पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावातील घटना

सांगली : कृष्णा नदीत पोहण्यास गेलेल्या मुलावर मगरीने हल्ला करत त्याला खोल पात्रात ओढून नेण्याची घटना पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावी आज दुपारी घडली. या हल्ल्यानंतर हा मुलगा बेपत्ता झाला असून सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध लागलेला नव्हता. सागर सिद्ध ढग (वय १५) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे.

मुळचा कर्नाटकात राहणारा सागर सुटीसाठी मामाच्या ब्रह्मनाळ गावी आला होता. आज दुपारी तो गावाजवळील कृष्णेत पोहण्यासाठी गेला असता त्याच्यावर मगरीने हल्ला केला. त्याच्यावर हल्ला होताच त्याने केलेल्या आरडाओरडय़ामुळे काठावरील नागरिकांना ही घटना समजली. त्यांनी लगेचच त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. परंतु मगरीने सागरला नदीच्या खोल पात्रात ओढून नेल्याने तो सापडू शकला नाही. दरम्यान गावक ऱ्यांनी काही नावाडी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने लगेचच शोधमोहीम सुरू केली. पण सायंकाळी उशिरापर्यंत सागरचा शोध लागला नाही.

सांगली जिल्ह्य़ातून वाहणाऱ्या कृष्णा नदीमध्ये मगरींचा मोठा वावर आहे. गेल्या काही दिवसांपासून या मगरींच्या हल्ल्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. सांगली शहरानजीकही काही दिवसांपूर्वी पोहणाऱ्यांच्या जवळ एका मगरीने येत हल्ल्याचा प्रयत्न केला होता. आजच्या या घटनेने कृष्णा काठ पुन्हा एकदा हादरला आहे.