– स्वप्निल बोराडे

डॉक्युमेण्ट्री म्हणजे कुठल्या तरी समस्येवरच आधारित हा ढोबळ समज डावलून त्यात ‘गोष्ट दिसतीये का’ हे तपासून पाहणाऱ्या आणि ती शोधण्यात आनंद मानणाऱ्या दिग्दर्शकाची ही कहाणी. आज डॉक्युमेण्ट्री या चित्रमाध्यमाची गरज का, या प्रश्नाच्या उत्तरासह…

फेब्रुवारी २०२० मध्ये मी कोलकात्याला होणाऱ्या ‘डॉकेज कोलकाता’ या सात दिवसांच्या कार्यशाळेला हजेरी लावली. जगभरातले नावाजलेले ‘डॉक्युमेण्ट्री फिल्ममेकर्स’ तिथे येतात आणि नव्याने या क्षेत्रात शिरू पाहणाऱ्या तरुणांना त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळते. तिथेच निल्स अॅण्डरसन ( Nils Pagh Anderson) या खूप नावाजलेल्या सिनेमा संकलकाशी बोलण्याचा योग आला. डॉक्युमेण्ट्रीबद्दल ते आम्हाला सांगत होते- ‘‘व्यवस्थेला तुमचं काम नकोसं असेल, कारण तुम्ही तिला आरसा दाखवत असता. या जगात सत्य कुणाला बघायचंय? पण तरीही आपण सर्व शक्ती एकवटून हे काम करत राहू.’’ यानंतर ते आणखी एक वाक्य बोलून गेले- ‘‘कथा असलेला चित्रपट प्रेक्षकांसमोर येण्यासाठी थांबू शकतो, पण डॉक्युमेण्ट्रीला कायमच प्रचंड घाई असते.’’ गेली पाच वर्षे हे वाक्य माझ्या डोक्यात मुरलेलं आहे.

