मोहन अटाळकर
अमरावती आणि अकोला जिल्ह््यात यंदा फेब्रुवारीत आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता आता कमी झाली आहे. दोन महिन्यात रुग्णसंख्या उच्चांकी पातळीवर पोहचल्यानंतर हा आलेख पुन्हा खाली येऊ लागला आहे. एका विशिष्ट कालावधीनंतर करोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण कमी होत जाते, असे निरीक्षण वैद्यक तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
गेल्यावर्षी करोनाची साथ सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांनी सप्टेंबरमध्ये अमरावती आणि अकोला जिल्ह््यात करोनाच्या उद्रेकाने उच्चांक गाठला होता. एकाच महिन्यात अमरावती जिल्ह्यात १५५ तर अकोला जिल्ह््यात ८४ मृत्यूंमुळे आरोग्य यंत्रणा हादरून गेली होती. त्यानंतर रुग्णसंख्या हळूहळू कमी होत गेली. पण, फेब्रुवारीच्या मध्यावर ती पुन्हा वाढू लागली आणि महिनाभरातच म्हणजे मार्चमध्ये रुग्णसंख्येचा विस्फोट झाला. करोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरात आणि ग्रामीण भागातही रुग्णसंख्या वेगाने वाढली. आता अमरावती जिल्ह््यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येचा आलेख खाली आला आहे. मृत्यूंचे प्रमाणही कमी झाले आहे. त्या तुलनेत अजून अकोला जिल्ह््यात दुसऱ्या लाटेची तीव्रता तेवढी कमी झालेली नाही. मात्र गेल्या महिन्यापेक्षा स्थिती आटोक्यात आहे. मार्च महिन्यात अमरावती जिल्ह्यात तब्बल १३ हजार ५१८ तर अकोला जिल्ह््यात ११ हजार ५५५ रुग्णांची नोंद झाली. हा आतापर्यंतचा उच्चांक ठरला. याच महिन्यात अमरावतीत १६३ तर अकोल्यात ८६ जणांना आपले प्राण गमवावे लागले. फे ब्रुवारीमध्ये अमरावतीत १३ हजार २३० जर अकोल्यात ४ हजार ५२७ रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
फेब्रुवारीच्या मध्यात अमरावती जिल्ह््यात बाधितांची संख्या दरदिवशी सातशे ते आठशेवर पोहोचली. २३ फेब्रुवारीला उच्चांकी ९२६ रुग्णसंख्या झाली. आता दरदिवशीची रुग्णसंख्या तीनशेपर्यंत खाली आली आहे. महिनाभरात अकोल्यातील दररोज सरासरी रुग्णसंख्या तीनशेहून दोनशेपर्यंत कमी झाली आहे. करोनाच्या संसर्गाचा हा प्रवास वैद्यक तज्ज्ञांसाठी अभ्यासाचाच विषय बनला आहे.
करोनाचा संसर्ग उच्चांकी पातळीवर पोहचल्यावर विशिष्ट कालावधीनंतर हळूहळू कमी होत जातो, हे निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये आणि आता मार्चमध्ये आलेला अनुभव तेच सांगतोय. करोना पूर्णपणे संपलेला नाही. सर्वांनी नियमांचे पालन के ले, तरच करोनावर मात करणे शक्य आहे.
– डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती.