जिल्हा नियोजन मंडळात (डीपीसी) बहुसंख्य सभासद जिल्हा परिषदेचे सदस्य असताना मंडळाच्या पहिल्याच सभेने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला ‘खो’ दिला आहे. डीपीसी व जिल्हा परिषद या दोन्हींच्या सभा दि. १९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. डीपीसीची सभा यापूर्वी दि. १७ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते, ती तारीख बदलून आता दि. १९ रोजीच ठेवण्यात आली आहे.
डीपीसीमध्ये बहुमत असल्याने मंडळाच्या सभेबाबत काय निर्णय घ्यायचा याचा खल जिल्हा परिषदेच्या सदस्यांत सुरू झाला आहे. दि. १९ रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेची विषयपत्रिका १५ दिवस आधीच सदस्यांना वितरित करण्यात आली आहे. दोन्ही सभांना मुख्य कार्यकारीअधिकाऱ्यांसह जि.प.च्या विविध विभागप्रमुखांची उपस्थिती आवश्यक असल्याने अधिकाऱ्यांचीही चांगलीच पंचाईत झाली आहे.
निवडणुका व पालकमंत्र्यांची नियुक्ती यामुळे डीपीसीची सभा तब्बल सात महिन्यांनी होत आहे. यापूर्वीची सभा दि. ३१ मे रोजी झाली होती. त्यामुळे जिल्हा आराखडय़ातील पुनर्विनियोजन, वितरित करण्यात आलेल्या निधीचा खर्च व आगामी २०१५-१६ या वर्षांचा २८५ कोटी रुपयांचा आराखडा असे विषय आगामी सभेपुढे असतील. यापूर्वीच्या सभेत ज्येष्ठ सदस्य सुभाष पाटील यांनी डीपीसीच्या सभेचा अजेंडा मिळत नसल्याची तक्रार केली होती. डीपीसीमध्ये जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या ३३ आहे. पालकमंत्री राम शिंदे यांनी पूर्वी डीपीसीची सभा दि. १० रोजी होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र छोटय़ा गटांच्या बैठका झाल्या नसल्याने ही सभा दि. १७ रोजी ठेवण्यात आली व पुन्हा लगेच बदलून ती दि. १९ रोजी ठेवण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभाही अशीच पुढे ढकलून अखेर दि. १९ रोजी ठेवली असली तरी त्याची विषयपत्रिका डीपीसीची सभा निश्चित होण्यापूर्वीच वितरित केली गेली आहे. सभेची तारीख सुरुवातीला दि. १२ रोजी निश्चित करण्यात आली होती, मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल दीर्घ रजेवर गेल्याने ती पुढे ढकलून दि. १९ रोजी ठेवण्यात आली आहे. खरेतर या दोन्ही सभांच्या तारखा वेगवेगळय़ा आहेत. डीपीसीची सभा सकाळी १० वाजता नियोजन भवनमध्ये आहे. तर जि.प.ची सभा दुपारी १ वाजता जि.प. प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात आहे.