डॉक्युमेण्ट्री हा प्रकार आधी माझ्या मनातही नव्हता. तो हळूहळू आयुष्यात विस्तारत राहिला. मुळात मला सिनेमाचं प्रचंड वेड. पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन अभ्यास विभागातून (प्रचलित अर्थाने मास कम्युनिकेशन) पदव्युत्तर शिक्षण घेऊन मी मुंबईला स्थायिक झालो. स्वप्न होतं की दिग्दर्शन क्षेत्रात काम करावं आणि एक दिवस स्वत:चा सिनेमा बनवावा. यात मी अनेक जाहिराती आणि टीव्हीच्या दैनंदिन मालिकांना साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करू लागलो. टीव्हीवरील ‘डेलीसोप’ तर असा भस्मासुर होता की ज्यात सर्व चमूने १८-१८ तास राबून एक एपिसोड बनवायचा आणि तो दुसऱ्या दिवशी अर्ध्या तासात प्रेक्षकांनी खाऊन फस्त केलेला असायचा. तिथल्या या घाई-घाईच्या वातावरणात काही केल्या माझं मन रमेना. अशातच एके दिवशी माझ्या एका परिचितांकडून ‘आम्हाला भारतातल्या निवडक सेवाभावी संस्थांच्या कामांवर १० लघुमाहितीपट बनवायचे आहेत, तू करू शकशील का?’ अशी विचारणा करण्यात आली. उत्तम अनुभव मिळेल या विचाराने मी लगेच होकार दिला. त्या १० पैकी एक डॉक्युमेंटरी होती सुंदरबनमध्ये काम करणाऱ्या एका सेवाभावी संस्थेवरची. तिने मला अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. २००९ मध्ये बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘आयला’ या चक्रीवादळामुळे सुंदरबनच्या परिसरातलं जीवनमान विस्कळीत झालं होतं. समुद्राचं खारं पाणी कित्येक किलोमीटर आत घुसल्यामुळे भातशेतीचं नुकसान तर झालंच, पण खाऱ्या पाण्यामुळे जमीनदेखील नापीक बनली होती. या संस्थेने अभ्यास करून १०० वर्षांपूर्वी इथला शेतकरी कुठल्या प्रकारचा तांदूळ पिकवायचा, जो खाऱ्या पाण्यातही तग धरू शकतो, पिकू शकतो हे शोधून काढलं. आधुनिक शेतीच्या पद्धतीमध्ये या प्रकारचा तांदूळ नामशेष झाला होता आणि इथला शेतकरी जास्त उत्पन्न देणाऱ्या इतर वाणाचा तांदूळ पिकवू लागला होता. त्या १०० वर्षं जुन्या वाणाचे बियाणे मिळवून तीन वर्षांत तिचे पुनरुज्जीवन करून तिथल्या शेतकऱ्यांना दिले गेले. वरवर पाहता याची ‘स्टोरीलाइन’ खूप सरळ सरळ होती. प्रत्यक्षात चित्रीकरणासाठी गेलो, तिथल्या लोकांचे अनुभव ऐकले तर ते अंगावर काटा आणणारे होते. मुळात त्या भागाची भौगोलिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. गंगा आणि ब्रह्मपुत्र नद्यांमधून जो गाळ येतो, त्याचीच इथं बेटं तयार होतात. याच बेटांवर हळूहळू हजारो लोकांची वस्ती होते. अशा बेटांच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायम ऐरणीवर. पाण्याच्या प्रवाहाबरोबर ती कधीही विलीन होऊ शकतात. तेव्हा तिथल्या संपूर्ण वस्तीला रातोरात विस्थापित व्हावं लागतं. या जोडीला गरिबी- उपासमारदेखील आहेच. मानवी तस्करीच्या गोष्टीही कानावर पडल्या. एखादं मूल विकून जर इतर पाच भावंडांची पोटं भरली जात असतील तर… बाप रे. ही सरळ वाटणारी कथा माझ्यासाठी अधिक जटिल बनली होती. फिक्शनल ऐवज हा लेखकाच्या टेबलवर तयार होतो आणि डॉक्युमेण्ट्री ही एडिटरच्या टेबलवर, हा एक महत्त्वाचा फरक जाणवला. तेव्हापासून मी शूटवर जाताना कोरी पाटी घेऊन जातो. माहित असतं की विषय काय आहे आणि मी काय बनवायला चाललोय; परंतु प्रत्यक्ष फिल्डवर काहीतरी वेगळं आणि अकल्पित असं समोर येतं. या शक्यतेसाठी मी जागा ठेवतो. त्यामुळे माझी गोष्ट ही एडिट टेबलवर तयार होते. अर्थात प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते; परंतु मला अशा प्रकारे गोष्ट शोधण्यात गंमत वाटते.

हेही वाचा – ‘लिटफेस्ट’च आता ग्रंथतारक…

u

गेल्या ११ वर्षांत पर्यावरणीय समस्या, मानव वन्यजीव संघर्ष अशा विषयांवरही मला काम करायला मिळालं. मध्य प्रदेशातल्या जंगलात संरक्षित व्याघ्रपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासी पाड्यांना भेट दिली. तिथल्या लोकांकडून त्यांचे अनुभव ऐकलं की आश्चर्यही वाटतं, की हे लोक कसे वाघांमध्ये राहू शकतात, तर कधी सकारात्मकही वाटतं की होय, मानवाने प्रयत्न केले तर अजूनही मानव आणि वन्यजीव यांच्यातलं सहअस्तित्व शक्य आहे.
मध्यंतरी छत्तीसगडच्या जंगली हत्तींवर डॉक्युमेण्ट्रीचं काम हाती घेतलं तेव्हा तेथील संस्थेकडून मिळालेलं फुटेज पाहिलं. त्यात काही फुटेज हे जंगली हत्तींनी मानवी वस्तीत घुसून केलेल्या हानीचं होतं. पडलेली घरं, मृत्युमुखी पडलेली माणसं अशी दृश्य संकलित करताना वारंवार पाहावं लागणं हे विचलित करणारं होतं. मुळात या जंगलातून त्या जंगलात सतत फिरत राहणं हत्तींचा गुणधर्म. अजस्र जीवांचा कळप जेव्हा जमिनीवरून चालतो तेव्हा परिसंस्थेचा समतोल राखण्यास मदत होते. आज जंगलांचा ऱ्हास होतो आहे आणि त्यांच्या वाटेत शेतं झाली, गावं वसली, घरं, पाडे उभे राहिले. हत्तींच्या जागा संपुष्टात आल्या. हत्ती गावात, शेतात घुसले की गावं आणि शेतं त्यांच्या वाटेत आली? घटना एकच आहे, हत्ती आणि मानवाचा संघर्ष आणि त्यात झालेली जीवितहानी. परंतु दृष्टिकोन हा प्रत्येक फिल्ममेकरचा वेगवेगळा असू शकतो. अनेकदा तो ठरवणं किंवा तठस्थ राहणं ही चित्रकर्त्यासाठी तारेवरची कसरत ठरते.

