डोळय़ांचे पारणे फेडणारी नेत्रदीपक रोषणाई, चित्त खिळवून ठेवणारे देखाव्यांचे सादरीकरण, डॉल्बीच्या दणदणाटात थिरकणारी तरुणाई, पारंपरिक वाद्यांचा टिपेला पोहोचलेला गजर, मूर्तिदानाला मिळालेला तरुण मंडळांचाही प्रतिसाद अशा वैशिष्टय़पूर्ण वातावरणात करवीरनगरी गणरायाला निरोप देण्यात आला. सोमवारी सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या मिरवणुकीची सांगता मंगळवारी दुपारी १ वाजता झाली. तब्बल २८ तास सुरू असलेली मिरवणूक किरकोळ वाद वगळता शांततेत पार पडल्याने पोलीस प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. शहरात सुमारे ९८० तर जिल्हय़ात २८०० सार्वजनिक तरुण मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. श्रींच्या निरोपाला वरुणराजाने हजेरी लावली तरी भाविकांचा उत्साह कायम राहिला.
गेले दहा दिवस शहरात गणेशोत्सवाचे वातावरण रंगत चालले होते. सोमवारी अनंत चतुर्दशी असल्याने रविवारी सायंकाळपासूनच विसर्जनाच्या तयारीला वेग आला होता. सोमवारी रात्रीच मिरवणुकीच्या मार्गावर वाहने सजवण्याचे काम सुरू होते. मंगळवारी सकाळी नऊ वाजता विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. मानाचा गणपती असलेल्या तुकाराम माळी तरुण मंडळाच्या श्रींची आरती करण्यात आली. यानंतर पालखी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, महापौर तृप्ती माळवी, जिल्हाधिकारी राजाराम माने, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा आदी मान्यवरांनी वाहून नेली. या पाठोपाठ विसर्जन मिरवणुकीला रंग भरू लागला.
दुपारी ४ वाजेपर्यंत मिरवणुका मुख्य व पर्यायी मार्गाने संथ गतीने सुरू होती. सायंकाळनंतर मिरवणुकीमध्ये महत्त्वाच्या तरुण मंडळांचा समावेश होऊ लागला. पोलिसांनी डॉल्बीचा वापर होऊ नये यासाठी प्रयत्न केले होते. पण पोलिसांच्या देखतच डॉल्बीचा दणदणाट सुरू होता. सिनेसंगीताच्या तालावर तरुणाई रात्रभर थिरकत राहिली. पण काही मंडळांनी आवर्जून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले होते. झांज पथक, लेझिम, बॅन्जो, ढोल, ताशा या वाद्यांचा गजर होत होता. मिरवणुकीत यंदा वैशिष्टय़ ठरले ते नेत्रदीपक रोषणाईचे. अनेक मंडळांनी मुंबईहून अद्ययावत यंत्रणा पाचारण केली होती. रात्र सरू लागली तसतसे अंधारात रोषणाईचे वैविध्य नजरेसमोर येऊ लागले. नेत्रदीपक रोषणाई मंत्रमुग्ध करणारी होती. तर बऱ्याच मंडळांनी सजीव व मूर्तीचे देखावे मिरवणुकीमध्ये आणले होते. हे देखावे पाहण्यासाठी पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत असतानाही भाविकांची गर्दी कायम होती.
मिरवणूक शांततेत पार पडली, तथापि महाद्वार रोड, मिरजकर तिकटी येथे किरकोळ वादावादीचे प्रसंगही पोलिसांनी संयमाने हाताळून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. सीसीटीव्ही ची नजर मिरवणुकीवर असल्याने त्याचाही चांगला परिणाम दिसून आला. कोल्हापूर महापालिका, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे या पक्षाच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. पंचगंगा नदीकाठी यंदा प्रथमच केनची सोय करण्यात आली होती. यामुळे श्रींचे विसर्जन करताना मंडळांना फारसे सायास करावे लागले नाहीत. मूर्ती दानासही चांगला प्रतिसाद मिळाला. इराणी खण, पंचगंगा घाट, कोटीतीर्थ तलाव, नारायणदास मठ अशा विविध ठिकाणी १०७ मूर्ती तरुण मंडळांनी दान केल्या.
संग्रहित लेख, दिनांक 10th Sep 2014 रोजी प्रकाशित
कोल्हापुरात २८ तासांनी मिरवणुकीची सांगता
डोळय़ांचे पारणे फेडणारी नेत्रदीपक रोषणाई, चित्त खिळवून ठेवणारे देखाव्यांचे सादरीकरण, डॉल्बीच्या दणदणाटात थिरकणारी तरुणाई, पारंपरिक वाद्यांचा टिपेला पोहोचलेला गजर, मूर्तिदानाला मिळालेला तरुण मंडळांचाही प्रतिसाद अशा वैशिष्टय़पूर्ण वातावरणात करवीरनगरी गणरायाला निरोप देण्यात आला.

First published on: 10-09-2014 at 04:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goodbye to lord ganesha with procession in kolhapur