News Flash

फळप्रक्रिया उद्योगाकडून सेंद्रिय शेतीकडे

चिकाटीने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत इंग्रजी विषयात बी. ए.ची पदवी संपादन केली.

शेतीकडून फळ प्रक्रिया उद्योगाकडे व या उद्योगातील यशानंतर पुन्हा सेंद्रिय शेतीकडे झालेला विठ्ठल पाडेकर या शेतकऱ्याचा प्रवास थक्क करणारा तेवढाच इतरांसाठी प्रेरणादायी आहे. वयाच्या ६५व्या वर्षी ते स्वप्न पाहतायेत ते शंभर एकरावर सेंद्रिय पद्धतीने फळबाग उभारणीचे. सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्यांना एकत्र करून परदेशात शेतीमाल पाठविण्याचे. त्यासाठी आवश्यक ती सुविधा उपलब्ध करण्याचे.

विठ्ठल सहादू पाडेकर यांचा जन्म अकोले (जि. अहमदनगर) तालुक्यातील बहिरवाडी या छोटय़ाशा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल. गावात शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते संगमनेर येथे दाखल झाले. चिकाटीने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत इंग्रजी विषयात बी. ए.ची पदवी संपादन केली. महाविद्यालयात शिकत असतानाच सामाजिक कामातील सहभागामुळे मुंबई विद्यापीठाच्या एका प्रकल्पासाठी त्यांची निवड झाली. तेथूनच पुढे ‘अ‍ॅकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट सायन्स’ या विश्वस्त संस्थेशी त्यांचा संबंध आला. या ट्रस्टमार्फत कर्जत (जि. रायगड) तालुक्यातील कशेळे या गावात विविध उपक्रम राबविले जात होते. या कार्यात ते सहभागी झाले. २०-२२ वष्रे त्यांनी तेथे काढली. सभोवताली दाट जंगल, आदिवासींचे पाडे, स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून रोजगार निर्मिती आणि स्थानिकांचे सक्षमीकरण यासाठी तेथे विविध उपक्रम राबविले जात असत. त्यात बांबूकाम, औषधी वनस्पतींचे जतन, संवर्धन, सुतारकाम, लोहारकाम आदी उपक्रम राबविले जात. त्यातील फळ प्रक्रिया उद्योगाचे ते प्रमुख झाले. बी. ए. झालेल्या पाडेकरांनी मग म्हैसूर येथे जाऊन फूड टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले आणि आपले काम सुरू केले. या ठिकाणी काम करतानाच विविध प्रशिक्षणांच्या निमित्ताने जपान, हॉलंड, श्रीलंका, पोलंड यांसारख्या देशांमध्ये अभ्यास दौरे केले. या ठिकाणीच त्यांनी सुका मोरावळा तयार केला, त्याला ‘आवळा कॅन्डी’ हे नाव दिले. कॅन्डी म्हणजे स्टिक, पण आवळा राउंड असतो तरीही मी हे नाव दिले असे ते सांगतात. ही ३५ वर्षांपूर्वीची गोष्ट, त्या अर्थाने ते आवळा कॅन्डीचे जनकच होत.

