडी, मालगौडा, केदार, कानडा, काफी, श्री, तोडी, वसंत, परज, सोरठ, कांबोद, भैरव, बिलावल, सारंग, हेजीज, शंकराभरण, नौरोज, हुसैनी, इ. रागनामे दासोपंत, रामदास यांच्या रचनांच्या संदर्भात नमूद आहेत. मात्र, ही संगीतप्रणाली १७ व्या शतकापासून अस्तंगत होत गेली आणि आज दुर्दैवाने नामशेष झाली आहे. आज महाराष्ट्रीय भजनावर हिंदुस्थानी संगीताचाच प्रभाव जाणवतो.

सध्या वारकरी भजन कसे सादर होते? वारकरी भजनात इष्टदैवताच्या प्रतिमेसमोर वीणा व चिपळी हाती असलेले विणेकरी वा भजनीबुवा असतात, तर दुतर्फा समूह असतो. डावीकडे मृदंग वा पखवाजवादक असतो. भजनीबुवांच्या मागून समूह टाळ वाजवत प्रतिसादी पद्धतीने चरण उचलत गातो. आरंभी ‘जय जय राम कृष्ण हरी’ हा गजर, पाठोपाठ मंगलाचरण व रूपाचा अभंग गातात. यानंतर वीणा व विणेकऱ्याला बुक्का लावून, हार घातला जातो. भजनाच्या पूर्वरंगात पंचपदी असते. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम इत्यादी संतांच्या अभंगांचा मुख्यत्वे समावेश असतो. ईश्वराचे रूप, कृपा, भक्ती यांसह गुरू, उपदेश, नाममहिमा अशा आशयाची पदे गायली जातात. उत्तररंगात गौळण, विराणी, कधी भारूड, खेळगीत, कूटगीत अशा रचना सादर होतात. शेवटी श्रीविठ्ठल व संतांच्या आरत्या म्हणून पसायदान व संत नामदेवांचे चिरंजीवपद यांनी भजनाचा समारोप होतो. वारकरी संप्रदायात दैनंदिन आणि नैमित्तिक भजनाचा मार्गक्रम, रचनांच्या चाली यांचा निश्चित आराखडा आहे. हा क्रम हैबतीबाबाने ठरवला असे मानतात. चालींचे साचेही शतकानुशतके चालत आलेले आहेत. त्यात जनसंगीतातील लोकप्रिय चाली गेल्या काही काळात शिरू लागल्या असल्या तरी खरे सांप्रदायिक असे बदल मान्य करीत नाहीत.

पंढरपूरच्या वारीच्या वेळी विविध फडांचे दिंडीतील भजन हा विलक्षण अनुभव असतो. पालखी चालली असता प्रत्येक दिंडीत टाळ-मृदंगाच्या साथीने भजन चालू असते. हे ‘वाटचालीचे अभंग’ आणि त्यांचा क्रम ठरलेला असतो. दिंडीत सकाळ, दुपार आणि मुक्कामाचे भजन होते. पालखीची वाटचाल सुरू झाली की दिंडीतील विणेकरी ‘रूप पाहता लोचनी’ या अभंगाने दहा अभंगांची पहिली मालिका सुरू करतो. या मालिकेच्या अखेरी ‘राम कृष्ण हरी’ नामघोष होतो. नंतर १२ अभंगांची दुसरी मालिका ‘योगिया दुर्लभ’ या अभंगाने सुरू होते. तिसरी मालिका ‘वासुदेव मालिका’ म्हणून ओळखतात. ‘आंधळे-पांगुळे’ ही चौथी मालिका असते. पाचवी आणि शेवटची मालिका गौळणीची असते. त्यानंतर पालखी दुपारच्या विश्रामास थांबते.

दुपारच्या भजनात प्रामुख्याने ज्ञानदेवांचे हरिपाठाचे अभंग असतात. प्रत्येक अभंगाच्या शेवटी ‘हरी मुखे म्हणा..’ हा चरण म्हणतात. त्यातील सत्ताविसावा अभंग म्हटल्यावर दिंडी थांबते आणि वारकरी दोन रांगांत पालखीच्या सन्मुख उभे राहतात. ‘ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवी ज्ञान। समाधी संजीवन हरिपाठ।’ हे पालुपद म्हणतात. पादुकांना नमस्कार करून हरिपाठाचा शेवटचा अभंग म्हणत पुन्हा मार्गक्रमणा होते. मग गुरूपरंपरेचे अभंग म्हणतात. नंतर ‘अवघाचि संसार’ आणि अन्य अभंग म्हणतात. मुक्कामाचे गाव आले की शेवटची संतस्तुती ही मालिका सुरू करतात. रात्री पालखी ठेवण्यासाठी उभारलेल्या तंबूसमोर सर्व वारकरी जमतात आणि ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’चा घोष करतात. सुरुवातीला संथ लयीतल्या घोषाची लय वाढत जाते. पालखी तंबूसमोर ठेवली की लय पराकोटीला पोचते. शेवटी आरती होऊन भजन संपते.

वारकरी भजनाचे वासकर, गुरव, कदम, करमरकर असे विविध फड आहेत. प्रत्येक फडात परंपरेने काही निवडक अभंग गातात. फडांच्या पूर्वसुरींनी ठरवून दिलेल्या या अभंगांखेरीज अन्य रचना गाणे त्यात मान्य नाही. पंढरपुरात आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत आणि आळंदीत कार्तिक वद्य प्रतिपदा ते अमावास्येपर्यंत हे फड असतात. यांत भजनांचे प्रकारही आहेत. पालख्या पंढरपुरी येताना ‘चक्री भजन’, गोलाकार उभे राहून पदन्यास करत गायचे ‘रिंगण भजन’, भक्तांची सोंगे घेऊन अभंगरूपी संवादाचे ‘सोंगी भजन’, सवालजवाबी ‘बारी भजन’, केवळ भारुडाचे ‘भारुड भजन’, रंगांचे अभंग असलेले ‘रंगीत भजन’, गाथाभजन, हरिपाठाचे भजन, काकडय़ाचे भजन असे प्रकार त्यांतील चालीच्या वैविध्यामुळेही वेधक ठरतात.

