देशात व राज्यात करोना विषाणूने थैमान घातले असताना सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातील तरंगफळ येथे कायदा धाब्यावर बसवून बैलगाडी शर्यत भरविण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. याप्रकरणी संबंधित दहाजणांविरूध्द माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अकलूजपासून जवळच असलेल्या तरंगफळ येथील सिताडीच्या डोंगरावर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथे तातडीने धाव घेऊन कारवाई करण्यात आली. या कारवाईत बैलगाडी शर्यतीसाठी वापरण्यात आलेल्या तीन बैलांसह गाड्या तसेच एक पिकअप गाडी असा सुमारे पाच लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित दहाजणांविरूद्ध गुन्हा नोंद झाल्याचे माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्ही. जी. गोल्डे यांनी सांगितले.

सध्या करोना विषाणूचा कहर सुरूच असताना त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित आहे. परंतू तरंगफळ येथे अलिकडेच करोनाबाधित रूग्ण आढळून आला असला तरी त्याचे गांभीर्य लक्षात न घेता आणि शासनाने बंदी घातली असतानाही बैलगाड्यांची शर्यत भरविण्यापर्यंत तेथील मंडळींची मजल गेली. परंतु त्याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. जिल्ह्यात यापूर्वी टाळेबंदी काळात सांगोला तालुक्यातही दोनवेळा बैलगाड्यांच्या शर्यती भरविण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर आता माळशिरस तालुक्यातही असा प्रकार घडला आहे.