मागील चार वर्षांपासून पर्जन्यमानात मागे पडलेल्या उस्मानाबादसह मराठवाडय़ात यंदा ढगाळ वातावरण आहे. मात्र, पाऊस पडत नाही. ढगाळ वातावरण कृत्रिम पावसास पोषक असल्यामुळे राज्य सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री सचिवालयाचे सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याकडे केली. म्हैसकर यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांना अवगत करून मंत्रिमंडळाच्या बठकीत हा विषय मांडण्याबाबत सकारात्मकता दर्शविली.
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी केवळ १२७ मिमी पाऊस झाला. कळंब व उस्मानाबाद तालुक्यांत सरासरीपेक्षा अत्यंक कमी पाऊस झाला. बहुतांश भागात पहिल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली. उर्वरित भागात पेरणी सुरू आहे. मात्र, मागील आठवडय़ापासून अनुकूल वातावरण असतानाही पाऊस पडत नाही. अशा स्थितीत लवकरच पाऊस न पडल्यास पेरलेले पीक वाया जाण्याची भीती आहे. सध्या पाऊस पडण्यासारखे ढग भरून येत असल्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग योग्य प्रकारे झाल्यास या भागात पाऊस पडेल. या अनुषंगाने आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री दिल्लीत असल्याने मुख्यमंत्री सचिवालयायचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याशी कृत्रिम पर्जन्यधारणा प्रयोग सुरू करण्याबाबत चर्चा केली. तसेच मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे तातडीने कृत्रिम पर्जन्यधारणा प्रयोग कार्यान्वित करण्याची मागणी केली.
राष्ट्रवादीच्या जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन सोमवारी देण्यात आले. माजी नगराध्यक्ष मकरंद राजेिनबाळकर, जि. प. सदस्य महेंद्र धुरगुडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकत्रे उपस्थित होते.