लोकसत्ता प्रतिनिधी

अकोला : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग प्रमुख पदावर नियुक्तीवरून तब्बल एका वर्षानंतर वाद निर्माण झाला आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या नियुक्तीसाठी डॉ.प्रकाश कडू यांनी बनावट प्रमाणपत्र लावून अनुभव वाढल्याचा आरोप प्राध्यापक डॉ.संजय भोयर यांनी केला. यासंदर्भात त्यांनी कुलगुरू डॉ.विलास भाले यांच्याकडे तक्रार केली. तक्रारीत तथ्य नसून द्वेष भावनेतून हा प्रकार करण्यात आल्याचे डॉ.प्रकाश कडू यांनी सांगितले.

मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग प्रमुख पदावर निवडीसाठी तीन प्राध्यापक व पाच सहयोगी प्राध्यापकांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या सेवा प्रवेश मंडळाकडे अर्ज दाखल केले होते. २० ऑगस्ट २०१९ ला मुलाखती झाल्यावर डॉ.प्रकाश कडू यांची निवड करण्यात आली. डॉ.कडू यांनी १३ वर्ष पाच महिने १६ दिवसांचा विद्यापीठातील अनुभव वाढवून २४ वर्ष सहा महिने १९ दिवस दाखवत बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर केले, अशी तक्रार डॉ.भोयर यांनी केली. विद्यापीठात रुजू होण्यापूर्वी कृषी अधिकारी व मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असतांनाचा ११ वर्ष एक महिना तीन दिवसांचा कालावधी सेवा मंडळाच्या अर्ज छाननी समितीने वरिष्ठ संशोधन सहायक पदाचा दाखवला. दरम्यान, १९९२ ते १९९८ या एकूण सहा वर्षात ते विद्यापीठात आचार्य पदवीचे शिक्षण घेत होते. १८ मे २०१७ पासून डॉ.कडू यांच्याकडे कुलसचिव पदाचा पूर्णवेळ पदभार असतांना त्यांना नागपूर कृषि महाविद्यालय येथे सहयोगी प्राध्यापक पदाचा अनुभव दाखवण्यात आला आहे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी डॉ.संजय भोयर यांनी केली.
‘त्या’ प्रती कार्यालयात उपलब्ध नाही

डॉ.प्रकाश कडू यांनी सादर केलेले अनुभव व अतिरिक्त कार्यभार प्रमाणपत्रांच्या कार्यालयीन प्रती कृषि महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता कार्यालयात उपलब्ध नाहीत. कृषि अधिष्ठाता यांच्या कार्यालयात सुद्धा त्या प्रती उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकार अर्जाच्या उत्तरात डॉ.भोयर यांना सांगण्यात आले.

तक्रारीमध्ये तथ्य नाही. द्वेष भावनेतून एका वर्षानंतर ही तक्रार करण्यात आली आहे. या पदासाठी सहायक व सहयोगी प्राध्यापक पदाचा किमान १२ वर्षांचा अनुभव लागतो. त्यापेक्षा जास्त अनुभव व पदासाठी संपूर्ण पात्र असल्याने ‘एमसीएईआर’कडून निवड करण्यात आली. अनुभव प्रमाणपत्रामध्ये केवळ एका दिवसाची चूक झाली आहे.

– डॉ.प्रकाश कडू, विभाग प्रमुख, मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र, डॉ.पंदेकृवि, अकोला.