वारकरी संप्रदायाखेरीज दत्त संप्रदाय आणि रामदासी पंथाने संगीताची खास धाटणी तयार केली असून, तेथेही चालींची विविधता आढळते. साईबाबांच्या पंथात कव्वालीच्या धर्तीचे ढोलक-चिमटा यांच्या साथीने गायले जाणारे भजनही ऐकताना निराळे कळते. शैव, शाक्त, नाथपंथात एकतारी भजन, दिमडीवरचे भजन, खडे भजन असेही प्रकार असतात. शिवाय विदर्भ, मराठवाडा, खानदेश, बारदेश, कोकण असे प्रांतीय भेदही भजनाच्या धाटणीत लक्षात घेण्यासारखे आहेत. या सर्व भेदांत भजनाची एकूण मांडणी, साथीची वाद्ये, सुरावटी, आवाजाचा लगाव अशा अनेक बाबतींत कितीतरी वैविध्य दिसते.

आज प्रचलित असलेल्या सांप्रदायिक चालींत कालिंगडा, गौरी, जोगिया, पिलू, गारा, झिंझोटी, काफी, खमाज, कल्याण, भूप, बिहाग, भीमपलास, सारंग, भैरवी अशा रागांच्या छटा दिसतात. मुख्यत: ठायीची धुमाळी, भजनी ठेका, दादरा, झपताल, त्रिताल या तालांत गायन होते. कोकणातील संगीतभजनात सवारीसारख्या अप्रचलित तालांतही भजन गायले जाते.

महाराष्ट्रीय धर्मसंगीतात वीणा (तंबोरीसारखे वाद्य, पुल्लिंगी उल्लेख), एकतारी, मृदंग वा पखवाज, टाळ, झांज, चिपळी, दिमडी वा खंजिरी अशी वाद्ये दिसतात. महाराष्ट्राच्या लोकसंगीतात विपुल असूनही सुषिरवाद्ये व स्वरधूनक्षम अशा तंतुवाद्यांचा धर्मसंगीतातील अभाव काय सुचवतो? हेच, की महाराष्ट्रीय धर्मसंगीताने स्वरांच्या अलंकरणास कमी महत्त्व दिले होते आणि ठरावीक चालींच्या साच्यात सीमित राहून पदाच्या आशयाकडे अधिक ध्यान राहावे अशी योजना केली होती. आधुनिक काळात पायपेटी वा हार्मोनिअमचा शिरकाव होणे आणि तिला अढळ स्थान मिळणे हे आम्ही सुरावटीस, अलंकरणास अधिकाधिक महत्त्व देऊ लागलो याचे एक लक्षण आहे.

भजनाच्या सांप्रदायिक चालींबरोबर गेल्या शंभर वर्षांत ख्याली ढंगाच्या रागाधारित चालींची व गायकीची भर पडली आहे. एकेकाळी बालगंधर्व, मास्टर कृष्णराव यांच्या गायकीचा प्रभाव त्यावर होता. तर पुढे भीमसेन जोशी, जितेंद्र अभिषेकी यांची गायकी अनुसरली गेली. गेल्या काही वर्षांत भजनात गझलचा ढंग, चमत्कृतीपूर्ण सरगम आणि तानांची आतषबाजी असणारी गळेबाजी फोफावली आहे. त्यात भजनभाव कमी आणि गायकांची आत्मप्रौढी अधिक जाणवते. केवळ शब्द भजनाचे, पण सांगीतिक मांडणी मात्र गझल-ठुमरीची अशा साच्याचे हे ‘नावापुरते भजन’ हल्ली फिल्मी वाद्यमेळ आणि यूटय़ूब व्हिडीओज्मधून जनसंगीताच्या मखरात जाऊन बसले आहे.

असे बदल हे होतच राहणार.. कुणी विरोध केला तरी ते स्वीकारलेही जाणार. ‘धर्मसंगीताच्या परिघातील दैनंदिन उपासनेतील संगीत, उपदेशात्मक आविष्कारांतील संगीत हे फारसे बदलत नाही. मात्र, जनसमुदायास सन्मुख असलेले भक्तिसंगीत काळानुसार बदलत राहते.’ हा संस्कृति-संगीतशास्त्रीय सिद्धांत ध्यानात घेतला तर या बदलांची संगती लागते.

आणि हो- हे बदल आजचे नाहीत. अठराव्या शतकातील मध्वमुनीश्वर (मृत्यू १७३१) ‘हल्लीचे हरिदास नव्याच्या पाठीमागे धावतात’ म्हणून टीका करताना म्हणतात..

‘ओव्या, श्लोक, पदे, प्रबंध रचना।

हे तो निघाली नवी।

टप्पे, ख्याल कितेक गाती।

यमके झाले फुकाचे कवी। ।

गीता भारत वेदशास्त्र न रुचे।

गेली जनांची चवी।

ऐसे देखुनी मध्वनाथ म्हणतो।

देवा मला वाचवी।।’

(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र गुरुकुल येथे सहायक प्राध्यापक आहेत.)

keshavchaitanya@gmail.com