मराठा आरक्षणावरून राज्यातील ठाकरे सरकार आणि खासदार संभाजीराजे यांच्यावर भाजपा खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी निशाणा साधला. “मराठा आरक्षण स्थगितीला ठाकरे सरकारच जबाबदार आहे. मी ३९ वर्षे शिवसेनेत होतो. त्यामुळे मराठा आरक्षणाबद्दल शिवसेनेची काय भूमिका आहे?, हे मला चांगलं माहिती आहे”, असं त्यांनी सांगितलं. शरद पवारांनी मराठा समाज आणि आरक्षणाच्या बाजूने बोलण्याची गरज असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

“छत्रपती संभाजीराजे यांच्यात धमक दिसत नाही. खासदारकीची मुदत संपत आली की आंदोलनाची, राजीनामा देईन, पक्ष काढेन अशी भाषा सुरु आहे. छत्रपती संभाजीराजे कोकणात आले? कधी कुठे आले, मला भेटले नाही. मला समजलं असतं तर मी स्वागत केलं असतं, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन आरक्षण मिळत नाही आणि असं पुढारी होत नसतात. राजे हे समाजानं म्हणावं लागतं. आता टर्म संपत आल्यावर राजेंनी राजीनामा देऊ नये. राजे फिरताहेत पण रयत दिसत नाही आजूबाजूला. राजांना रयत भेटायला येते हे का फिरतायत”, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

राज्यातील महाविकासआघाडी हा नैसर्गिक पर्याय नव्हता, पण… : अमित देशमुख

करोना रोखण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे ९६ हजार करोना बळी गेले आहेत. आता ग्रामीण भागात पसरत आहे. १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण जाहीर केले. लस पुरवण्यासाठी राज्य सरकारने काय केले?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही त्यांनी टीका केली.