महाराष्ट्रात करोनाचे १५७६ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर करोनामुळे ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला २१ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर ६ हजार ४५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन महाराष्ट्रात १०६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत करोनाची लागण झालेल्या महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या २९ हजार १०० इतकी झाली आहे. आज ५०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज राज्यात ४९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये मुंबईत ३४, पुण्यात ६, अकोल्यात २, कल्याण डोंबिवलीत २, धुळ्यात २, पनवेलमध्ये १, जळगावमध्ये १ तर औरंगाबादमध्ये १ मृत्यूची नोंद झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २९ महिला तर २० पुरुष आहेत. आज झालेल्या ४९ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे २२ रुग्ण होते. तर ४० ते ५९ वर्षे वयोगटातले २३ रुग्ण होते. मृत्यू झालेल्या ४९ रुग्णांपैकी ३२ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. करोनाची लागण झाल्याने राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १०६८ झाली आहे.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या २ लाख ५० हजार ४३६ नमुन्यांपैकी २ लाख २१ हजार ३३६ जणांचे नमुने करोनासाठी निगेटिव्ह आले आहेत. तर २९ हजार १०० जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख २९ हजार ३०२ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर १६ हजार ३०६ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.