धुळे शहरापासून हाकेच्या अंतरावर आणि मुंबई- आग्रा महामार्गालगत असलेले नगाव, ता. जि. धुळे येथील शेतकरी चिंधा आत्माराम पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात, पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत आणि शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय करत सर्वाना प्रेरक ठरेल अशी प्रगती केली आहे. त्यांचा राज्य शासनाच्या कृषी विभागाने नुकताच वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

धुळे शहर व नगाव या दोन्ही गावातील अंतर अवघे सहा किलोमीटर आहे. धुळे शहरापासून उत्तरेला नगाव बारीची टेकडी ओलांडली की उजव्या हाताचा रस्ता थेट चिंधा पाटील यांच्या शेतापर्यंत जातो. या शेतात सध्या त्यांनी कपाशी, ज्वारी, मका, मूरघासचा पेरा केला आहे. या शेताच्याच एका कोपऱ्यात गोठा आहे. या गोठय़ात दहा ते बारा जर्सी व हॉलिस्टन गायी व तेवढय़ाच दुभत्या म्हशी बांधलेल्या दिसून येतात. याच दुग्ध व्यवसायातून पाटील यांनी प्रगती साधली आहे. सध्या म्हशीचे दूध १०० ते १२५ लिटर, तर गायीचे ८० ते १०० लिटर दूध ते वसुंधरा सेंटर, बलसाड (गुजरात) येथे पाठवित आहेत. म्हशीच्या दुधाचा दर ४८ ते ५० रुपये, तर गायीच्या दुधाचा प्रति लिटर २४ ते २८ रुपये आहे.

पाटील यांच्याकडे एकूण ४२ एकर क्षेत्र आहे. या क्षेत्रात तीन विहिरी खोदलेल्या आहेत. दहा वर्षांपूर्वी शेतात १०० बाय १०० फूट आकाराचे शेततळे बांधले. तेव्हापासून त्यांनी शेतीत बदलाला सुरुवात केली. या शेततळ्यासाठी राज्य शासनाने त्यांना ८२ हजार रुपयांचे अनुदान दिले. याशिवाय कांदा चाळीसाठी ८४ हजार रुपये, तर मूरघास चाळीसाठी १ लाख १५ हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. आता कुक्कुटपालन शेड बांधणीसाठी पाटील यांना १ लाख १२ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. या शेडमध्ये १ हजार पक्ष्यांचे पालन होऊ शकणार आहे. तसेच विविध यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी पाटील यांना अनुदान मिळाले आहे.

शेतीत शेतीचे नवनवीन प्रयोग पाटील करतात. मात्र, त्यांचा सर्वाधिक भर राहिला आहे तो सेंद्रीय शेतीवर. त्यासाठी त्यांना पशुपालनाचा व्यवसाय पूरक ठरला आहे. या पशुपालनातून त्यांना वर्षांला दर्जेदार असे शंभर ते सव्वाशे ट्रॅक्टर खत मिळते. या खतामुळे शेतजमीन सुपीक होण्यास मदत होते. या वर्षी त्यांनी शेतात १२५ ट्रॅक्टर शेणखत टाकले. पाटील यांनी गेल्यावर्षी तीन एकर क्षेत्रातून पपईचे किमान सहा लाख रुपयांचे उत्पादन घेतले, तर कापसाचे ३०० क्विंटल, तर कांद्याचे ४०० क्विंटल उत्पादन घेतले. कपाशीसह विविध पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. पाटील यांना शेतीसाठी त्यांची मुले सतीश, विजय, संदीप मदत करतात. त्यापकी सतीश व विजय हे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर शेतीतच रमले, तर लहान संदीप हा एका कॉर्पोरेट बँकेच्या धुळे येथील शाखेत कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहे. पाटील आजही दुग्ध व्यवसाय करतात. त्यांना सतीश व विजय हे मदत करतात. तसेच पाटील शंभर एकर शेती भाडेतत्त्वाने करतात. या शेतीत मात्र ते जनावरांसाठी चारा पिके प्रामुख्याने घेतात. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. मात्र, नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात त्यांनी आघाडी घेतली आहे. गोठा परिसरात त्यांनी सौर पथदिवे बसविले आहेत. सेंद्रीय शेतीची कास धरीत आणि शेतीला पशुपालन व दुग्ध व्यवसायाची जोड देत त्यांनी प्रगती साधली आहे. शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच पशुपालन, दुग्ध व्यवसाय किंवा शेळी पालन केल्यास जास्त उत्पादन घेऊ शकतो, असा विश्वास ते व्यक्त करतात.

(लेखक जिल्हा माहिती कार्यालय, धुळे येथे माहिती साहाय्यक म्हणून कार्यरत आहेत.)

diodhule2016@gmail.com