हिंदूंना मुस्लिमांशी लढण्यास लावणारे सरकार भारताला नको असल्याचे मत व्यक्त करून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी भाजपवर अप्रत्यक्ष हल्ला चढविला. केंद्रात गरिबांचे समर्थक असलेले धर्मनिरपेक्ष सरकारच हवे, असेही ते म्हणाले.
या लोकसभा निवडणुका असून स्थानिक तामिळी पक्ष दिल्लीत सरकार स्थापन करू शकणार नाहीत. त्यामुळे गरिबांचे समर्थक आणि धर्मनिरपेक्ष सरकार दिल्लीत येईल, याची काळजी मतदारांनी घ्यावी, असेही राहुल गांधी यांनी येथे निवडणूक सभेत सांगितले.
जे सरकार एकमेकांमध्ये वैरभाव वाढवेल असे सरकार आपल्याला नको आहे, हिंदूंना मुस्लिमांशी लढण्यास लावणारे सरकार आपल्याला नको आहे. त्याचप्रमाणे एका राज्याच्या कल्पना दुसऱ्या राज्यांवर लादणाऱ्या सरकारचीही आपल्याला गरज नाही, असेही ते म्हणाले.
तामिळनाडूत काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह यावा यासाठी राहुल गांधी यांनी, पक्षाला स्वबळावर निवडणूक लढण्यातच आनंद असल्याने कोणतीही तडजोड करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. श्रीलंकेतील तामिळींच्या प्रश्नावर द्रमुक २०१३ मध्ये यूपीए आघाडीतून बाहेर पडला.
काँग्रेस पक्ष केवळ लोकसभेच्या या निवडणुकीपुरताच मर्यादित नाही तर भविष्यात राज्यात होणाऱ्या निवडणुकीतही लढा देऊन पक्ष सत्तेवर येईल, असेही राहुल गांधी म्हणाले.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी गुजरात विकासाच्या प्रारूपाच्या गप्पा मारतात, मात्र त्यांनी तामिळनाडूतील विकास पाहावा. तामिळी जनता किती सक्षम आहे हे तामिळनाडूने केवळ भारतालाच नव्हे तर अवघ्या जगाला दाखवून दिले आहे. मोदी गुजरातच्या गप्पा मारतात, त्यांनी येथे येऊन पाहावे, असेही गांधी म्हणाले.