पदव्युत्तर शिक्षण आणि पीएच. डी.धारक असतानाही तासिका तत्त्वावर प्राध्यापकी करण्याचे भागधेय नशिबी आलेल्या अनेकांच्या बाबतीत या रोजगाराचाही घास करोनाकाळाने घेतला. मग सुरू झाली अस्तित्वाची लढाई! कुणी शेती करू लागले, कुणी चहाचे दुकान टाकले. कुणी आणखी काय काय करू लागले. त्यांच्या या फरफटीने त्यांना प्रश्न पडला आहे की, ‘आमच्या पात्रतेचा उपयोग काय?’

सुहास सरदेशमुख

‘ऑप्टिकल फिल्टर’ हा संशोधनाचा विषय. त्यात बौद्धिक संपदा हक्क मिळेपर्यत काम पूर्ण. वयाची ३६ वर्षे केवळ शिक्षण घेण्यात आणि विद्यार्थी घडविण्यात घालवलेली. गोंदिया जिल्ह्यतील ‘डॉ. प्रा.’ अशी बिरुदावली लागल्यानंतर सुधीर मुनीश्वर सध्या वडिलोपार्जित शेतीत काम करू लागले आहेत. गेली काही वर्षे विनाअनुदानित महाविद्यालयात तासिका तत्त्वावर काम केल्यानंतर करोनाकाळात त्यांचे ते कामही हातचे गेले. तासिका तत्त्वावरील मानधन आणि शिकवणीतून मिळणाऱ्या पैशांतून मुनीश्वर आपल्या कुटुंबाच्या खर्चास थोडाफार हातभार लावू शकत होते. परंतु आता ते भातशेती करू लागले आहेत. त्यांच्या मनाला खंत हीच आहे की, वयाची एवढी वर्षे शिक्षण क्षेत्रात घालवली; पण काय उपयोग झाला? दहा वर्षांपूर्वीपर्यंत त्यांना असे काही वाटत नसे.  २०१२ मध्ये राज्य पात्रता चाचणी आणि राष्ट्रीय पात्रता चाचणीत त्यांनी यश मिळवले. तीन वर्षांपूर्वी ‘विद्यावाचस्पती’ ही पदवी मिळवली. संशोधनातही नवे काही घडवता येईल असा त्यांना विश्वास होता. आज तो आत्मविश्वास पूर्णत: ढासळला आहे. जगण्यासाठी मिळेल काम करण्याचा निर्णय त्यांनी नाइलाजाने घेतला आहे. अपेक्षाभंगाच्या ओझ्याने सुधीर मुनीश्वर आता शेतात राबतात. यात चूक कोणाची?

आपल्या मायमराठीचा केवढा अभिमान आहे आपल्याला! कुठे एखाद्या दुकानाची पाटी मराठीत नसेल तर लगेचच खळ्ळखटय़ाक् करायला हातात हॉकी स्टिक घेतलेले तरुण महाराष्ट्राने आणि मुंबईने पाहिले आहेत. ज्ञानोबा-तुकोबांच्या महाराष्ट्रात मराठीचे कौतुक नसणारा माणूस हा राज्यद्रोही ठरवण्यापर्यंत आपली मजल गेली आहे. या मायमराठीचा अभ्यास करत सागर अशोक पोतदार यांनी नाशिकला मराठी भाषेचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. ते दोन वेळा राज्य पात्रता चाचणी परीक्षेत उत्तीर्णही झाले. दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्य हा त्यांचा आवडीचा विषय. वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. भाऊही याच व्यवसायात. खूप कष्टांनी त्यांनी सागरच्या शिक्षणाचा खर्च केला, पण नोकरी काही लागली नाही. वर्तमानपत्रांतील नोकऱ्यांच्या जाहिरात पाहणे हेच जगण्याचे रुटीन झाले होते, इतक्यांदा नोकरीसाठी मुलाखतीही दिल्या. अहमदनगर, उरळी कांचन, मालेगाव, धुळे अशा जिल्ह्यतील महाविद्यालयांत नोकरीसाठी प्रयत्न केले. पण ती मिळत नाही हे लक्षात आल्यावर एका औषधी दुकानात ते नोकर म्हणून काम करू लागले. आज सागर पोतदार यांना त्यातून कसेबसे जगता येते. ते म्हणतात, ‘मराठीचा अभ्यास करावा; पण त्यातून जगता येईल असे मात्र नाही.’