एक खूप गमतीशीर प्रसंग आठवतो. मध्य प्रदेशच्या जंगलात वसलेल्या एका गावात महिला पाण्याचं उत्तम व्यवस्थापन करत. बचत गटाच्या माध्यमातून गावातील सर्व महिलांना छोटे उद्याोग करण्यासाठी अर्थसाहाय्य होई. ग्रामपंचायतीमध्येही महिलांचा सहभाग जास्त. खूप गोड गोष्ट होती या गावाची. मला त्या फिल्मसाठी त्यांच्यातल्या एका महिलेची मुलाखत हवी होती. मी विचारलं, यांच्यापैकी प्रकल्पाबद्दल कोण छान बोलू शकेल? तर ५५-६० वर्षांची काटक महिला पुढे आली. कॅमेरासमोर बोलताना अनेक जण बुजतात असा माझा अनुभव आहे म्हणून तिथल्या कार्यकर्त्याला मी विचारलं ‘‘या नक्की बोलू शकतील ना?’’ यावर ती महिला स्वत:च म्हणाली ‘‘अरे भैय्या, मैं तो सोनिया गांधी के सामने प्रेझेंटेशन दे चुकी हूँ, आप क्या बात कर रहे हो?’’ यावर आम्ही सगळेच खूप हसलो. खरंच तिने एकदा असं सादरीकरण केलं होतं. कॉर्पोरेट क्षेत्रात उच्च पदावर काम करणाऱ्या माझ्या एखाद्या मैत्रिणीत जो आत्मविश्वास दिसतो, अगदी तेवढाच आत्मविश्वास मला त्या महिलेमध्ये दिसला. डॉक्युमेण्ट्रीच्या कामामुळे अनेक लोक भेटले आणि त्यांच्या भिन्न कथा सापडल्या. कधी वेश्यावस्तीतल्या लहान मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांशी गप्पा मारता आल्या, देशी दारू गाळणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसायात बदल करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपडणारे तरुण उमजले, प्रतिकूल परिस्थितीत आदिवासी भागात वैद्याकीय सेवा पुरविणारे कार्यकर्तेदेखील कळले, तर कुठे आपल्याच गावाचा पाण्याचा प्रश्न सोडविणारे सर्वसामान्य गावकरी दिसले. सगळेच आपापल्या कथेचे नायक-नायिका.

हेही वाचा – ‘पुणे पुस्तक महोत्सव’ का गाजला?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कधी कधी मला लोक विचारतात, ‘‘अच्छा, डॉक्युमेण्ट्री करताय? काय विषय काय आहे? कुठल्या समस्येवर आधारित आहे?’ अनेक डॉक्युमेण्ट्री फिल्ममेकर्सना असं बोलताना ऐकलंय, डॉक्युमेण्ट्री म्हणजे कुठल्या तरी समस्येवरच आधारित असते हा एक ढोबळ समज अनेकांचा असतो. एक महत्त्वाची बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की, माहितीपटामधूनही आपण आपल्या प्रेक्षकांना गोष्टच सांगणार असतो. अशी गोष्ट जी काल्पनिक नाही आणि तिला सत्याची जोड आहे. त्यामुळे समस्येपेक्षा जास्त तुम्हाला त्या विषयात ‘गोष्ट दिसतीये का?’ हे तपासून पाहणं गरजेचं आहे. एखादी समस्या हा डॉक्युमेण्ट्रीसाठी केवळ निर्मितीबिंदू असू शकतो. पण त्यात गोष्टीचा अभाव असेल तर डॉक्युमेण्ट्री निरस होत जाते, त्यातली रंजकता संपते आणि प्रेक्षक त्यापासून दुरावतो.