शरद पवार यांचा झंझावात पाहून भाजपाला घाम फुटला आहे. म्हणूनच त्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. लक्षात ठेवा ‘रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवाँ बदलता है, जज्बा रखो जीतने का क्यूँकी किस्मत बदले ना बदले पर वक्त जरुर बदलता है’ असा शेर ट्विट करत धनंजय मुंडे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच भाजपाने ही कारवाई केली आहे असेच धनंजय मुंडे यांना यातून म्हणायचे आहे हे उघड आहे.

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी  शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण सत्तर जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. दोन वर्षे यासंदर्भातल्या काहीही घडामोडी घडलेल्या नव्हत्या. मात्र विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शरद पवार, अजित पवार यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी एकूण ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यानंतर आता एक एक प्रतिक्रिया समोर येण्यास सुरुवात झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांनीही सरकारचा निषेध करणारी प्रतिक्रिया नोंदवली आहे.