हिंदुत्व हे कधीही कट्टर नसतं, हिंदुत्व सहिष्णूच आहे त्यामुळेच एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी भारतात काहीही बोलू शकतात. त्यांच्यावर हल्ला होत नाही यामध्येच हिंदुत्वाची सहिष्णुता दिसून येते असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केलं आहे. देवेंद्र फडणवीस हे सध्या नागपुरात पदवीधर मतदारसंघात निवडणूक प्रचार करत आहेत. यावेळी त्यांनी एका सभेत हे वक्तव्य केलं.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“हिंदुत्व हे कधीच कट्टर असू शकत नाही. हिंदुत्व सहिष्णू आहे. हिंदुत्वाने कधीच कुणार आक्रमक केले नाही. त्यामुळेच भारतात सर्व धर्माचे लोक सुख आणि समाधानाने राहू शकतात. हिंदू बहुसंख्य असणाऱ्या देशात असदुद्दीन ओवेसी काहीही बोलू शकतात. तरीही ओवेसींवर हल्ला होत नाही. यामध्येच हिंदुत्वाची सहिष्णुता दिसून येते. हैदराबादच्या निवडणुकीसाठी ओवेसी सध्या काहीबाही बोलत असले तरीही त्यांना त्याचा फायदा होणार नाही” असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत प्रभारी म्हणून यश मिळवल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस पदवाधीर मतदारसंघाच्या मिशनवर आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघात सहा ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या सभा होणार आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस याठिकाणी संपूर्ण ताकद पणाला लावताना दिसत आहेत.

याच सभेत माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीजबिलाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारल लक्ष्य केले. थकबाकीमुळे वीज महामंडळ संकटात असल्याचे बोलले जात आहे. पण राज्य सरकार हा मुद्दा करून मूळ मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न करत आहे. वीजबिल माफी आणि थकबाकी हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. वीज महामंडळाच्या तीन कंपन्या आहेत. त्या बरखास्त होऊ शकत नाहीत. राज्य सरकारने वीज बिल माफ करावे. अन्यथा तीव्र आंदोलन करु, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.