आज दिवसभर पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये झालेल्या तुफान पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाल्याचं दिसून येत आहे. त्यातही सर्वाधिक फटका बसलाय तो रत्नागिरीतील चिपळूण शहराला. चिपळूण शहर पाण्याखाली गेलं असून अजूनही पाणी कमी झालेलं नाही. शेकडोंच्या संख्येनं नागरीक पाण्यात अडकले आहेत. आज दिवसभरात चिपळूणमध्ये पडलेला २०२ मिमी पाऊस आणि त्यापाठोपाठ कोयना धरण भरल्यामुळे खालच्या धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करावा लागला. दोन्हीकडून पाणी शहरात आल्यामुळे आख्खं शहर पाण्याखाली गेलं आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये मदतकार्य करण्यासाठी प्रसासकीय पातळीवर प्रयत्न केले जात असून एनडीआरएफच्या काही टीम बऱ्याच प्रयत्नांनंतर चिपळूणमध्ये दाखल झाल्या आहेत.

रत्नागिरी, पालघर, ठाणे जिल्ह्याला फटका

महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी, कोल्हापूरमधील अनेक नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहात असल्यामुळे बचाव पथकांना या ठिकाणी पाठवण्यात आले आहे. एनडीआरएफच्या तुकड्या त्या त्या जिल्ह्यात पाठवण्यात आल्या असून त्यांनी बचावकार्य सुरू केलं आहे. त्यात सर्वाधिक फटका बसलेल्या चिपळूणमध्ये एनडीआरएफनं बचावकार्य सुरू केलं असून ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याला प्राधान्य

दरम्यान, यासंदर्भात मंत्री अनिल परब यांनी चिपळूणमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याला प्राधान्य असल्याचं सांगितलं. “चिपळूणची परिस्थिती पाण्यामुळे बिकट झाली आहे. एनडीआरएफच्या टीम चिपळूणमध्ये दाखल झाल्या आहेत. अजून ४ टीम उद्या सकाळपर्यंत दाखल होतील. कोस्टगार्ड आणि इतर सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी स्वत: चिपळूणमध्ये बसून आहे. पाऊस २०० मिलिमीटरच्या वर पडला. त्यानंतर धरणाचं पाणी देखील सोडल्यामुळे पाण्याची पातळी वाढली होती. हळूहळू पाण्याची पातळी खाली उतरत आहे. लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्याला आमचं प्राधान्य आहे. सगळ्या टीम कामाला लागल्या आहेत. नगर परिषदेच्या टीम देखील काम करत आहेत. ७ ते ८ बोटी या कामी लागल्या आहेत”, असं त्यांनी सांगितलं आहे.

जीवितहानी होण्याची शक्यता नाही

दरम्यान, या संकटामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता नसल्याचं अनिल परब यांनी एबीपी वाहिनीशी बोलताना सांगितलं आहे. “आत्तापर्यंत मोठी जीवितहानी झालेली नाही. यापुढे देखील होण्याची शक्यता फार कमी आहे. पाऊस पुन्हा पडला, तर पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शक्य तितक्या लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याला आमचं प्राधान्य राहील. पाण्याची पातळी थोडी खाली आलेली असताना जास्तीत जास्त लोकांना सुरक्षित स्थळी नेता येईल याकडे आम्ही लक्ष ठेऊन आहोत”, असं ते म्हणाले.

 

 

कोल्हापुरातही पावसाचं थैमान

दरम्यान, रत्नागिरीतील चिपळूणप्रमाणेच कोल्हापूरला देखील पावसाचा तडाखा बसला आहे. सातारा, सांगलीसोबत कोल्हापूरमध्ये देखील एनडीआरएफच्या तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या बहुतेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून दोन एनडीआरएफच्या तुकड्या कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. एक तुकडी शिरोळ तालुक्यात तर दुसरी तुकडी करवीर तालुक्यात दाखल झाली आहे. यासंदर्भात कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रशासनासोबत चर्चा करून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं ट्वीट केलं आहे.