वसई-विरारमध्ये पाच हजार वीजजोडण्या खंडित

कल्पेश भोईर , लोकसत्ता

वसई : करोना कालावधीमध्ये थकीत राहिलेल्या वीज देयकांच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने सुरुवात केली आहे. परंतु अजूनही काही वीज ग्राहक वीज देयके भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत वसई-विरारमध्ये पाच हजार १७९  वीज जोडण्या खंडित केल्या आहेत.

वसई- विरार शहरात महावितरणच्या वसई विभागातर्फे शहरातील विविध ठिकाणी वीजपुरवठा केला जात आहे. यामध्ये घरगुती, औद्योगिक, कृषी, व्यावसायिक अशा नऊ लाखांहून अधिक वीज ग्राहकांना पुरवठा होतो. परंतु मागील वर्षी निर्माण झालेल्या करोनाच्या संकटामुळे महावितरणची मीटर वाचन न करणे व इतर सर्वच कामे ठप्प झाली होती. त्यानंतर शिथिलता मिळताच महावितरण विभागाने वीज देयके देण्यास सुरुवात केली होती.

ही सरासरी वीज देयके अधिक रकमेची असल्याने वीज देयके भरण्यास अनेक वीज ग्राहकांनी असमर्थता दाखविली आहे. बहुतांश ग्राहकांनी महावितरणची वीज देयके अजूनही भरली नाहीत. त्यामुळे वसई- विरार विभागातील आतापर्यंत २९१.६२ कोटींची रुपयांची वीज देयके थकीत राहिली आहेत. याचा मोठा आर्थिक फटका महावितरण विभागाला बसला आहे.

ग्राहकांनी विजदेयके भरण्यासाठी पुढे यावे यासाठी महावितरण विभागाकडून ग्राहकांना आर्जव व विनंत्या करण्यात आल्या होत्या. तर मोठय़ा रकमेचे थकबाकीदार आहेत त्यांना नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या.

मात्र तरी देखील काही थकबाकीदार वीज देयके भरण्यास पुढे येत नसल्याने महावितरण विभागाने अशा वीज ग्राहकांच्या वीज जोडण्या खंडित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. १ फेब्रुवारीपासून ते १४ फेब्रुवारी यादरम्यान वसई विभागातून २ हजार २९३  यामध्ये ४३० वीजजोडण्या कायमस्वरूपी खंडित तर १ हजार ८६३ तात्पुरता खंडित केल्या आहेत. तर विरार विभागातून २ हजार ८८६ वीजजोडण्या खंडित केल्या आहेत. यामध्ये ३५६ कायमस्वरूपी तर २ हजार ५३० तात्पुरत्या स्वरूपात वीजजोडण्या खंडित केल्या असल्याची माहिती महावितरण विभागाकडून देण्यात आली आहे.

वीज समस्या निवारणासाठी मदत केंद्र

वीज ग्राहकांनी वीज देयके भरून महावितरण विभागाला सहकार्य करावे अशी विनंती महावितरण विभागाकडून करण्यात येत आहे. ज्या वीज ग्राहकांना वीज देयकांबद्दलची समस्या आहे.त्याचे निवारण करण्यासाठी आतापर्यंत महावितरणने १४  वेबिनार, ६६ मेळावे, ६१ ग्राहक मदत केंद्रे त्यातील ३४ केंद्रे अजूनही सुरू आहेत. तर दुसरीकडे टप्प्याटप्प्याने ही वीज देयके भरण्याची मुभा उपलब्ध करून दिली आहे.

नोटिसा देऊनही थकबाकीदार वीज देयके भरण्यास पुढे येत नाहीत. अशा वीज ग्राहकांचा वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार वीजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत जवळपास पाच हजार वीज जोडण्या खंडित केल्या आहेत. हे काम अजूनही सुरूच आहे.

— अशोक होलमुखे, कार्यकारी अभियंता महावितरण विभाग वसई

कारवाई      वसई विभाग

कायमस्वरूपी          ४३०

तात्पुरता               १,८६३

विरार विभाग

कायमस्वरूपी —        ३५६

तात्पुरता—           २,५३०

एकूण —             ५ ,१७९