थंडीचे दिवस सुरू झाले की बाजारात पेरू दिसायला लागतात. सध्या पेरूचाच हंगाम आहे. स्थानिक पेरूंबरोबर बऱ्याच जाती आपल्याला दिसतात, पण यात आणखी एका पेरूची जात लोकांना आकर्षति करीत आहे, ती म्हणजे रायपूर जातीचा पेरू! दिसायला मोठा किलो-दीड किलोचा पेरू पाहून लोक अचंबित होतात. कमीत कमी एक किलो वजन.. बिया कमी आणि जास्त गर.. असा हा रायपूर पेरू सध्या लक्ष वेधून घेत आहे. शहरात विविध फळविक्रेत्यांकडे हा पेरू सध्या विक्रीला आहे. हा पेरू केवळ आकर्षणाचा भाग राहिला नाही तर त्याची विक्रीही धूमधडाक्यात होत असल्याचे विविध बाजारांतल्या अंदाजावरून दिसून येते. मुंबई, पुण्याचा बाजार असो किंवा जळगावचा बाजार असो! अगदी सातारा-कोल्हापूर बाजारातही हा पेरू दाखल झाला आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी या पेरूची लागवड अगदी मनावर घेतल्याने महाराष्ट्रात या रायपूर पेरूच्या जातीचे क्षेत्र वाढत आहे.

राज्यातल्या विविध भागांत या पेरूची लागवड होऊ लागली आहे. पुणे, बारामती, कोल्हापूर, सातारा, जळगाव आदी भागांत या पेरूच्या बागा दिसतात. कोरेगाव-भीमाजवळच्या सणसवाडी औद्योगिक परिसरात काही तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन

१८ एकरांत या पेरूची लागवड केली आहे. नवनाथ भुजबळ, अनिल दरेकर, मिच्छद्र हरगुडे यांनी आपल्या १८ एकर क्षेत्रात या रायपूर पेरूची आधुनिकरीत्या सेंद्रिय पद्धतीने लागवड करून बाग उभी केली आहे. १८ महिन्यांतच तब्बल १ किलोचा एक पेरू पिकविल्याने परिसरात या पेरूंना मोठी मागणी आहे. या १८ एकर क्षेत्रात तब्बल ८ हजार रोपांची लागवड त्यांनी एप्रिल २०१५ मध्ये केली आहे. लागवडीनंतर या झाडाला १८ महिन्यांनंतर फळे येतात. बागेतील पेरूला सुमारे एक किलोपेक्षा मोठी फळे आलेली आहेत.

जळगाव तालुक्यातील पिलखेडा येथील किशोर चौधरी या शेतकऱ्याच्या शेतातील एक एक पेरू हा एक ते दीड किलोचा आहे. चवीला चांगला असल्याने निर्यातीस योग्य असलेल्या या पेरूला मुंबई-पुण्यातही मागणी वाढली आहे. जिल्ह्य़ात आज ६५० हेक्टरमध्ये पेरूची लागवड झाली आहे. चाळीसगाव तालुक्यातील बहाळ तसेच पाचोरा, भडगाव तालुक्यातील शेतकरी पेरूच्या नवीन जातींचा शोध घेत आहेत. पिलखेडा येथील किशोर चौधरी यांनी आपल्या शेतात तीन एकरांमध्ये छत्तीसगड येथील व्हीएनआर या जातीच्या पेरू रोपांची लागवड केली.

या पेरूची लागवड केलेल्या हरियाणाच्या जिंद जिल्ह्य़ातील संगतपूर गावातील नीरज धांडा या एका अभियंत्याच्या यशाची कथा सध्या गाजत आहे. गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्याने पेरूची लागवड करून चांगले उत्पन्न मिळविले.