२०-२२ वष्रे सामाजिक काम केल्यानंतर त्यांनी दोन-तीन वष्रे शेती केली, पण त्यात त्यांचे मन रमले नाही, हे आपले काम नव्हे हे त्यांना उमगले. मग त्यांनी स्वतच्या तांत्रिक ज्ञानाचा उपयोग शेतीसाठी करण्याचा निर्णय घेतला. बहिरवाडीतच व्ही. पी. फूड्स या नावाने आवळा प्रक्रिया उद्योगास सुरुवात केली. तांत्रिक ज्ञान असले तरी विविध कारणांमुळे प्रारंभीच्या काळात त्यांना बराच संघर्ष करावा लागला. प्रारंभी उद्योगाची क्षमता दहा टन होती, शेतातील घरातच हा उद्योग सुरू केला. एक-दोन टनांपासून सुरू झालेला उद्योग वाढत गेला. गुणवत्तेमुळे बाजारपेठ मिळत गेली, सुरुवातीच्या काळात दळणवळण, संपर्क यासारख्या अडचणींना तोंड द्यावे लागले. वाहतुकीच्याही अडचणी होत्या पण तरीही हळूहळू उत्पादन वाढत होते. येथील जागा अपुरी पडायला लागल्यामुळे सहा वर्षांनंतर म्हणजे २००६मध्ये त्यांनी अकोले येथे येण्याचा निर्णय घेतला. अकोलेपासून जवळच एक एकर क्षेत्रावर सुमारे १२ ते १५ हजार चौरस फुटाच्या इमारतीत हा उद्योग आता स्थलांतरित झाला आहे. दरम्यानच्या काळात कंपनीचे प्रा. लि. कंपनीत रूपांतर करण्यात आले, आज या उद्योगाची वार्षकि क्षमता ३०० टन आवळ्यांवर प्रक्रिया करण्याची आहे. जयपूर (राजस्थान) येथून मुख्यत आवळा खरेदी केला जातो. डिसेंबर ते फेब्रुवारी हा आवळ्याचा हंगाम, तेव्हा खरेदी केलेला आवळा प्रक्रिया करून साठवला जातो, वर्षभर तो विविध कारणांसाठी वापरला जातो. आज त्यांच्या कारखान्यात आवळ्याचे चार प्रकारचे ज्यूस,  तीन प्रकारची सरबते, आवळा कॅन्डी, चटनी, लोणचे, मोर आवळा आदी तयार केले जाते. विशेष म्हणजे या सर्वासाठी आवश्यक असणारे तांत्रिक ज्ञान त्यांचे स्वतचेच आहे. आज भारतातील सर्व प्रमुख शहरांमध्ये श्रीनगरपासून कन्याकुमारीपर्यंत व्ही. पी. फूड्सची उत्पादने उपलब्ध आहेत. राजेश आणि ऋषी ही त्यांची दोन्ही मुले आता कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहतात.

आवळा प्रक्रिया उद्योगात स्थिरावल्यानंतर पाडेकर यांनी आता ध्यास घेतला आहे एका परिपूर्ण ऑर्गॅनिक फार्मच्या निर्मितीचा. फळ प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक कच्चा माल आपणच सेंद्रिय पद्धतीने निर्माण करायचा हा त्यांचा यामागचा उद्देश. अकोलेपासून १५ ते १६ किमी अंतरावर असणाऱ्या मुथाळणे या खेडय़ात त्यांनी डोंगरपठारावर ८० – ८५ एकर जमीन खरेदी केली आहे. मुथाळणे या गावात उन्हाळ्यात मार्चनंतर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. टँकरने पाणी पुरवावे लागते. घेतलेली जमीनही ३०-३५ वष्रे पडीक असणारी, त्यात सर्वत्र विखुरलेले लहान-मोठे दगडगोटे. पण आज त्याच डोंगरपठारावर हजारो झाडे शिस्तीत उभी असलेली दिसतात.

उन्हाळ्यात टंचाई असली तरी पावसाळ्यात या भागात चांगला पाऊस पडतो. अनेक लहानमोठे ओढे तीन-साडेतीन महिने वाहत असतात. गावाजवळून वाहणाऱ्या एका ओढय़ावर पाडेकर यांनी स्वखर्चाने पाझर तलाव तयार केला. गतवर्षी झालेल्या पावसामुळे तलाव फुटण्याची भीती निर्माण झाली होती. ७०-७५ फूट उंचीच्या या तलावासाठी ५० फूट पाया घेतलेला आहे. या तलावाचे पाणी आत दोन-तीन टप्प्यांत उचलले जाते. पठारावर अडीच आणि तीन कोटी लिटर क्षमतेचे दोन शेततळे तयार करण्यात आलेले आहेत. तिसऱ्या साडे-तीन ते चार कोटी लिटरच्या तळ्याचे काम सुरू आहे.

