चीनमध्ये करोना व्हायरसवर उपचार करण्यासाठी काही दिवसांमध्ये एक हजार बेड असलेलं रुग्णालय उभारलं. अशा प्रकारचे रुग्णालय उभारण्यास आपल्याला किमान तीन वर्षाचा कालावधी लागला असता. असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. तसेच जगभरात करोना व्हायरस या आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक देश नागरिकांची काळजी घेत आहे. आपण देखील विशेष लक्ष ठेवून असून या आजाराचा एक भाग म्हणून मी हस्तांदोलन करत नाही असेही त्यांनी सांगितले.

पुणे महानगरपालिकेच्या सरसंघचालक बाळासाहेब देवरस, एव्हिएशन गॅलरीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, भाजपा प्रदेश अध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील, पुणे महापालिका विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि स्थानिक नगरसेविका ज्योत्सना एकबोटे, तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अजित पवार यांनी अंदाजपत्रकावर भूमिका मांडताना म्हणाले की, मी वाढपी आहे, कोणाला किती वाढायचं हे माझ्या हातात आहे. त्यामुळे आधी सर्व आमदारना खुश केलं 2 कोटीचा निधी 3 कोटी केला आहे. त्यामुळे महापालिकेत, राज्यात आणि केंद्रात या तीन ही ठिकाणी वेगळं सरकार असलं तरी राज्य सरकार पुणे शहराच्या विकास कामात कोणत्याही प्रकारचं राजकारण आणणार नसल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

तसेच ते पुढे म्हणाले की, राज्यात आगामी काळात मोठ्या प्रमाणावर कामे केली जाणार आहे. तर पुणे जिल्ह्यात येत्या काळात विमानतळ होणार आहे. यासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात कमी निधी दिला आहे. मात्र राज्य सरकारकडून भविष्यात अधिकचा निधी लागल्यास निश्चित दिला जाईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

महापौरांनी ठरवून तर नाही केल ना : अजित पवार

भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या भाषणा नंतर अजित पवार भाषणाला उठले.  माईक जवळ जाऊन बोलण्यास सुरुवात करतात. तेवढ्यात डायस माईक खाली पडतो. त्यावर महापौरांनी हे ठरवून तर नाही केलं ना? असं अजित पवार म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.