मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने व्यंगचित्राच्या माध्यमातून केलेल्या टीकेला भाजपा समर्थकांनीही व्यंगचित्रातून उत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता. मोदी आणि शाह हे दोघे लाल किल्ल्यावर लोकशाहीला फासावर लटकवत असल्याचे या व्यंगचित्रातून दाखवण्यात आले होते. यानंतर भाजपा समर्थकांनीही व्यंगचित्रातून राज ठाकरेंना उत्तर दिलं असून हे व्यंगचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्यंगचित्रात लोकशाहीऐवजी राज ठाकरेंना फासावर लटकवत असल्याचे दाखवण्यात आलं आहे. राज ठाकरे यांनी स्वतंत्रते न बघवते असा टोला व्यंगचित्रातून लगावला होता. त्यावर भाजपा समर्थकांनी अच्छे दिन न बघवीते अशी टीका राज ठाकरेंवर केली आहे.

राज ठाकरे यांनी शुक्रवारी सकाळी ट्विटरवर व्यंगचित्र शेअर केले . या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी भाजपा सरकारच्या काळात लोकशाहीची गळचेपी होत असल्याचे दाखवले. व्यंगचित्रात अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्यावर दाखवले आहे. ते दोघे लोकशाहीला फासावर लटकवत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे व्यंगचित्राच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपावर टीका करत आहे. गेल्या आठवड्यातही त्यांनी मोदींवर टीका केली होती. काँग्रेसने मोदींना छळले, म्हणून मोदी जनतेला छळत असल्याचा टोला राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून लगावला होता.