भाषा विषयाचे प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता असणारे अनेक उमेदवार आज छोटी-मोठी कामे करून जगण्यासाठी धडपडत आहेत. आता या ‘उमेदवारांना’ कोणी तासिका तत्त्वावरही  ्प्राध्यापकीसाठी बोलावीत नाही. त्यामुळे अध्यापनातून पैसे मिळण्याचा प्रश्नच नाही. मराठीची ही गत सुधारावी, भाषेचे नवे अभ्यासक पुढे यावेत असेही कोणाला वाटत नाही. मराठीचा कृतक अभिमान बाळगणारे थेट हिंसेवर उतरत अंगावर येतात आणि खरे अभ्यासक मात्र पाच-सहा हजार रुपयांवर कुठेतरी राबत राहतात.

‘समता नायक बसवण्णा’ आणि ‘पूर्व- मध्ययुगीन शैवधर्म संप्रदाय’ ही इतिहासाधारित पुस्तके प्रकाशित झालेल्या डॉ. गणेश होनराव यांनी इतिहासविषयक अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये हजेरी लावली आहे. इतिहास विषयात पदव्युत्तर शिक्षण, पुढे शिक्षणशास्त्रातील पदवी, तसेच एम. फिल. आणि ‘विद्यावाचस्पती’ या पदव्या मिळवल्यानंतर कधी ना कधी आपण प्राध्यापक होऊ या आशेवर त्यांनी तासिका तत्त्वावर नोकरी केली. पण करोना साथ आली आणि तासिका घेण्यासाठी महाविद्यालयाकडून बोलावणेच आले नाही. उदगीरच्या हवगी स्वामी महाविद्यालयात आणि उदयगिरी महाविद्यालयात ते शिकवत असत. करोनामुळे  सारे काही थांबले, तसे तासिका तत्त्वावरील सहा महिन्यांनी मिळणारे तुटपुंजे मानधनही थांबले. मग गणेश होनराव यांनी चहाचे दुकान सुरू करण्याचे ठरवले. त्यासाठी मुद्रा योजनेतून कर्ज घेतले. १९ मार्चला चहाचे दुकान सुरू केले आणि २१ मार्चला टाळेबंदी लागली. आज गणेश होनराव यांना आपण इतिहास शिकलो त्याचे काय करायचे, असा प्रश्न पडलेला आहे. ते मराठवाडा इतिहास संशोधन परिषदेचेही सदस्य आहेत. आयुष्यात शिक्षणाची कास धरून त्यात यश मिळवल्यानंतरसुद्धा आपल्या हाती आज काय लागले, असा जीवघेणा प्रश्न त्यांना पडला  आहे.

