औद्योगिकीकरणासाठी संपादित केलेला भूखंड उद्योगासाठी वापरला गेला पाहिजे आणि विहित मुदतीत उद्योग उभारून रोजगारनिर्मिती झाली पाहिजे हे शासनाचे धोरण आहे. यासाठी औद्योगिक वसाहतीत विनावापर पडून असलेले भूखंड ताब्यात घेऊन मागणी असणाऱ्या उद्योजकांना वितरित करणार, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.  चिपळूण तालुक्यातील खेडी औद्योगिक वसाहतीत उभारावयाच्या उत्तर रत्नागिरी उद्योजक संघटना कार्यालय व सभागृह इमारतीचे भूमिपूजन आज देसाई यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.  या वेळी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार बापूसाहेब खेडेकर, माजी आमदार रमेश कदम, खेर्डीचे सरपंच नितीन ठसाळे, एमआयडीचे अधीक्षक अभियंता राजेंद्र झंजाड, प्रादेशिक अधिकारी प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.
देसाई म्हणाले, माहिती तंत्रज्ञान धोरणात आमूलाग्र बदल करून राज्यात उद्योगांना आकर्षति करण्याचे शासनाने ठरविले असून या क्षेत्रात आयटी पार्कसाठीही शासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
उत्तर रत्नागिरी उद्योजक संघटना उद्योगांच्या वाढीसाठी करत असलेल्या प्रयत्नांबद्दल धन्यवाद देऊन या इमारतीचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले. तसेच संघटनेच्या माध्यमातून उद्योगासंदर्भातील समस्या आणि उद्योगांमध्ये वृद्धी करण्यासाठीच्या योजनांवर विचारविनिमय करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून या वास्तूचा उपयोग होणार आहे. यातूनच गतिमान उद्योगनिर्मितीचे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी रोजगारनिर्मितीस हातभार लागेल, असा विश्वासही  देसाई यांनी व्यक्त केला.  कार्यक्रमाला उद्योजक संघटनेच्या सर्व पदाधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी, मान्यवर व्यक्ती मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.  उद्योगमंत्री देसाई यांनी रत्नागिरी येथील औद्योगिक महामंडळाच्या विश्रामगृहात उद्योजकांच्या शिष्टमंडळास भेट देऊन त्यांच्या उद्योगासंबंधीच्या समस्या जाणून घेतल्या. उद्योगांबाबतच्या समस्या विहित वेळेत सोडविण्यात येतील. गरज भासल्यास कायद्यात दुरुस्ती करून बंद उद्योग सुरू करण्यावर भर देण्यात येईल. तसेच रोजगारनिर्मितीसाठी नवीन कारखाने निर्मिती करत असताना येथील निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रदूषणविरहित नवीन कारखाने सुरू  करण्यात येतील. याशिवाय स्थानिक जनता व स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वाना विश्वासात घेऊन औद्योगिक वसाहतीतील गावांचे व उद्योगांचे प्रश्न सोडविण्यात येतील असे सांगितले.   या वेळी आमदार राजन साळवी, आमदार उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, राजेंद्र महाडिक, उदय बने, तसेच औद्योगिक महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.