आम आदमी पक्षाचे समन्वयक नेते अरविंद केजरीवाल यांनी प्रा. योगेंद्र यादव यांना झुकते माप दिल्याने आता मनीष सिसोदिया नाराज झाले आहेत. पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीच्या (पीएसी) बैठकीत होणारे निर्णय एकतर्फी असल्याची टीका करीत यादव यांनी राजीनामा सादर केला होता. पक्षांतर्गत निर्णयांचे जाहीर वाभाडे काढणे बंद करा, अशा शब्दात सिसोदिया यांनी यादव यांची कानउघडणी केली होती. पक्षातून यादव यांची गच्छंती अटळ मानली जात होती. तसे संकेत खुद्द सिसोदिया यांनी शुक्रवारी दिले होते. प्रत्यक्षात केजरीवाल यांनी यादव यांची भेट घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सिसोदिया यांच्याऐवजी यादव यांचे महत्त्व वाढले आहे. यादव व केजरीवाल यांच्यात तासाभरापेक्षाही जास्त वेळ चर्चा झाली. चर्चेनंतर केलेल्या ट्विटमध्ये केजरीवाल यांनी म्हटले आहे की, योगेंद्र यादव यांनी अनेक महत्त्वाचे विषय उपस्थित केले आहेत. आम्ही एकत्रित त्याच्यावर काम करू. योगेंद्र यादव हे माझे अतिशय जवळचे मित्र व तत्त्वनिष्ठ सहकारी आहेत. बैठकीचा तपशील सांगण्यास उभय नेते नकार देत असले तरी सिसोदिया यांचा अरेरावीपणा पसंत नसल्याचे यादव यांनी सांगितल्याचे समजते.
काही दिवसांपूर्वी शाजिया इल्मी यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनाही पक्षात परत आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत इल्मी व यादव यांना परत आणण्याचा प्रस्ताव मांडण्यात येण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षाचे सर्व निर्णय केजरीवाल घेतात. त्यांच्या अनुपस्थितीत सिसोदिया यांच्या हाती पक्षाची सूत्रे असतात. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्यात केजरीवाल यांना जामीन घेण्याचा सल्ला यादव यांनी दिला होता. मात्र ऐनवेळी सिसोदिया यांच्या सांगण्यावरून केजरीवाल यांनी तो बदलला. सिसोदिया व यादव यांच्यातील मतभेदांचे हेदेखील एक कारण मानले
जाते.
पुन्हा एकदा ‘वीज’कारण!
दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी वीज दरवाढीवरून तत्कालीन काँग्रेस सरकारविरोधात रस्त्यावर उतरणारे आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा भाजपविरोधात विजेचे अस्त्र उपसले आहे. उत्तर भारतात उष्णतेची लाट आल्याने विजेची मागणी मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे दिल्लीच्या काही भागांत गेल्या अनेक दिवसांपासून अनिश्चित भारनियमन केले जाते. त्याविरोधात आंदोलन छेडण्याची रणनीती केजरीवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी आखली आहे. तसे संकेत केजरीवाल यांनी ट्विटवरून दिले आहेत. बडा गाजावाजा करून लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात दाखल झालेल्या आम आदमी पक्षाचे कवित्व प्रत्यक्ष निकालानंतर संपले. त्यातच पक्षांतर्गत मतभेद चव्हाटय़ावर आले. एकीकडे पक्षात फूट पडत असताना सामान्य नागरिकांनीदेखील आपकडे पाठ फिरवली. त्यामुळे केजरीवाल यांनी पुन्हा एकदा दिल्लीकरांचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या वीज समस्येला हात घातला आहे. दिल्लीच्या अनेक भागांमध्ये वीज नाही. भाजपने यावर स्पष्टीकरण द्यावे व तातडीने उपाययोजना करावी, असा जणू आदेशच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे. अर्थात भाजपने केजरीवाल यांच्या ट्विटची दखल घेतली नाही. गतवर्षी डिसेंबरमध्ये केजरीवाल यांनी स्वत: सरकारने तोडलेली वीज कनेक्शन जोडली होती. तेव्हापासून ते दिल्लीकरांचे जणू मसिहा बनले होते. तोच कित्ता आताही गिरवण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत गमावलेला जनाधार परत मिळवण्यासाठी केजरीवाल यांनी विजेचा आसरा घेण्याचे ठरवले आहे.
केजरीवालांचे यादवांना झुकते माप
आम आदमी पक्षाचे समन्वयक नेते अरविंद केजरीवाल यांनी प्रा. योगेंद्र यादव यांना झुकते माप दिल्याने आता मनीष सिसोदिया नाराज झाले आहेत.
First published on: 08-06-2014 at 02:00 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kejriwal reaches out to yogendra yadav says will try to get shazia ilmi back