महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी फेरपरीक्षेचा निकाल २९ ऑगस्ट रोी जाहीर होणार आहे. दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये यासाठी निकाल जाहीर झाल्यानंतर महिन्याभराच्या अवधीत फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय शासानानं घेतला होता. त्यामुळे अनुत्तीर्णांची फेरपरीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा १७ जुलै रोजी सुरु झाली होती. या विद्यार्थ्यांचा निकाल बुधवारी (२९ ऑगस्ट) दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. http://www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकाल जाहीर केला जाणार आहे. संकेतस्थळावर विषयनिहाय गुण उपलब्ध होतील. त्याची विद्यार्थ्यांना प्रिंटआऊट घेता येईल.

फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सप्टेंबरपासून पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येऊ शकणार आहे. फेरपरीक्षेतही अनुत्तीर्ण झालेल्यांना मार्चमध्ये पुन्हा परीक्षा देता येईल अथवा त्यांचे व्यक्तिगत करिअर कौन्सिलिंग केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ मंडळांमार्फत जुलै २०१८ मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. मात्र विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गुणपत्रिका कधी मिळणार याबाबत अद्याप काहीही सांगितले नाही.