हे असे का घडते? घडले? या प्रश्नाचे उत्तर ही उच्चशिक्षित मंडळी काहीशा विश्लेषणात्मक पद्धतीने देतात. प्रा. नितीन घोपे यांनी भूगोल विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. राष्ट्रीय पात्रता चाचणीही ते उत्तीर्ण झाले. २००९ मध्ये हे सारे केल्यानंतर ‘विद्यावाचस्पती’साठी त्यांनी नोंदणी केली. दरम्यान, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आणि मुक्ताईनगरमधील महाविद्यालयांत त्यांनी तासिका तत्त्वावर शिकवण्याचे कामही केले. आज करोनाकाळामुळे त्यांना हे काम सोडून शेती करावी लागते आहे. आपला प्रवास कथन करताना ते सांगतात, ‘१९९६ पासून ‘कंत्राटी प्राध्यापक’ ही संकल्पना सुरू झाली आणि पूर्ण- वेळ प्राध्यापक भरतीला शिक्षणसंस्थांना पर्याय मिळाला. ही पदे भरली नाहीत तरी फारसे काही बिघडत नाही अशी त्यातून सरकारची धारणा बनली. २००९ पासून तुकडय़ातुकडय़ांनी काही जागा भरण्यात आल्या. त्यातही शासकीय कंत्राटी, विद्यापीठ निधीच्या असे नाना प्रकार करण्यात आले.  गेल्या दहा वर्षांत प्राध्यापकांची भरतीच झाली नाही. तासिका तत्त्वावर राबणाऱ्यांना प्रति-तास ५०० रुपये मिळावेत असे अपेक्षित आहे. पण मिळतात ४१७ रुपये. आठवडय़ाला  नऊ तास आणि महिन्याला ३६ तासांचे नियोजन घालून देण्यात आले. त्यामुळे तासिका तत्त्वावर शिकवण्याचे काम करणाऱ्याला फार तर १८ हजार रुपये मिळतील अशी तजवीज करण्यात आली. करोनाकाळात तासिकांचे गणित कोलमडले. या काळात ऑनलाइन तासिका घेतल्याचे पुरावे सादर केल्यानंतर सहा महिन्यांनी मिळणारी रक्कम अगदीच तोकडी होती. आता दहावी उत्तीर्ण झालेल्या हॉटेलमधील कामगारांनाही नऊ ते साडेनऊ हजार रुपये मिळतात. प्राध्यापक म्हणून ज्यांच्या कामाला विद्यापीठ मान्यता देते, ज्यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाही तपासून घेतल्या जातात अशांना दिली जाणारी ही रक्कम कमालीची तोकडी आहे. हे सारे घडते आहे ते प्राध्यापकांच्या रिक्त जागांमुळे. राज्यात १७ ते १८ हजार प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. राज्यात ४६०० जागा भरण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यापैकी कोविडपूर्वी १६०० जागा भरण्यात आल्या. त्यानंतर ३०७४ जागांचा प्रस्ताव वित्त विभागाकडे उच्च शिक्षण मंत्रालयाने सादर केलेला असला तरी त्याला करोनापायी ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे मान्यता मिळालेली नाही. मात्र, जेव्हा पदभरती होते तेव्हा प्राध्यापकांच्या रिक्त जागांसाठी संस्थाचालकांच्या वरकमाईचा आकडा आज ६० लाखांवर गेला आहे. त्यातही राजकीय वरदहस्त असेल तर ही किंमत! तुम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाचा आधार नसेल तर नियुक्ती मिळणेच अवघड. त्यामुळे इतिहास, मराठी, मानव्यशास्त्र या विषयांतील उच्चशिक्षित सुयोग्य रोजगाराअभावी बेकार आहेत. परंतु माणसाला उदरनिर्वाहासाठी काहीतरी हातपाय हलवावेच लागतात. जळगावचे प्रा. विनोद नाईक हे फावल्या वेळात मांस आणि अंडीविक्रीचा धंदा करतात. परभणीचे प्रा. स्वप्नील धुळे भाजीपाला विकतात. ज्यांच्या घरी शेती आहे ती मंडळी आता शेतीमध्ये उतरली आहेत. औरंगाबादचे प्रा. गंगाधर गव्हाणे कपडय़ाच्या व्यवसायात उतरले आहेत. जसे जमेल तसे जगण्यासाठी व्यवसायाची तडजोड करणारी ही मंडळी आता आमच्या पात्रतेचा उपयोग काय, असा प्रश्न विचारीत आहेत.

suhas.sardeshmukh@expressindia.com

उच्चशिक्षणाचा येळकोट

एका बाजूला तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या समस्यांचा गुंता वाढतो आहे. हा गुंता निर्माण होण्यामागे रिक्त  जागा हे कारण आहेच, पण प्रश्न केवळ प्राध्यापकांच्या रिक्त जागांचाच नाही, तर अध्यापनातील गुणवत्तेचादेखील आहे. गेल्या काही वर्षांत ‘विद्यावाचस्पती’ ही पदवी देताना त्यासाठीच्या संशोधनाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहील असेच वातावरण आहे. मात्र, संशोधन पुरेसे नाही म्हणून पदवी नाकारण्याचे प्रमाण केवळ ०.१ टक्के एवढेच आहे. औषधीनिर्माण शास्त्रासारख्या विषयात दरवर्षी पीएच. डी. मिळवणाऱ्यांची संख्या खूप आहे. परंतु नवे औषध तयार होताना मात्र दिसत नाही. कारण या क्षेत्रातील संशोधनासाठी किमान १५ वर्षे लागतात. नव्या शैक्षणिक धोरणात काही बदल करण्यात आले आहेत. संशोधन संस्था आणि त्यासाठीचा निधी वाढविण्याचाही प्रस्ताव आहे. आपल्याकडे शिक्षण आणि उपजीविका यांचा संबंध जोडून पाहिले जाते. परदेशात शिक्षण घेत राहावे ही संकल्पना आहे. शिक्षण आणि उपजीविका यांचा ताळमेळ घालण्यासाठी नवे अभ्यासक्रम, आंतरशाखीय अभ्यास वाढविण्याची गरज आहे. अन्यथा पारंपरिक पद्धतीने नुसती पीएच. डी. मिळवून फारसे काही हाती लागणार नाही.

– डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