अमृता फडणवीस यांच्या भाऊबीजेच्या दिवशी रिलीज झालेल्या एका गाण्यावर मराठी निर्माते व दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. वस्तुतः ‘तिला जगू द्या’ या शीर्षकाच्या गीताद्वारे अमृता फडणवीस यांनी बेटी बचाओचा लोकहितकारक संदेश या गाण्यातून दिला व स्त्रीभ्रूणहत्या ह्या अत्यंत गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयावर भाष्य केले.

त्यांच्या गायनावर महेश टिळेकर यांनी टीका केली. याची फेसबुक आणि सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटली.त्यावर अनेकांनी नापसंती व्यक्त केली व महेश टिळेकर यांच्यावर काहींनी टीका तर काहींनी समर्थनाच्या पोस्ट टाकल्या.

आता या सर्वांशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा संबंध काय ?
महेश टिळेकर यांनी कोणतेही सबळ कारण नसताना चंद्रकांत पाटील यांच्यासोबतचा एका कार्यक्रमातील फोटो फेसबुकवर पोस्ट केला व अनावश्यक बादरायण संबंध जोडले आहेत. त्यात त्यांनी पोस्टमुळे खवळलेल्यांना भाजप भक्त व समर्थक संबोधले आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यासोबतचा एका कार्यक्रमातील फोटो पोस्ट करुन “स्टेजवर भक्तांचे लाडके नेते चंद्रकांत पाटील माझ्या बरोबर आहेत. म्हणजे मी जे काही त्या गायिकेच्या आवाजावर टीका करण्याची हिम्मत केली त्यामागे चंद्रकांत पाटील यांचा हात आणि पाठिंबा आहे असाही अर्थ आता हे भक्त काढतील का हे फोटो पाहून ?” असा सवाल महेश टिळेकर यांनी केला आहे.

अमृता फडणवीसांच्या गाण्यावरून महेश टिळेकरांशी वाद घालणारा आरोह वेलणकर आहे तरी कोण?

“राजकारणात काट्याने काटा काढायचा असतो आणि या कामासाठी चंद्रकांत पाटील यांच्याकडून मला करोडो रुपये मिळाल्याची शक्यता नाकारता येत नाही आता काय म्हणाल माझ्यावर टीका करणाऱ्या भक्तांनो” अशी विधाने केली आहेत.

या वादात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे फोटो वापरून त्यांना ओढण्याचा टिळेकरांचा प्रयत्न निषेधार्ह असून त्यांनी याबाबत माफी मागावी अशी मागणी भाजपाने केली आहे. अशी निरर्थक व संदर्भहीन वक्तव्ये टाळावीत अन्यथा त्यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येइल, अशा इशारा भाजप पुणे शहरचे मुख्य प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी दिला आहे.