जमिनीत संपूर्ण ८०-८५ एकर क्षेत्राभोवती १ मीटर रुंदीचा आणि तेवढय़ाच उंचीची संरक्षक िभत उभारण्यात आली. पाण्याची सोय झाल्यानंतर गतवर्षी जेसीबीच्या साहाय्याने खड्डे खोदून झाडे लावण्यात आली. नरेंद्र ७ या जातीच्या आवळ्याची स्वतच तयार केलेली चार हजार रोपे, तीन प्रकारच्या जातीची सीताफळाची बाराशे झाडे, रत्ना-निलम – केशरसह हापूस, तोतापुरी आदी जातींची चार हजार आंब्याची रोपे, कागदी िलबाची बाराशे रोपे, शेवग्याची एक हजार रोपे लावण्यात आली. त्याशिवाय सभोवताली कडुिनब, पळस, शिसव, बांबू, सिल्व्हर ओक, जांभूळ यांसारखी झाडे लावलेली आहेत. विशेष म्हणजे बांधावर रत्नागिरीहून आणलेली दोनशे करवंदाची रोपेही लावली गेली. त्याशिवाय चिक्कू, मोसंबी, काजू, फणस, अंजीर यासारखी फळझाडेही आहेत. या सर्व झाडांना ठिबक सिंचनने पाणी दिले जाते. त्याशिवाय शेण, गोमुत्र, दही, गूळ, माती, डाळीचे पीठ यापासून तयार केलेले जीवामृत ठिबकसिंचनातून दिले जाते. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा निर्माण केलेल्या आहेत. कोणतेही रासायनिक खत अथवा कीटकनाशक वापरायचे नाही हा त्यांचा निर्धार आहे. झाडांच्यामध्ये सोयाबीन, सूर्यफूल, जवस, हुलगा, मठ, मूग, खुरासणी, तीळ यांचा पेरा केलेला आहे. सोयाबीन वगळता त्या सर्वासाठी गावठी वाणाचा वापर केला आहे. झाडांच्या दोन रांगांमध्ये उगवलेले गवत कापून झाडाभोवती गवताचे ‘मंचिंग’ म्हणून उपयोगात आणले जाते. पावसाळ्यात हेच गवत सडून त्याचे शेण होते.

या वर्षी  डाळींबाचे अडीच हजार, चंदनाची पंधराशे आणि कडुिनब, बांबू, सिल्व्हर ओक, गावठी सिताफळ, माला डुबिया आदी तीन हजार झाडांची लागवड करण्यात येत आहे. टोमॅटो किंवा द्राक्षासारखी पिके आवश्यक सुविधा उपलब्ध असूनही घेण्याचे त्यांनी जाणीवपूर्वक टाळले, कारण या फळबागांच्या लागवडीतून तेथे एक फळझाडांचे वन तयार व्हावे, हा उद्देश आहे. या ऑर्गॅनिक फार्ममध्येच गीरगाई आणून गोपालन, मत्स्त्यपालन तसेच मधुमक्षिका पालन हेही उपक्रम राबविले जाणार आहेत. सेंद्रिय शेतीमालाला बाजारपेठ मिळण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज असल्याचे पाडेकर सांगतात. अमेरिका, युरोप या देशांची कृषिमालविषयक मानके अतिशय कडक स्वरूपाची आहेत. ती लक्षात घेऊन तसेच जगात कोणत्या शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध आहे, याचा विचार करून पिके घेतली पाहिजेत, असे ते म्हणतात. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित फळांवर प्रक्रिया करून तो माल जगाच्या बाजारपेठेत नेण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

prakashtakalkar11@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 1:33 am

Web Title: fruit processing organic farming industry
Next Stories
1 मनुष्यबळविरहित भातशेतीच्या दिशेने..
2 सेंद्रिय शेतीचा आगळा प्रयोग
3 ..हवे घामाचे दाम
Just Now!
X